माझ्या यशात सहकलाकारांचा मोठा वाटाः प्रशांत दामले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माझ्या यशात सहकलाकारांचा मोठा वाटाः प्रशांत दामले
माझ्या यशात सहकलाकारांचा मोठा वाटाः प्रशांत दामले

माझ्या यशात सहकलाकारांचा मोठा वाटाः प्रशांत दामले

sakal_logo
By

पिंपरी, ता. १३ ः ‘‘माझ्या यशात निर्माते, दिग्दर्शक, सहकलाकार यांचा वाटा आहे,’’ अशी भावना ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेतर्फे प्रशांत दामले यांचा नाट्य परिषदेचे शाखाध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्या हस्ते मानपत्र, शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्या वेळी मिलिंद कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. आमदार उमा खापरे यांचा साडीचोळी देऊन सत्कार केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहाराध्यक्ष अजित गव्हाणे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशचे रविकांत वर्पे, अभिनेत्री ब्रिंदा पारेख, राजेंद्र बंग, सुहास जोशी उपस्थित होते. दामले म्हणाले, ‘‘चिंचवडच्या संघवी केसरी महाविद्यालयात शिक्षण घेत असताना ‘काका किश्याचा’ नाटकामध्ये काम केले. तेथून पुढे माझी अभिनयाची वाटचाल सुरू झाली. यामध्ये पिंपरी-चिंचवडचा मोठा वाटा आहे. माझा अभिनय म्हणजे दिग्गज कलावंत शरद तळवळकर, राजा गोसावी, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या अभिनयाची मिसळ आहे. प्रत्येकाकडून काही चांगले घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडून कमरेखाली विनोद करायचा नाही याची शिकवण, दक्षता आणि जाण मिळाली.’’ सूत्रसंचालन आणि मानपत्राचे वाचन श्रीकांत चौगुले यांनी केले. किरण भोईर यांनी आभार मानले. यावेळी ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ नाट्य प्रयोगाचे मोफत आयोजन केले होते.

कौतुकाचे बोल
‘‘प्रशांत दामले हे रंगभूमीचा श्वास आहेत. ज्याप्रमाणे आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे यांनी कलाक्षेत्रात नावलौकिक मिळवला त्याप्रमाणे पुढील पिढी दामले यांच्या कलेचा वारसा पुढे चालवतील,’’ असे मत नाट्य परिषदेचे शाखाध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी व्यक्त केले. राजकारण आणि सांस्कृतिक क्षेत्र हे दोन्ही वेगळे ठेवले आणि त्यामुळेच राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात काम करणे शक्य झाले, असेही त्यांनी स्पष्ट केले.