रेडझोन नकाशे, हद्द जाहीर करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेडझोन नकाशे, हद्द जाहीर करा
रेडझोन नकाशे, हद्द जाहीर करा

रेडझोन नकाशे, हद्द जाहीर करा

sakal_logo
By

पिंपरी, ता. १९ ः शहरातील रेडझोन हद्दीत प्लॉटिंग करून व बांधकाम करून विक्री सुरू आहे. मात्र, रेडझोन हद्दीबाबत कोणत्याही सूचना वा माहिती फलक कुठेही नाही. त्यामुळे रेडझोनबाबत सर्व्हे क्रमांक व प्लॉट क्रमांकानुसार नकाशे आणि रेडझोनची हद्द नव्याने जाहीर करण्याचा आदेश निवासी जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासकांसह पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि नवनगर विकास प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिला आहे.
महापालिका कार्यक्षेत्रात रेडझोनची हद्द कुठे आहे, रेड झोन नेमका कुठून सुरू होतो, त्याच्या सीमा कोणत्या, रेडझोन बाधित क्षेत्र नेमके कुठे व कोणते, याबाबत कोणतेही सूचना फलक, रेखांकन केलेले नाही. त्यामुळे नागरिकांच्या मनात अनेक शंका आहेत. त्याचाच फायदा घेत अनेक जण रेडझोनमध्ये प्लॉटिंग करून गुंठेवारीने विकत आहेत. काहींनी गृहप्रकल्प उभारून सदनिका विक्रीचा सपाटा लावला आहे. त्यामुळे रेडझोनबाबत सर्व्हे क्रमांक आणि प्लॉट क्रमांकानुसार नकाशे आणि रेडझोनची हद्द नव्याने जाहीर करण्याची मागणी यमुनानगर येथील सतीश मरळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनीही पिंपरी-चिंचवड हद्दीतील रेड झोनचे नकाशे व सर्व्हेची माहिती तत्काळ प्रसिद्ध करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांना दिला होता. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून महापालिका आयुक्तांचा अभिप्राय अहवाल मागविण्यात आला आहे.

रेडझोनमध्ये ‘एसआरए’
निगडीतील सर्वे क्रमांक ५६, ५७ व ६३ हे रेडझोनमध्ये येतात, असे काही नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र, त्याठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसन (एसआरए) प्रकल्प सुरू झाला आहे. हे क्षेत्र रेडझोनमध्ये येत नाही, असे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. त्यामुळे नेमके कोणते क्षेत्र रेडझोनमध्ये आहे व कोणते क्षेत्र बाहेर आहे, याबाबत संभ्रम आहे. या परिसरासह यमुनानगर, त्रिवेणीनर, मोरेवस्ती, साने चौक हे रेडझोन क्षेत्रामध्ये येते का, याबाबतही स्पष्टता करण्याचा आदेश दिला होता.

नागरिकांमध्ये संभ्रम
महापालिका क्षेत्रातील रेडझोनबाबत कोणतीही माहिती नागरिकांकडे उपलब्ध नाही. यामुळे नागरिकांना अधिकृतपणे त्यांची घरे विक्री करता येत नाहीत, मालमत्तावर कर्ज घेता येत नाही. जमीन विकसित करता येत नाही. जुन्या बांधकामांचा पुनर्विकास करता येत नाही. त्याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे. काही जण मात्र, ‘जे इतरांचे होईल, ते आपले होईल’ किंवा ‘कारवाई वैगरे काही होत नाही’, अशा अविर्भवात राहून जमीन किंवा जागांची खरेदी करीत आहेत.

असा आहे आदेश
रेडझोनबाबत संभ्रम दूर करण्यासाठी सर्व्हे क्रमांक, प्लॉट क्रमांकानुसार नव्याने नकाशे आणि रेडझोन हद्द जाहीर करावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराड यांनी महापालिका आयुक्त, पीएमआरडीए आयुक्त, नवनगर विकास प्राधिकरण मुख्य कार्यकारी अधिकारी, भूमी अभिलेख जिल्हा अधिक्षक, डिफेन्स इस्टेट ऑफिसर आणि पिंपरी-चिंचवड नगर भूमापन अधिकारी यांना अभिप्राय अहवाल सादर करण्याचा आदेश दिले आहे.