पिंपरी-चिंचवड शहरात शक्तिप्रदर्शनाचे ‘राजकारण’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BJP
शहरात शक्तिप्रदर्शनाचे ‘राजकारण’

PCMC Politics : पिंपरी-चिंचवड शहरात शक्तिप्रदर्शनाचे ‘राजकारण’

पिंपरी - नेत्यांची वक्तव्ये, त्यांच्या निषेधासह नागरी सुविधांच्या मागणीसाठी पुकारलेला बंद, निदर्शने, मोर्चे अशा विविध घटनांमुळे गेल्या आठ दिवसांत शहरातील राजकीय व सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. प्रत्येक घटना ‘राजकीय’ दिसत असून, भारतीय जनता पक्ष व बाळासाहेबांची शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, वंचित बहुजन आघाडी आदी असे वातावरण निर्माण झाले आहे. एकमेकांना शह-काटशह दिला जात आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांवर उतरून शक्तीप्रदर्शन करीत एकमेकांना जणू आपली ‘ताकद’ दाखवली जात आहे.

महापालिका निवडणूक केव्हाही जाहीर होऊ शकते, अशी स्थिती आहे. २०१७ ते २०२२ अशी पाच वर्ष महापालिकेत सत्ताधारी असलेला भारतीय जनता पक्ष पुन्हा सत्ता मिळवण्याच्या तयारीत आहे. त्याला बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची साथ मिळाली आहे. तर, महापालिका पुन्हा ताब्यात घेण्याची व्यूहरचना राष्ट्रवादी कॉंग्रेस आखत आहे. त्यांना कॉंग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची साथ आहे. वंचित बहुजन आघाडी महापालिकेत खाते उघडण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहे. त्यात बहुजन समाज पक्ष, समाजवादी पक्ष, आरपीआय अन्य गटांचाही समावेश आहे. आरपीआय (आठवले गट) व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी सावध भूमिका घेतल्याचे दिसत आहे.

मात्र, भाजप व मित्र पक्ष विरोधात महाविकास आघाडी असेच चित्र दिसत आहे. त्यामुळे शहराशी निगडित पाणीप्रश्न, रस्ते, डांबरीकरण, निविदा, विविध प्रकल्प अशा प्रकरणांमधील तृटी शोधून त्या चव्हाट्यावर आणण्याचे काम महविकास आघाडी व अन्य पक्ष करीत आहेत. त्यांना शह देण्यासाठी भाजप व बाळासाहेबांची शिवसेना तत्पर असल्याचे दिसत आहे. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने नुकताच मेळावा घेऊन राजकीय ताकद अजमावली. त्यात राज्यपाल कोश्यारींसह भाजपचे मंत्री व नेत्यांकडून महापुरुषांविषयी अपशब्द वापरले जात आहेत. त्याविरुद्ध आवाज उठवला जात आहे. त्याचाच एक प्रकार म्हणजे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेले शाईफेक प्रकरण. त्यातील तिघांना अटक, त्यांच्या सुटकेसाठी मोर्चा व शाईफेक प्रकरणाच्या निषेधार्थ आंदोलन अशा घटना घडत असून, त्यातून शहरातील राजकीय व सामाजिक वातावरण ढवळून निघत आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न वारंवार निर्माण होत आहे.

अशा घटना, अशी निदर्शने

८ डिसेंबर - राज्यपालांसह भाजप नेत्यांनी महापुरुषांबाबत अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ भाजप व मित्रपक्ष वगळता सर्वपक्षीय बंद, पिंपरी चौकात निदर्शने

९ डिसेंबर - पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबाबत वक्तव्य केल्याने त्यांना शहरात पाय ठेऊ न देण्याचा विविध पक्षांचा व सामाजिक कार्यकर्त्यांचा इशारा

१० डिसेंबर

- शिवसेना, कॉंग्रेस, वंचितच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी काळे झेंडे दाखवत पाटील यांचा निषेध

- पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर चिंचवडमध्ये शाईफेक

- शाईफेकप्रकरणी समता सैनिक दलाच्या दोन व वंचित बहुजन आघाडीच्या एका कार्यकर्त्यास अटक

११ डिसेंबर

- शाईफेक घटनास्थळी नियुक्ती तीन पोलिस अधिकारी व सात कर्मचारी निलंबित, दोघांची बदली

- शाईफेक प्रकरणी अटकेतील तिघांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी वंचितसह सर्वपक्षीय मोर्चा

- शाईफेक प्रकरणाच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाचे मोरवाडी कार्यालयाबाहेर निदर्शने

१२ डिसेंबर

- हिंदू देवदेवता व संतांविषयी वादग्रस्त विधान केल्याने शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांचा निषेध

- अंधारे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची वारकरी साहित्य परिषदेची देहूरोड पोलिसांकडे मागणी