
जादा परताव्याचे आमिष; गुंतवणुकीच्या नावाखाली ‘भुलभुलैय्या’
पिंपरी - शेअर ट्रेंडिंग, (Share Trading) नवीन कंपनीची स्थापना, नवीन प्रकल्प, (New Project) सोने (Gold) यासह अमुक एखाद्या योजनेत गुंतवणूक (Investment) केल्यास जादा परताव्याचे आमिष दाखविण्याचे उद्योग भामट्यांकडून जोरात सुरू आहेत. जादा पैशांच्या हव्यासापोटी अशा ‘भुलभुलैय्याला’ बळी (Cheating) पडून पैसे गुंतविणाऱ्यांवर पश्चात्तापाची वेळ येत आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये मागील पंधरा दिवसांत भामट्यांनी दहा जणांना तब्बल सव्वा कोटींना गंडा घातल्याची प्रकरणे समोर आली आहेत.
कमी वेळेत कमी पैसे गुंतवून जास्त पैसे कमविण्याचा हव्यास वाढत आहे. कष्ट न करता पैसे मिळविण्याची अपेक्षाही वाढली आहे. याचाच गैरफायदा काही भामटे घेतात. प्रत्यक्ष अथवा वेबसाईटवर वेगवेगळ्या योजना पहायला मिळतात. यामध्ये गुंतविलेल्या रकमेवर जादा परताव्याचे आमिष दाखवले जाते. सुरुवातीला त्याप्रमाणे पैसेही दिले जातात. संबंधित व्यक्तीचा विश्वास बसल्यानंतर इतरांनाही याबाबत माहिती देत पैसे गुंतवण्यास भाग पाडले जाते. मात्र, नंतर पैसे न देता फसवणूक केली जाते.
अशाप्रकारे वेगवेगळ्या माध्यमातून पैसे उकळण्याचे प्रकार सुरू असून, अनेकजण अशा फसवणुकीला बळी पडत आहेत.
पश्चात्तापाची वेळ
अधिक पैशांच्या मोहापायी एखाद्या योजनेबाबतची खात्री केली जात नाही. कष्ट करून जमविलेले पैसे समोरचा व्यक्ती सांगेल त्याप्रमाणे गुंतविले जातात. सुरुवातीला समाधान वाटते. मात्र, त्यातील सत्य समोर आल्यानंतर पश्चात्तापाची वेळ येत आहे. जादा परतावा, स्कीम, ऑफर, जादा परतावा, स्कीम, ऑफर, फ्री असे ऐकले अथवा एखाद्या ठिकाणी वाचले तरी अनेकांची तिकडे पावले वळतात. भामटे या पद्धतीने जाळे टाकतात व त्यामध्ये सामान्य नागरिक अडकतात.
चार महिन्यांतील घटना
जानेवारी - ४४
फेब्रुवारी - ४१
मार्च - ४१
एप्रिल - ३९
या महिन्यातील काही घटना
- शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून दाम्पत्याने मिळून सहा जणांची एकूण ८० लाखांची फसवणूक केली
- अस्तित्वात नसलेल्या कंपनीत पैसे गुंतविण्यास सांगत जादा परतावा देण्याच्या आमिषाने गोपाल व्यंकट राजू यांची २१ लखाची फसवणूक
- शेअर मार्केट कंपनी असल्याचे भासवून प्रकाश रंगराव पाटील यांच्यासह त्यांच्या मित्राची साडे सात लाखांची फसवणूक
- व्यवसायात जादा नफा मिळविण्याचे आमिष दाखवून सुमीत अनिल विश्वास यांची २४ लाखांची फसवणूक
- क्रिप्टोकरन्सी स्वस्तात देण्याच्या आमिषाने पुष्पराज गुप्ता यांची पाच लाखांची फसवणूक
Web Title: Todays Latest Marathi News Pne22h13696 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..