गुन्हेगारी टोळ्यांचा उच्छाद; नागरिक दहशतीखाली, खून करण्यासह अंदाधुंद गोळीबार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Criminal Gang
गुन्हेगारी टोळ्यांचा उच्छाद नागरिक दहशतीखाली, भररस्त्यात खून करण्यासह अंदाधुंद गोळीबार

PCMC Crime : गुन्हेगारी टोळ्यांचा उच्छाद; नागरिक दहशतीखाली, खून करण्यासह अंदाधुंद गोळीबार

पिंपरी - वाहनांची तोडफोड, नंग्या तलवारी नाचवून, दमदाटी करीत राडा घालत टोळ्यांनी दहशत माजवल्याच्या घटना शहरात घडल्याची नोंद आहे. मात्र, आता भररस्त्यात गोळीबार करून, जीव घेण्यासह भरदिवसा अंदाधुंद गोळीबार करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल गेली आहे. आठवडाभरात पाठोपाठ घडलेल्या अशा घटनांमुळे नागरिक दहशतीखाली आहेत. अशा घटना रोखण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.

शहराच्या विविध भागात गुन्हेगारी टोळ्या कार्यरत आहेत. त्यांच्याकडून परिसरात दहशत माजवण्यासह वर्चस्ववादातून टोळीयुद्ध भडकल्याचेही प्रकार घडतात. यामध्ये खून, प्राणघातक हल्ला अशा गंभीर घटनाही घडल्या आहेत.

यातील गुन्हेगारांना हत्यारेही सहज उपलब्ध होतात. पिस्तूल बाळगून दहशत निर्माण केली जाते. आता तर या पिस्तुलातून गोळ्या झाडून समोरच्याला संपवण्याचे प्रकारही घडू लागल्याने शहरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे दिसून येते.

आठवड्यात दोन घटना

सहा दिवसांपूर्वीच चिंचवडमधील मोहननगर येथे विशाल गायकवाड या सराईत गुन्हेगाराचा भररस्त्यात गोळ्या झाडून तसेच हत्याराने वार करून खून झाला. ही घटना ताजी असतानाच चिंचवड लिंकरोड, भाटनगर, बौद्धनगर येथे सराईत गुन्हेगाराने अंदाधुंद गोळीबार केला.

ऑक्टोबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार, आयुक्तालयांतर्गत असलेल्या विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ६३ टोळीचे ५०८ सदस्य असल्याची माहिती आहे. यातील ४७ टोळ्यांवर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोका) कारवाई केलेली आहे.

तडीपार गुन्हेगारांचा वावर

सराईत गुन्हेगाराला पोलिसांकडून तडीपार केला जाते. त्यानंतर त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवणे आवश्यक असते. मात्र, तसे होत नसल्याने काही दिवसातच तो गुन्हेगार पुन्हा हद्दीत वावरत असल्याचे समोर येते. त्यामुळे कारवाई केवळ कागदोपत्रीच राहते का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पोलिस ठाणेनिहाय टोळी व सदस्य (ऑंक्टोबरपर्यंतची माहिती)

पोलिस ठाणे टोळी सदस्य

पिंपरी १० ८४

चिंचवड २ ८

एमआयडीसी भोसरी ३ ११

निगडी ८ ५६

दिघी २ १०

चाकण ३ २८

वाकड १३ ८५

हिंजवडी १ २५

देहूरोड ६ ५३

तळेगाव दाभाडे ५ ५८

तळेगाव एमआयडीसी १ ६

चिखली ५ ३७

रावेत १ १२

सांगवी १ १४

म्हाळुंगे १ ११

शिरगाव १ १०

एकूण ४७ टोळ्यांवर मोका

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एकूण टोळ्यांपैकी ४७ टोळ्यांवर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोका) कारवाई केली आहे.

टोळीवरील मोका कारवाई

वर्ष किती गुन्ह्यात आरोपी

२०१८ ०१ ०७

२०१९ ०९ ५९

२०२० ०९ ५०

२०२१ २६ १८७

२०२२ (ऑक्टो. पर्यंत) १४ १०१