पिंपरी राष्ट्रवादी शिबिर
बुथ कमिट्यांवर
लक्ष केंद्रीत करा
विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या सूचना
पिंपरी, ता. ११ ः ‘‘महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभागांचा विचार करा. प्रत्येक प्रभागाचे प्रश्न वेगळे आहेत. वाकडमध्ये आयटीयन्स राहतात. त्यांचे प्रश्न वेगळे आहेत. चऱ्होलीचे प्रश्न वेगळे आहेत. त्यासाठी बुथ कमिट्यांवर लक्ष द्या,’’ अशा सूचना विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केल्या.
पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे चिंचवड वाल्हेकरवाडी येथे आयोजित ‘विचार वेध’ कार्यकर्ता प्रबोधन शिबिराच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. माजी मंत्री छगन भुजबळ, आमदार अण्णा बनसोडे, सुनील शेळके, माजी आमदार विलास लांडे, पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे आदी उपस्थित होते. पवार म्हणाले, ‘‘भाजप नेते, मंत्री, राज्यपाल महापुरुषांविषयी बेताल वक्तव्य करीत आहेत. सीमाप्रश्न उपस्थित झाला आहे. काही प्रकल्प राज्याबाहेर गेले आहेत. चाकण परिसरात एक प्रकल्प उभारण्यात येणार होता. दीड लाख लोकांना रोजगार मिळणार होता. पण, ते प्रकल्प गुजरातला गेले आहेत. त्याचाही विचार करायला हवा. सरकारच्या विरोधात आपल्याला लढायचे आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांच्याकडे जायला हवे. केवळ निवडणुकीपुरते जाऊ नका. तर, त्याच्या समस्या कायमस्वरुपी सोडवत राहा. तरुण पिढीचा विचार करून नियोजन करा. त्यांच्या कामांनाही प्राधान्य द्या. आता सोशल मीडियाचे यूग आहे. त्याचा प्रभावी वापर करा.’’
लोकशाही व राजकीय षडयंत्र विषयावर भुजबळ म्हणाले, ‘‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भीक मागितली नाही. त्यांनी तत्त्वासाठी मदत नाकारली. पण, काही जण केवळ बदनामी करत आहेत. खरं बोललो की इडी वैगरे चौकशी लागते. लोकांना अडकवून ठेवायचे, असे धोरण आहे. महाराष्ट्रातील कारखाने, प्रकल्प गुजरातला जात आहेत. गाव कर्नाटकला नेत आहेत. मेक इंडिया असले काही नाही आहे. धर्म ही अफूची गोळी आहे, त्यामध्ये सर्वांना गुंतवून ठेवले जात आहे. यामुळे महाराष्ट्र व मुंबईचे महत्त्व कमी होणार आहे. रोजगार मिळणार नाही. ही सर्व दादागिरी सुरू आहे आणि सरकार फक्त ऐकूण घेत आहे.’’
तज्ज्ञांचे मार्गदर्शन
‘सकाळ’चे संपादक सम्राट फडणीस (सोशल मीडिया), कार्यकारी संपादक शीतल पवार (राजकीय पक्ष व मीडिया तंत्रज्ञान), ज्येष्ठ विचारवंत हरी नरके (आरक्षण), खासदार कुमार केतकर (भारतीय अर्थव्यवस्थेची दुरवस्था), ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे (भारताच्या निर्मितीत गांधी, नेहरू, आंबेडकर, पटेलांचे योगदान) यांनी मार्गदर्शन केले.
नसलेल्यांची नोंद ठेवा
मार्गदर्शन करत असताना अजित पवार यांनी विचारले, ‘अरे, डब्बू कुठंय?’ शिबाराला प्रमुख कार्यकर्ते कोण कोण आलेले नाहीत. त्यांची माहिती ठेवा. ते खरंच लग्नाला केले आहेत की अन्य कुठे गेले आहेत, यावर लक्ष ठेवा.’ यामुळे कार्यकर्ता शिबिराला दांडी मारणाऱ्यांची ‘हजेरी’ घेणार हा अप्रत्यक्ष संदेश पवार यांनी दिला.
--