रेडझोन हद्दीतील सदनिकांची विक्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेडझोन हद्दीतील सदनिकांची विक्री
रेडझोन हद्दीतील सदनिकांची विक्री

रेडझोन हद्दीतील सदनिकांची विक्री

sakal_logo
By

पिंपरी, ता. १४ ः रेडझोन अर्थात प्रतिबंधित क्षेत्राच्या हद्दीत प्लॉटिंग करून गुंठेवारीने जमिनीची सर्रास विक्री केली जात आहे. त्यावर पक्की घरे, पत्राशेड उभारले आहेत. आता तर रेडझोन आणि उद्यान व मैदानाचे आरक्षण असूनही त्यावर गृहप्रकल्प उभारून सदनिकांची विक्री होत असल्याचा प्रकार तळवडेत उघडकीस आला आहे.
देहूरोड दारूगोळा कारखाना व दिघीतील लष्करी आस्थापना यामुळे शहरात तळवडे, त्रिवेणीनगर, चिखली व निगडीचा काही भाग, दिघी, चऱ्होलीतील वडमुखवाडी, भोसरीतील चक्रपाणी वसाहत आदी भागात रेडझोन हद्द आहे. त्यातील जमिनींची बंदी असूनही गुंठेवारीनुसार सर्रासपणे विक्री सुरू आहे. त्यावर पक्की घरे बांधली गेली आहेत. महापालिकेने अनधिकृत बांधकामे म्हणून दोन वर्षांपूर्वी कारवाई केली होती. आता त्यावर पुन्हा बांधकामे सुरू आहेत. तळवडे रेडझोन परिसरात गट क्रमांक १६७, १६८ मध्ये तब्बल ४५ इमारती बांधून त्यातील सदनिका व व्यावसायिक गाळ्यांची विक्री सुरू आहे. त्याबाबतच्या नोंदीही केल्या जात आहेत. विशेष म्हणजे बांधकाम सुरू असलेली जागा त्यापूर्वीच महापालिकेने उद्यान व खेळांच्या मैदानासाठी आरक्षित केलेली आहे. याकडे नोंदणी निबंधक व महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झालेले आहे.

एका जागेची पुन्हा विक्री
मोशीतील खडी मशिन रस्त्यालगत आम्ही वीस वर्षांपूर्वी चाळीस हजार रुपयांना एक गुंठा जागा विकत घेतली होती. संबंधित जमीनमालकाने ती जागा आम्हाला देण्यास नकार दिला आहे. आताच्या बाजारभावाप्रमाणे तो पैसे मागतो. आमच्याप्रमाणे अनेक लोकांचीही फसवणूक झाली आहे, अशी कैफियत पिंपरीतील दांपत्याने मांडली.

मुलासाठी घर बांधले
शहरातील वेगवेगळ्या भागात फिरून मी वस्तू विकते. त्यातून जमवलेल्या पैशातून अर्धा गुंठा जागा घेतली होती. घर बांधले होते. पण, दोन वर्षांपूर्वी कारवाई करून महापालिकेने ते पाडून टाकले होते. सर्व खर्च वाया गेला होता. रेडझोन हद्द आहे, हे आम्हाला माहीत नव्हते. आता मुलाचे लग्न करायचे आहे. पुन्हा घर बांधले आहे.

रेडझोन हद्दीत बांधकामास मनाई आहे. तळवडेत ४५ इमारती बांधून विक्री सुरू आहे. ही अनधिकृत बांधकामे काढून घ्यावीत अन्यथा कारवाईची नोटीस महापालिका फ क्षेत्रीय कार्यालयाने दिली होती. मात्र, कारवाई झालेली नाही. उलट, बांधकाम वेगात सुरू आहे. ही जागा उद्यान व खेळाच्या मैदानासाठी महापालिकेने आरक्षित केली आहे.
- हेमंत भोसले, सामाजिक कार्यकर्ते

तळवडे येथील जागेवर उद्यान व खेळाच्या मैदानाचे आरक्षण आहे. पण ती जागा अद्याप ताब्यात आलेली नाही. त्यामुळे तिच्या विक्रीवर निर्बंध लावता येत नाहीत. मात्र, त्यावर झालेले अनधिकृत बांधकाम काढण्याची सूचना क्षेत्रीय अधिकाऱ्यांना केली आहे. पोलिस बंदोबस्त मिळाल्यानंतर कारवाई केली जाईल.
- जितेंद्र वाघ, अतिरिक्त आयुक्त, महापालिका