
महापालिका उपायुक्त झगडे यांना आयुक्तांची नोटीस
पिंपरी, ता.३ ः अतिरिक्त आयुक्तपदी झालेली नियुक्ती रद्द करून अन्यायकारक वागणूक दिल्याने महापालिकेतील उपायुक्त स्मिता झगडे यांनी महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरण मुंबई (मॅट) मध्ये दाद मागितली होती. यातून त्या थेट राज्य शासन आणि महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या विरोधात गेल्या. त्यामुळे आता झगडे यांच्या अडचणी वाढल्या असून त्यांना आयुक्त सिंह यांनी नोटीस बजावली आहे.
झगडे यांची अतिरिक्त आयुक्तपदावर झालेली नियुक्ती शासनाकडून रद्द झाली. यामुळे आपल्या अन्याय असे म्हणत थेट मॅटमध्ये धाव घेतली. त्यामध्ये राज्य शासन, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.
झगडे उपायुक्त असलेला विभाग अतिरिक्त आयुक्त म्हणून जांभळे यांच्या नियंत्रणाखाली आहे. बैठकांना गैरहजर राहणे व काही प्रस्ताव प्रलंबित ठेवण्यावरून झगडे यांच्याविषयी एक अहवाल जांभळे यांनी सादर केला. त्यावरून झगडे यांना आयुक्तांना नोटीस बजावली आहे. त्यावर खुलासा देण्यासाठी सुरुवातीला ४८ तासांचा अवधी दिला होता. त्यानंतर झगडे यांनी मुदतवाढीची विनंती केल्याने मागितल्याने त्यांना खुलासा सादर करण्यासाठी दहा दिवसांचा कालावधी दिला आहे.