
आढलेत मंडलाधिकाऱ्याला लाच स्वीकारताना अटक
सोमाटणे, ता. ७ ः लाच घेतल्याप्रकरणी आढले येथील मंडल कार्यालयातील महिला मंडल अधिकाऱ्यासह एकास अटक करण्यात आली.
मंडल अधिकारी संगीता राजेंद्र शेरकर व खासगी सहकारी व्यक्ती संभाजी लोहोर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. शिरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका व्यक्तीच्या भडवली येथील खरेदी केलेल्या जमिनीची सातबारा उताऱ्यावर नाव नोंद करण्यासाठी मंडल अधिकारी संगीता शेरकर व संभाजी लोहोर यांनी तक्रारदाराकडे वीस हजार रुपये लाच मागितली होती. संबंधित तक्रारदाराने याची माहिती पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली. या तक्रारीवरून संबंधित विभागाचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे व अप्पर पोलिस अधीक्षक सूरज गुरव यांच्या पथकाने सापळा लावून मंगळवारी संगीता शेरकर व संभाजी लोहोर यांना आढले येथील कार्यालयात लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. त्यांना अटक करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास शिरगाव पोलिस करीत आहेत.