
म्युनिसिपल ई-क्लासरूम प्रकल्पाचे शिक्षकांनी गिरवले धडे
पिंपरी, ता. २ ः महापालिका व पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीच्या म्युनिसिपल ई-क्लासरूम प्रकल्पासाठी महापालिका शाळेतील १०० शिक्षकांना तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. ते शिक्षक आता ई-क्लास रूममध्ये विद्यार्थ्यांना धडे देणार आहेत.
ई-क्लासरूम प्रकल्प महापालिकेच्या १२३ शाळांमध्ये राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी २ टप्प्यात केली आहे. पहिल्या टप्प्यात ११ शाळांमध्ये प्राथमिक तत्त्वावर अंमलबजावणी करण्यात आली. दुसऱ्या टप्प्याचे कामकाज ११२ शाळांमध्ये पूर्ण झाले आहे. प्रकल्पामध्ये संगणक कक्ष, डिजिटल ई-लर्निंग प्लॅटफॉर्म, वायफाय ॲक्सेस पॉइंट, एलईडी डिस्प्ले, एचडी कॅमेरा, व्हीडीओ रेकॉर्डिंग, शैक्षणिक विश्लेषण सॉफ्टवेअर, रोबोटिक्स लॅब (विज्ञान तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित), गणित, इंग्रजी आणि विज्ञानासाठी तज्ज्ञ शिक्षकांची नियुक्ती, प्रकल्प व्यवस्थापन आणि हेल्प डेस्क सेवा, ऑनलाइन डॅशबोर्ड आदी बहुतांश घटकांचा समावेश आहे. एकूण ३५० शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रकल्पाचा सुमारे ४४ हजार विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. इडिक आणि केपीएमजी सल्लागार कंपनीच्या प्रतिनिधींद्वारे शिक्षकांना मार्गदर्शन देण्यात येत आहे. यामध्ये इंग्रजी, मराठी, हिंदी, उर्दू शाळांचा समावेश असून मुख्याध्यापक कक्षातून विद्यार्थ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे आणि समस्या निराकरणास मदत होणार आहे, अशी माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.