एका मिळकतीत कोटींचा फटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एका मिळकतीत कोटींचा फटका
एका मिळकतीत कोटींचा फटका

एका मिळकतीत कोटींचा फटका

sakal_logo
By

जयंत जाधव ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १८ : चिखली हद्दीतील विश्‍वकल्याण इंग्लिश माध्यमाच्या शाळेच्या इमारतीचे निवासी दाखवून व कुलमुखत्यार पत्राच्या आधारे बेकायदा विभागणी करीत महापालिकेचा शास्तीकर व मिळकतकर आकारणीत मोठा गोंधळ घालण्यात आला आहे. त्यामुळे महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान तर झालेच. परंतु, राज्य सरकारच्या मुद्रांक व नोंदणी शुल्कापोटी लाखो रुपयांचेही नुकसान झाले आहे.

एकाच इमारतीत कोट्यवधींचे नुकसान
विश्‍वकल्याण इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या इमारतीचे बांधकाम २५ हजार पाचशे चौरस फूट आहे. या बांधकामाचा एक वर्षाचा मिळकतकर १२ लाख ८२ हजार ६१४ रुपये होतो. अनधिकृत बांधकाम असल्याने अवैध बांधकाम शास्ती १९ लाख ४३ हजार ३५५ रुपये होते. सहा वर्षांचा मिळकतकर ७६ लाख ९५ हजार ६८६ रुपये होतो. अवैध बांधकाम शास्ती एक कोटी १६ लाख ६०१ रुपये तर; फलोरेज कर एक लाख ९४ हजार ३३५ रुपये होतो. तर; सहा वर्षांचा ११ लाख ६६ हजार १० रुपये होतो. एकूण सहा वर्षांचा मिळकतकर व शास्तीकर मिळून एक कोटी ९३ लाख ५५ हजार ८१६ रुपये होत होता. बिगरनिवासी बांधकामाचा मिळकतकर ७६ रुपये २१ पैसे आहे. तर निवासीचा दर २५ रुपये ४० पैसे आहे. त्यामुळे कुलमुखत्यार पत्रावर विभाजन करून निवासी आकारणी केल्यामुळे महापालिकेचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.

दोन कोटी ९३ लाखांचा बुडाला कर
या बोगस मिळकतकर आकारणीत या शाळेला मागील इमारतीला फक्त वर्षाला दोन लाख पन्नास हजार रुपये मिळकतकर लावला गेला आहे. पुढील इमारतीला एका वर्षाला फक्त दोन लाख रुपये मिळकतकर आकारला आहे. शाळेला मागील बाजूच्या इमारतीचे बांधकाम २००९ ला झाले असताना त्यांची मिळकतकर नोंद २०२१ ला झाली आहे. तर पुढील इमारतीचे बांधकाम २०१४ ला पूर्ण झालेले असताना या इमारतीची बेकायदा मिळकतकर आकारणी २०२१ ला केली आहे. मागील इमारतीचे बांधकाम २५ हजार ५०० चौरस फूट व पुढील इमारतीचे बांधकाम सुमारे १६ हजार चौरस फूट आहे. त्यामुळे पुढील इमारतीचाही एक वर्षाचा मिळकतकर ८ लाख ४ हजार ७७७ रुपये व शास्तीकर १२ लाख १९ हजार ३६० रुपये, फ्लोरेजकर ८० हजार ४७८ रुपये असा एकूण २१ लाख चार हजार ६१५ रुपये होता. तर सहा वर्षांचा मिळकतकर ४८ लाख २८ हजार ६६५ रुपये होता. अवैध शास्तीकर ७३ लाख १६ हजार १६० रुपये होत आहे. फ्लोरेजकर चार लाख ८२ हजार ८६८ रुपये असे मिळून एक कोटी २६ लाख २७ हजार ६९३ रुपये होत आहेत. तर गैरव्यवहार घोटाळा करुन निवासी आकारणी केल्यामुळे फक्त दोन लाख मिळकतकर भरत आहेत. त्यामुळे महापालिकेचे सुमारे एक कोटी पाच लाख २३ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या शाळेला लागणारा दोन्ही इमारतींचा मिळून सुमारे दोन कोटी ९८ लाख रुपयांचा मिळकतकर व शास्तीकर बुडाला आहे.

असा केला गैरव्यवहार...
शाळेला व्यावसायिक मिळकतकर आकारणी करण्यात येते. परंतु या बोगस मिळकतकर आकारणीत शाळेला निवासी दाखविताना शाळेच्या वर्गांना जागा मालकांच्या घरच्यांच्या नावे २३ सदनिका दाखवत निवासी नोंद करण्यात आली आहे. यामध्ये २३ पैकी फक्त दोन सदनिका १००८ चौरस फुटाच्या तर; अन्य २१ सदनिका सरासरी ५०२ ते ९२० चौरस फुटाच्या दाखविल्या आहेत. एक हजार चौरस फुटाच्या आतील निवासी बांधकामाला शास्ती लागत नाही. त्यामुळे व्यावसायिकचे निवासी बांधकाम दाखवून हा गैरव्यवहार करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. या बाबत मिळकतकर विभागाचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांना प्रतिक्रियेसाठी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

सीबीएसई बोर्डालाही फसविले
या शाळेने केलेला आणखी एक पराक्रम म्हणजे सीबीएसई बोर्डाला परवानगी घेताना ही शाळा अधिकृत दाखविली आहे. हे करताना या शाळेने सोनवणे वस्ती, चिखली येथील बांधकामाचे स्ट्रक्चरल स्टॅबिलीटी व कंम्पलीशन सर्टिफिकेट खासगी आर्किटेक्टचे जोडले आहे. बांधकाम परवाना यमुनानगर, निगडीसाठी चक्क पुणे महापालिकेचा जोडला आहे. या आधारे या शाळेला सीबीएसई बोर्डाची परवानगी मिळाली आहे.

‘‘चिखलीतील विश्‍वकल्याण इंग्लिश मेडियम स्कूलची मिळकतकर आकारणी सुरुवातीला निवासी होती म्हणून निवासी केली आहे. वापर बदलल्यामुळे बांधकाम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र मिळाल्यांनंतर आता व्यावसायिक मिळकतकर आकारणी करुन घेतो आहे. कुलमुखत्यार पत्राच्या आधारे आम्ही मिळकतकर विभाजन केले आहे.’’
- जितेंद्र मेहता, संचालक, विश्‍वकल्याण इंग्लिश मेडियम स्कूल, सोनवणेवस्ती, चिखली