
चिरतारूण्याचं रहस्य !
श्रीधरकडे पाहिल्यानंतर तो पन्नाशीत पोचला आहे, हे कोणाला खरंच वाटत नव्हतं. काळेभोर केस, अजिबात पोट न सुटलेली देहयष्टी तसेच चेहरा सतत हसमुख असायचा. या तारूण्याचं रहस्य काय? असा प्रश्न त्याला अनेकजण विचारायचे. त्यावेळी ‘‘अरे बाबांनो, त्यासाठी जिभेवर फार नियंत्रण ठेवावे लागते. डॉक्टरांच्या सल्ल्याने डायट करावा लागतो. ’’ असे उत्तर तो द्यायचा. ‘एलआयसी’त तो एजंट म्हणून काम करीत असल्याने एखाद्या अनोळख्या व्यक्तीलाही आपलं म्हणणं कसं पटवून द्यायचं, याची ‘पॉलिसी’ त्याला चांगलीच अवगत झाली होती.
‘‘हे बघा. सध्याचे दिवस फार वाईट आहेत. उत्तर कोरिया कधीही अणुबॉंब टाकू शकेल, अशी परिस्थिती आहे. रशिया आणि युक्रेनचे युद्ध कधीही जागतिक पातळीवर पोचेल सांगता येत नाही. त्यापेक्षाही मोठी गोष्ट म्हणजे सूर्यासारखा आणखी एक तारा पृथ्वीवर पडणार आहे. त्यामुळे पृथ्वी कधीही नष्ट होईल. त्यातच कोरोनासारख्या आणखी काही लाटा येऊ शकतात. त्यामुळे मानवी जीवनाचं काय खरं नाही. त्यामुळे तुम्ही पॉलिसी उतरली पाहिजे. तुम्हाला तुमची काळजी नसली तरी आम्हाला तुमच्या कुटुंबीयांची काळजी आहे. त्यामुळे कितीची पॉलिसी उतरू.?’’ असं तो विचारून समोरच्याला घोळात घ्यायचा.
आता पृथ्वीच जर नष्ट होणार असेल तर पॉलिसी कशाला काढायची? असला प्रश्न त्याला पडत नसे. कोणी तसं विचारलंच तर स्वर्गातही आमची पॉलिसी चालते बरे का? असंही ठोकून द्यायला तो मागेपुढे पाहणार नाही.
बाकी काही असलं तरी त्याच्या चिरतारूण्याचं रहस्य काय आहे, हे मी त्याला एकदा खोदून खोदून विचारलं. त्यावेळी गंभीर चेहरा करून तो म्हणाला, ‘‘दोन्ही हातात जड वजनं घेऊन वेटलिफ्टिंगचा व्यायाम करतो, रोज किमान अर्धा तास तरी चालतो. अंगातून घामाच्या धारा वाहेपर्यंत व्यायाम करतो. तसेच गाजर, काकडीसह हिरव्या पालेभाज्याही निम्या कच्च्या खातो. त्यामुळे माझी प्रकृती एवढी ठणठणीत आहे.’’ श्रीधरने एवढं सांगितल्यावर मला आनंद वाटला. त्याच्याविषयीचा आदर वाढला. एक दिवस अचानकपणे त्याच्या घरी जाऊन, त्याचा आश्चर्याचा धक्का द्यायचा, असं मी ठरवलं. त्यानुसार दोन मित्रांना घेऊन मी त्याच्या घराकडे निघालो. दुरूनच तो दोन्ही हातात जड सामानाच्या पिशव्या घेऊन, घरी चालत जात असल्याचे दिसले. आमच्याकडे त्याची पाठ असल्याने त्याने आम्हाला पाहिले नव्हते. मग थोड्यावेळाने आम्ही त्याच्या घरी पोचलो. त्यानेच दार उघडले. त्यावेळी तो बर्म्युडा व बनियनवर होता व अंगातून त्याच्या घामाच्या धारा वाहत होत्या. एका बादलीत पाणी घेऊन, तो फरशी पुसत होता.
‘‘अहो कितीवेळ फरशी पुसताय. आता स्वयंपाक करा आणि आजतरी भाज्या नीट शिजवा. नाहीतर नेहमीप्रमाणं कच्चंच खायला लावाल.’’ बेडरूममधून बायकोचा आवाज आल्याने त्याची थोडी चलबिचल झाली.
‘‘शरीराला व्यायाम महत्त्वाचा असतो. मग तो घरची कामं करून करा नाहीतर जिममध्ये जाऊन करा. वेटलिफ्टिंगसाठी मी दोन्ही हातात सामानाच्या पिशव्या घेऊन येतो. दुकानांपर्यंत चालत जात असल्याने तेवढंच वॉकिंगही होतं. स्वतः मीच स्वयंपाक करत असल्याने अर्धवट कच्च्या भाज्याही खाव्या लागतात.’’ श्रीधरने म्हटले. तेवढ्यात मनोजने त्याच्या केसांकडे लक्ष वेधले.
‘‘काळेभोर केस दिसण्यासाठी दर पंधरा दिवसांनी न चुकता ‘हेअरडाय’ करतो.’’ श्रीधरचं बोलणं ऐकून, त्याच्या चिरतारूण्याचं ‘रहस्य’ कळल्याने आम्ही ‘डाय’ न केलेल्या डोक्यावर हात मारला.