
फरार आरोपी चार वर्षांनंतर जेरबंद
पिंपरी, ता. १५ : फ्लॅट विकत देण्याचे आमिष दाखवून आठ जणांना ५२ लाख ७३ हजारांचा गंडा घातला. फरार झालेल्या आरोपीला चार वर्षांनंतर जेरबंद करण्यात अखेर पोलिसांना यश आले. ही कारवाई गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने मोशी, प्राधिकरण येथे केली. महेश बापू लोंढे (वय ४२, रा. गुरव, पिंपरी, ता. कर्जत, जि. अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. लोंढे याने मिरॅकल ९, वडमुखवाडी या ठिकाणी फ्लॅट विकत देण्याचे आमिष दाखवून आठ जणांकडून ५२ लाख ७३ हजार ४३४ रुपये घेतले. त्यानंतर पैसे अथवा फ्लॅट न देता फसवणूक करून पसार झाला. याप्रकरणी दिघी तसेच एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात चार गुन्हे दाखल झाले. त्यानंतर हा आरोपी २०१८ पासून फरार होता. ठिकाणे बदलून व मोबाईल नंबर बदलून स्वतःचे अस्तित्व लपवत होता. दरम्यान तांत्रिक विश्लेषणावरून लोंढे हा मोशी प्राधिकरण येथील सेक्टर क्रमांक सहा येथे येणार असल्याची माहिती गुंडा विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. आरोपीला पुढील कारवाईसाठी दिघी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.