
बँक खाते बदलल्याचे सांगून कंपनीची ३७ लाखांची फसवणूक
पिंपरी ः कंपनीच्या ई-मेल आयडीवर बनावट मेल पाठवून सिंगापूर येथील कंपनीचे बँक खाते बदलले असल्याचे सांगत ३७ लाख ७५ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली. हा प्रकार बाणेर येथे घडला. या प्रकरणी सुनील भाऊ एरणकर (रा. बावधन) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची बाणेर येथे मास्ट्रोटेक इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे. त्यांना कंपनीच्या ई-मेल आयडीवर सिंगापूर येथील एसीए पॅसिफीक टेक्नॉलॉजी या कंपनीच्या ई-मेल आयडीवरून मेल आला. त्यावर सिंगापूर येथील या कंपनीचे बँक खाते बदलल्याचे म्हटले. तसेच व्यवहारापोटी देणे असलेले ३७ लाख ७५ हजार रुपये या बँक खात्यावर पाठविण्यास सांगितले. त्यानुसार त्यांना ३७ लाख ७५ हजार रुपये ऑनलाइन टीटी रेमीटन्स याद्वारे पाठवले.
लग्न जमण्याच्या कारणावरून फसवणूक
लग्न जमण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी पूजा अर्चा करावी लागेल असे भासवून तरुणीकडून बारा लाख रुपये उकळले. त्यानंतर या रकमेचा अपहार करून फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी ३६ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार विशाल शर्मा (रा. जोहारीपूर, उत्तराखंड) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीने त्यांचे लग्नासाठी वधूवर सूचक मंडळात नावाची नोंदणी केली. आरोपीने फिर्यादी यांच्या मोबाईलवर संपर्क साधला. लग्न जमविण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी पूजाअर्चा करावी लागेल, असे भासवून त्यासाठी फिर्यादीकडे वेळोवेळी पैशांची मागणी करीत बारा लाख १७ हजार १२० रुपये घेतले. या रकमेचा अपहार करून फिर्यादीची फसवणूक केली. चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
एटीएम फोडीचा प्रयत्न; आरोपी अटकेत
एटीएम फोडीचा प्रयत्न केल्याचा प्रकार हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील म्हाळुंगे येथे घडला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. आदित्य भीमराव कांबळे (वय २०, रा. पिंपळे गुरव) व त्याचे दोन साथीदार, विशाल बंडू कारके (रा. चिखली), प्रथमेश प्रकाश जाधव (रा. पिंपळे गुरव) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी प्रशांत प्रभाकर आरवलकर (रा. एकतानगरी, हिंगणे खुर्द, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींनी आयसीआयसीआय बँकेच्या एटीएम लॉबीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर एटीएममधील रोख रक्कम चोरी करण्याच्या उद्देशाने कॉस्मिक डोअर व चेस्ट डोअर तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
बावधनमध्ये तीन लाखांची घरफोडी
दरवाजाचे कुलूप तोडून घरात शिरलेल्या चोरट्याने तीन लाखांचा ऐवज लंपास केल्याचे घटना बावधन येथे घडली. या प्रकरणी प्रसाद दयानंद शिवशेटे (रा. बावधन खुर्द, ता. मुळशी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीचे घर बंद असताना दरवाजाचे कुलूप तोडून चोरटा आत शिरला. दोन लाख ६२ हजारांचे सोन्याचे दागिने, १९ हजारांची रोकड, तेरा हजारांचे दोन घड्याळ असा एकूण दोन लाख ९४ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.
विनयभंग प्रकरणी एकाला अटक
महिलेचा पाठलाग करीत अश्लील बोलून विनयभंग केला. कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी एकाला अटक केली. याप्रकरणी महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार राकेश गंगाधर जाधव (वय ४३, रा. सिडको एन-५, औरंगाबाद ) याला अटक केली आहे. आरोपीने फेसबुकवरून फिर्यादीचा मोबाईल नंबर घेऊन मला तुला भेटायचे आहे, असे म्हणत फिर्यादीला सतत फोन करून त्रास दिला. त्याचा फोन न घेतल्यास पाठलाग करीत फिर्यादीच्या मुलांच्या शाळेपर्यंत आला. अश्लील बोलून त्यांचा मानसिक छळ केला. फिर्यादीने त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यास औरंगाबाद येथे फिर्यादीच्या आईला, मुलांना व कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली.
लग्नाच्या आमिषाने महिलेवर अत्याचार
कंपनीतील सहकारी महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना
पिंपळे गुरव येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी मोरेस विल्सन जोसेफ (रा. देवकर पार्क, पिंपळे गुरव) याला ताब्यात घेतले आहे. पीडित ३२ वर्षीय महिलेने सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी व आरोपी जोसेफ हे एकाच कंपनीत कामाला होते. जोसेफने महिलेसोबत ओळख करून तिला लग्नाचे आमिष दाखवले. २०१८ ते आतापर्यंत वेळोवेळी जबरदस्तीने महिलेशी शारीरिक संबंध ठेवले. महिलेने लग्न करण्याबाबत जोसेफला विचारले असता तिला मारहाण केली.