
सफाई कर्मचाऱ्यांनी घेतले योग व प्राणायमाचे धडे
पिंपरी, ता. ७ ः स्वच्छ सर्वेक्षण उपक्रमांतर्गत महापालिका सेवेतील सफाई कर्मचाऱ्यांना आरोग्य विषयक प्रशिक्षण देण्यात आले. पतंजली योग समितीतर्फे प्रात्यक्षिकांसह योग व प्राणायमचे महत्त्व सांगितले. कर्मचाऱ्यांनीही योग व प्राणायाम केले. प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. अतुल देसले यांनी आरोग्यविषयक, पतंजली योग समितीचे डॉ.अनिल जगताप यांनी योग व प्राणायाम याबाबत मार्गदर्शन केले. सफाई कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी मोफत रोजगाराभिमुख शिक्षण व कोर्सबद्दल सिंबायोसिस स्किल्स ॲड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या प्रियांका कापोरे यांनी माहिती दिली. नोव्हेंबरमध्ये सर्वोत्तम कामगिरी केलेल्या अ आणि ब क्षेत्रीय कार्यालयातील सफाई कर्मचाऱ्यांना सन्मानित केले. यावेळी उपआयुक्त अजय चारठाणकर, क्षेत्रीय अधिकारी सुचेता पानसरे, सोनम देशमुख, सहायक आरोग्य अधिकारी राजू साबळे, एम. एम. शिंदे, मुख्य आरोग्य निरीक्षक अंकुश झिटे, सुधीर वाघमारे, कॅम फाउंडेशनचे देवेंद्र शेंद्रे उपस्थित होते. पौर्णिमा भोर यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी चारठाणकर म्हणाले, ‘सफाई कर्मचारी सातत्याने साफसफाईचे काम करत असल्यामुळे त्यांना अनेक व्याधी जडतात. हे टाळण्यासाठी काम करताना योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. कामाएवढेच स्वतःचे आरोग्यही तितकेच महत्त्वाचे असून त्याबाबतची योग्य खबरदारी घेणे गरजेचे आहे. महापालिकेच्या सर्व सफाई कर्मचाऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ घेता यावा तसेच जास्तीत जास्त सफाई कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना ‘स्वाभिमान’ या उपक्रमाचा लाभ घेता यावा यासाठी महापालिका प्रयत्न करत आहे. तसेच सफाई कर्मचाऱ्यांच्या अडचणी आणि प्रश्न समजून घेऊन त्यावर काम करण्यासाठी महापालिका सातत्याने कार्यरत आहे.’’