धरण उशाशी, कोरड घशाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धरण उशाशी, कोरड घशाला
धरण उशाशी, कोरड घशाला

धरण उशाशी, कोरड घशाला

sakal_logo
By

पवनानगर, ता. ७ ः पवना धरण हाकेच्या अंतरावर असतानाही ग्रामस्थांना अनियमित पाणीपुरवठा आणि दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. ग्रामस्थांच्या मते ग्रामपंचायत प्रशासन पाणीपुरवठ्याची कार्यवाही अपेक्षेप्रमाणे करीत नाही. तर पाण्याच्या टाकीच्या स्वच्छतेचे काम सुरू असल्याने पाणीपुरवठा अनियमित झाल्याचे पदाधिकाऱ्यांकडून वतीने सांगण्यात येते.

वारू ब्राम्हणोली ग्रुप ग्रामपंचायतीच्या अंतर्गत असणाऱ्या ब्राम्हणोलीला कायम पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. त्यामुळे पवना धरण उशाला आणि कोरड घशाला अशी म्हणण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. पवना धरणाच्या भिंतीलगत ब्राम्हणोली गाव असून, या गावात कर्मचारी, सरपंच व ग्रामसेवक यांच्यात समन्वय नसल्याने पिण्याचा पाणीपुरवठा अनियमित होत आहे. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

टाकीत आढळल्या अळ्या
गावात तीन दिवस पाणी न आल्याने गावचे ग्रामस्थांनी सरपंच, ग्रामसेवक व कर्मचाऱ्यांना विचारणा केली. त्यावेळी पाण्याची टाकी स्वच्छ करण्यासाठी पाणी सोडले नाही. परंतु ग्रामस्थांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता त्या टाकीत जंतू व अळ्या आढळल्याचे निदर्शनास आले.

ग्रामसेवक म्हणतात...
त्यानंतर ग्रामसेवकांना विचारले असता कर्मचाऱ्यांना वारंवार याबाबत सूचना देण्यात येतात. परंतु गावातील ग्रामपंचायत सदस्य सहकार्य करीत नाही. तसेच त्यांच्या समन्वयाअभावी अशी परिस्थिती उद्‍भवली आहे.

...तर हंडा मोर्चा काढणार
माजी उपसरपंच मारुती काळे म्हणाले, ‘‘गावात कायम पिण्याच्या पाण्याची ओरड असते. ग्रामपंचायतीचा कर्मचारी, सरपंच, ग्रामसेवकाचे ऐकत नाही. उलट ग्रामस्थांना अरेरावी करून उत्तरे ऐकवली जातात. पाणीपुरवठा नियमित न झाल्यास गटविकास अधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्यात येईल.’’

कोट
‘‘पाण्याची टाकी स्वच्छ करण्याचे काम सुरू होते. त्यामुळे दोन पाण्यात अनियमितता आढळून आली. पुढील काळात नियमित पाणी मिळेल.’’
- शाहिदास निंबळे, सरपंच, ब्राम्हणोली

‘‘घरातील नळाच्या पाण्यात दूषित पाणी आले आणि त्यामध्ये अळ्या सापडल्या. याचा अर्थ टाकी स्वच्छ केली जात नाही. ग्रामपंचायत अधिकारी व सदस्य ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळत आहेत.’’
- सोनू शांताराम काळे, ग्रामस्थ

‘‘आमचे गाव धरणाच्या भिंतीला लागून आहे. तरीदेखील गावातील व माळवाडी येथील नागरिकांना अनियमित पाणी मिळते. त्यामुळे महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागते.’’
- सुवर्णा तुकाराम काळे, महिला

ब्राम्हणोलीची लोकसंख्या ः ९००
पाण्याच्या टाकीची क्षमता ः ५००० लिटर

९८१० , ९८११