लेटरहेडवर लिहून सदनिकांचे वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लेटरहेडवर लिहून सदनिकांचे वाटप
लेटरहेडवर लिहून सदनिकांचे वाटप

लेटरहेडवर लिहून सदनिकांचे वाटप

sakal_logo
By

जयंत जाधव : सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १९ : चिखली-नेवाळेवस्ती येथे चार गुंठे जागा घेऊन चार लोकांनी तुळजाई गृहनिर्माण संस्थेची स्थापना केली. त्यानंतर ४५ सभासद करून ५० सदनिका बांधण्यात आल्या. या सदनिकांची विक्री करताना राज्य सरकारचे मुद्रांक व नोंदणी शुल्क बुडवून फक्त संस्थेच्या लेटरहेडवर लिहून सदनिकांचे वाटप करण्यात आले.
‘इंडेक्स २’ नसताना महापालिकेच्या चिखली करसंकलन विभागाने सदनिकांची नोंद करून मिळकतकर आकारणी केल्याचा घोळ घातला आहे. मुद्रांक शुल्काची बुडवणूक केल्याचे माहिती असूनही चिखली करसंकलन विभागातील प्रभारी सहायक मंडल अधिकाऱ्यांनी महापालिकेचा करसंकलन विभागाचा लाखो रुपयांचा व राज्य सरकारच्या मुद्रांक शुल्क विभागाचा कोट्यवधी रुपयांचे शुल्क बुडविण्यास मदत केल्याचे समोर आले आहे. मिळकतकर आकारणी करताना ‘इंडेक्स २’ नसल्यामुळे सदनिका किती चौरस फुटाची याची खातरजमा न करता तुळजाई गृहनिर्माण संस्थेच्या लेटरहेडवर ५० सदनिकांच्या चौरस फुटानुसार कर आकारणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यातून मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्कापोटी राज्य सरकारचे सुमारे एक कोटी ६० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत मिळकत कर विभागाचे प्रभारी सहायक मंडल अधिकारी संजय लांडगे यांना प्रतिक्रियेसाठी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

असा केला गैरव्यवहार
पत्येक सदनिकेस पाच ते सहा वर्षांचा एकूण ३० ते ३२ हजार मिळकत कर आकारणी केलेली असताना त्यामध्ये आर्थिक फायदा जोपासून प्रत्येक सदनिकेचा पाच हजार रुपयांपर्यंत मिळकत कर आकारण्यात आला. यामध्ये प्रत्येक सिदनिकेचा २० ते २५ हजार रुपयांचा मिळकत कर माफ करून आर्थिक फायदा करीत महापालिकेचे सुमारे १३ लाख १७ हजार ६४५ रुपयांचे नुकसान झाले आहे.

हस्तांतरण शुल्काच्या आदेशाचेही उल्लंघन
महापालिकेचे तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी एक एप्रिल २०२२ रोजीच्या परिपत्रकान्वये प्रत्येक मिळकत नवीन मिळकतधारकाच्या नावे हस्तांतरण करण्यासाठी बाजारमूल्य ०.५ टक्के हस्तांतरण शुल्क आकारणी करण्यात येते. या परिपत्रकाला केराची टोपली दाखवीत हस्तांतरण शुल्काची आकारणी न करता महापालिकेचे आर्थिक नुकसान करून नवीन मालकांच्या नावे मिळकतीची नोंद करण्यात आली. त्यामुळे महापालिकेचे दहा लाखांचे नुकसान करण्यात आले.

‘‘अगोदर गृहनिर्माण संस्था स्थापन करुन संस्थेच्या नावे जागा घेतली. एकत्र येऊन सभासदांनी गृहनिर्माण प्रकल्प केला. त्यानंतर सभासदांना सदनिका वाटप करुन वाटपपत्र दिले. त्यानुसार सभासदांना सदनिका व शेअर सर्टिफिकेट दिले.’’
- नामदेव पवार, तुळजाई गृहनिर्माण संस्था, नेवाळेवस्ती, चिखली.

अधिकृत मालमत्ता असताना कुलमुखत्यार पत्राच्या आधारे हस्तांतरण केले जावू नये. तुळजाई गृहनिर्माण संस्थेची फाईल मागवून मी तपासणी करतो. चुकीचे काम कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी केले असेल तर; त्यांच्यावर कारवाई करणार. मिळकत कराची चुकीची अकारणी झाली असेल तर; ती दुरुस्तही करण्याची तरतूद आहे. चुकले असल्यास नव्याने मिळकत कर लावून मागील ६ वर्षांपासूनचा मिळकत कर आपण वसूल करु शकतो.
- नीलेश देशमुख, सहायक आयुक्त, मिलकत कर विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका.