
विद्यार्थ्यांनी जंगलात केले पांडवबत्तीचे प्रात्यक्षिक
पिंपरी, ता. ४ : प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय आकुर्डी येथील पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थी अभ्यास सहलीनिमित्त ताम्हिणी घाट येथे गेले होते. महाविद्यालयाचे वनस्पती संशोधक प्रा. किशोर सस्ते यांनी विद्यार्थ्यांना पांडवबत्तीचे प्रात्यक्षिक दाखविले. प्रज्वलित झालेली हिरवी ओली पाने पाहून विद्यार्थी वर्गाच्या आनंदाला पारावार उरला नाही.
आतापर्यंत पाडंवबत्ती वनस्पतीचे अग्रभाग आणि पाने किंचित गोडेतेल लावल्यावर प्रज्वलित होतात एवढेच माहीत होते. याबद्दलची काही माहिती फक्त फेसबुक, इंस्टाग्राम, युट्युब आणि इतर सामाजिक माध्यमांवर फिरत होती. मुलांना पाडंव बत्ती वनस्पती कोणती आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता होती. त्यामुळे याची पाने खरोखर पेट घेतात का याची शहानिशा करण्यात आली. हिरवी पाने बराच वेळ तेवत होती. या वनस्पतीचे प्रज्वलित केलेल्या दिव्यास पांडवबत्ती म्हणतात. या वनस्पतींच्या पानांवर घनदाट मखमली लव आणि इसेंशीअल आणि टर्पेन्टाइन ऑइल आहे.
यावेळी प्रा. किशोर सस्ते, ज्ञानेश्वर थोरे, सीमा ढोकणे, पल्लवी चंपानेरीया, डॉ. सायमा मीर, प्रियांका शहा, निशी दिक्षीत, सचिन गोळसे आणि विद्यार्थी उपस्थित होते.