लोणावळा-पुणे लोकल दिवसभर सुरू ठेवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोणावळा-पुणे लोकल  दिवसभर सुरू ठेवा
लोणावळा-पुणे लोकल दिवसभर सुरू ठेवा

लोणावळा-पुणे लोकल दिवसभर सुरू ठेवा

sakal_logo
By

पिंपरी, ता. १६ : लोणावळा-पुणे-लोणावळा या मार्गावर दुपारी बारा ते दोन या दरम्यान एकही रेल्वे धावत नाही. त्यामुळे विद्यार्थी, कामगारांची मोठी गैरसोय होत आहे. विद्यार्थ्यांचा वेळ जातो, अभ्यासही बुडतो. त्यासाठी लोणावळा-पुणे-लोणावळा या मार्गावर पूर्वीप्रमाणे दिवसभर रेल्वे गाड्या सोडाव्यात. सिंहगड एक्सप्रेसच्या बदललेल्या बोगी व्यवस्थेमुळे सीटांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे सकाळी पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत. त्यासाठी एक्स्प्रेसचे दोन कोच वाढविण्याची मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत केली.
संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. लोणावळा-पुणे-लोणावळा या प्रश्‍नाकडे सरकारचे लक्ष वेधताना खासदार बारणे म्हणाले, ‘‘कोरोना महामारीपूर्वी लोणावळा-पुणे या मार्गावर दिवसभर लोकल रेल्वे धावत होत्या. कोरोना काळात रेल्वेसेवा बंद केली होती. आता परिस्थिती पूर्वपदावर आल्याने सर्व रेल्वेगाड्या पूर्णपणे सुरू आहेत. परंतु, मावळ लोकसभा मतदारसंघातील लोणावळा-पुणे-लोणावळा दरम्यानच्या मार्गावर सर्व लोकल रेल्वे गाड्या अद्याप धावत नाहीत. सध्या लोणावळा-पुणे-लोणावळा दरम्यान सकाळी बाराच्या अगोदर काही रेल्वे गाड्या धावतात. दुपारी बारा ते दोन या वेळेत एकही रेल्वे गाडी धावत नाही. त्यामुळे या मार्गावरुन मोठ्या संख्येने प्रवास करणारे विद्यार्थी, सरकारी कर्मचारी, कामगार, औद्योगिक पट्टा असलेल्या तळेगाव दाभाडे, पिंपरी-चिंचवड भागातील सेकंड शिफ्ट केलेल्या कामगारांची मोठी गैरसोय होत आहे. विद्यार्थ्यांना दुपारी बारापासून दोनपर्यंत लोकलची वाट बघावी लागते. विद्यार्थ्यांचा वेळ जातो.

‘सिंहगड एक्स्प्रेसचे कोच वाढवा’
सिंहगड एक्सप्रेसच्या कोचची संख्या २०२० मध्ये १९ वरून कमी करत १६ केली. या बदललेल्या कोच व्यवस्थेमुळे सीटांची संख्या कमी झाली. ती १९०८ वरून १८१८ सीट संख्या झाली. कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर सिंहगड एक्सप्रेसमध्ये जनरल तिकिटांची सुविधा सुरू केली. ही सुविधा सुरू करताना सिंहगड एक्सप्रेसच्या कोचची संख्या पुन्हा दोनने कमी केली. आता केवळ १४ कोच आहेत. त्यामुळे सीटांची संख्या कमी होऊन तेराशे झाली आहे. दोन कोच कमी केल्याने पुणे-मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. सकाळी पुण्यातून मुंबईला जाणारी सिंहगड एक्स्प्रेस पहिली गाडी आहे. त्यामुळे हजारो प्रवासी या गाडीने मुंबईला जातात. सीटांची संख्या कमी असल्याने प्रवाशांना उभा राहून प्रवास करावा लागतो. यामध्ये लहान मुले, महिला प्रवाशांची संख्या अधिक असते. त्यामुळे सिंहगड एक्सप्रेसला दोन कोच वाढवून सोळा कोच करावेत. जेणेकरून जनरल कोचमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जागा उपलब्ध होईल.