गुन्हे वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुन्हे वृत्त
गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त

sakal_logo
By

पिंपरीतील गोडाऊनमधून
पावणे दोन लाखांचा माल लंपास

पिंपरी : लोखंडी शटर उचकटून आत शिरलेल्या चोरट्याने पावणे दोन लाख रुपये किमतीचा माल लंपास केला. ही घटना पिंपरी येथे घडली. या प्रकरणी रमेश लक्ष्मणदास जेठवानी, व कैलास लक्ष्मणदास जेठवानी (दोघेही रा. पावर हाऊस रोड , पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांचे पिंपरीतील गुरुनानक मार्केट येथे इलेक्ट्रिक पंप, इलेक्ट्रिक केबलचे गोडाऊन आहे. दरम्यान, दोन ते तीन अज्ञात चोरट्याने गोडाऊनच्या शटर खालील सिमेंटच्या कठड्यास लावलेल्या विटा काढल्या. तसेच लोखंडी शटर उचकटून चोरटे आत शिरले. त्यानंतर गोडाऊनमधील एक लाख ७४ हजार ९७५ रुपये किमतीचे इलेक्ट्रिक पंप व इलेक्ट्रिक केबलचे चोरून नेले. याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

गुटखा विक्रीप्रकरणी दोघांना अटक
गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने डांगे चौक येथे केलेल्या कारवाईत गुटखा विक्री करणाऱ्या दोघांना जेरबंद केले. तर दोघांवर गुन्हा दाखल आहे. इरफान ताहीर तांबोळी (वय ३२, रा. गजानन नगर, काळेवाडी फाटा, मूळ- उस्मानाबाद), सादिक गफूर तांबोळी (वय २७, रा. सुदर्शन कॉलनी, वाकड रोड, वाकड) अशी अटक केलेल्यांची नावे असून, हुसेफा खान, प्रदीप गुप्ता या दोघांवर गुन्हा दाखल आहे. इरफान याने त्याच्या ताब्यात गुटखा व पानमसाला याची विक्रीसाठी साठवणूक केली. पथकाने त्याच्याकडून एक मोबाईल व दोन पोत्यांमधील गुटखा असा एकूण ५४ हजार ९८१ रुपये किमतीच्या मुद्देमाल जप्त केला. हा माल त्याला आकुर्डीतील हुसेफ खान याने आणून दिल्याचे सांगितले. तसेच डांगे चौक उड्डाणपुलाखाली एमएसईबी डीपीच्या बाजूला असलेल्या टपरीत आरोपी सादिक याने दोन हजार ९३३ रुपये किमतीचा गुटखा साठवून ठेवल्याचे समोर आले. हा माल त्याला प्रदीप आणून देत असल्याचे त्याने सांगितले. या दोन कारवाईत ५७ हजार ९१४ रुपये किमतीचा मुद्देमाल पथकाने जप्त केला. वाकड पोलिस अधिक तपास करीत आहेत.

गांजा बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक
बेकायदा गांजा बाळगल्याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी दोघांना अटक केली. ही कारवाई पिंपरी येथे करण्यात आली. सुनीत अशोक कारंडे (वय २५, रा. स्पाईन रोड, भोसरी) व रोहन शिवाजी टेंबाळे (वय २२, रा. संत तुकारामनगर, पिंपरी ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिस परिसरात गस्त घालत असताना संत तुकारामनगर येथे रस्त्यालगत दोघेजण गांजा ओढताना आढळले. त्यांचे तपासणी केली असता त्यांच्याकडे गांजा सापडला. पिंपरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

बावधनला ऐवज लंपास
मोबाईल चार्जिगला लावले असता मोबाईल व त्यामधील रोकड असा एकूण ३८ हजारांचा ऐवज लंपास केला. ही घटना बावधन येथे घडली. या प्रकरणी आदिनाथ ज्ञानेश्वर मेचकर (रा. बावधन, मूळ-तळेघर, आंबेगाव ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी व त्यांचा मित्र यांचा हे ऑक्सफर्ड हेलिपॅड येथील उघड्या हॉलमध्ये मंडप डेकोरेशनचे काम करण्यासाठी गेले होते. त्याठिकाणी त्यांनी मोबाईल चार्जिंगला लावले असताना चोरट्याने फिर्यादी यांचा पाच हजारांचा मोबाईल तसेच
त्याच्या कव्हरमध्ये ठेवलेली बारा हजारांची रोकड लंपास केली. तसेच त्यांचे मित्र वेदांत मेमाणे यांचा सात हजार रुपये किमतीचा मोबाईल व त्याच्या कव्हरमध्ये ठेवलेले चौदा हजार रुपये असा एकूण ३८ हजारांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.