सुधारित विकास योजनेसाठी नागरिकांनी सूचना कळवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुधारित विकास योजनेसाठी नागरिकांनी सूचना कळवा
सुधारित विकास योजनेसाठी नागरिकांनी सूचना कळवा

सुधारित विकास योजनेसाठी नागरिकांनी सूचना कळवा

sakal_logo
By

पिंपरी, ता. १२ः ‘‘महाराष्ट्र शासनाच्या नगररचना आणि मूल्य निर्धारण विभागातर्फे महापालिकेचे सुधारित प्रारूप विकास योजना तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी शहरातील आवश्यक सेवासुविधा प्रस्तावित करण्यासाठी नागरिकांनी विविध माध्यमातून आपले मत विकास योजना कार्यालयास कळवावे,’’ असे आवाहन नगररचना विभागाचे उपसंचालक विजय शेंडे यांनी केले आहे. शहरात नव्याने करावयाची विकास कामे, आरक्षणे, नियोजित प्रकल्पांच्या अनुषंगाने प्रारूप विकास योजना तयार करण्याचे काम महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियमाद्‍वारे करण्यात येते. महापालिकेच्या विद्यमान जमीन वापराबाबत नकाशा तयार करण्यात आला आहे. तो महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रकाशित केला आहे. प्रारूप विकास योजना सुधारित करण्याचे काम शेवटच्या टप्प्यात आहे. अंतिम विकास योजना प्रसिद्ध करण्याच्या दृष्टिकोनातून प्रारूप विकास योजनेचे महापालिकेला लवकरच हस्तांतर करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर आवश्यक सेवा सुविधा प्रस्तावित करण्यासाठी नागरिकांनी आपले मत किंवा सूचना कळवाव्यात.

प्रारूप विकास योजनेच्या अनुषंगाने विविध शासकीय विभाग, भागधारक संस्था, महापालिकेच्या विविध विभागांनी भविष्यात लागणाऱ्या सेवा सुविधांच्या जागांची मागणी नगररचना आणि मूल्य निर्धारण विभागाकडे सादर केली आहे. विकास योजना तयार करण्याच्या प्रक्रियेत नागरिकांचा जास्तीत जास्त सहभाग असावा. त्यांच्या आशा आकांक्षांचे प्रतिबिंब प्रारूप विकास योजनेत दिसावे. तसेच विकास आराखडा लोकाभिमुख व दोषविरहित होण्यास मदत व्हावी यासाठी नागरिकांनी मत कळवावे.
- विजय शेंडे, उपसंचालक, नगररचना विभाग

नागरिकांनी मत व सूचना नोंदविण्यासाठी
लिंक ः ddtppcmcdp_pune@rediffmail.com
पत्ता ः उपसंचालक, नगररचना, विकास योजना विशेष घटक, महापालिका कार्यालय, पिंपरी किंवा महापालिका गोल मार्केट इमारत, तिसरा मजला, संत तुकारामनगर, पिंपरी.