लाभार्थी ३१,६१६; थकबाकी ४६०.५५ कोटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लाभार्थी ३१,६१६; थकबाकी ४६०.५५ कोटी
लाभार्थी ३१,६१६; थकबाकी ४६०.५५ कोटी

लाभार्थी ३१,६१६; थकबाकी ४६०.५५ कोटी

sakal_logo
By

पिंपरी, ता. २२ ः अनधिकृत बांधकाम केलेल्या मिळकतींचा शास्ती (दंड) रद्द करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात केली. त्याचा लाभ शहरातील सर्व प्रकारच्या ३१ हजार ६१६ बांधकामांना होणार आहे. त्यांची शास्तीची थकबाकी रक्कम ४६० कोटी ५५ लाख रुपये आहे. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीत केवळ मिळकतकराची थकबाकीसह मूळ रक्कम २१७ कोटी ७५ लाख रुपयेच जमा होणार आहे.
महापालिकेकडे नोंद असलेल्या शहरातील पाच लाख ९१ हजार १५० मिळकती आहेत. त्यातील तब्बल ९७ हजार ६९९ मिळकती अनधिकृत आहेत. त्यांना शास्ती लावला होता. त्यामुळे मूळ मिळकतकर व शास्ती मिळून मिळकतकराची रक्कम वाढत होती. पर्यायाने मिळकतकर भरू शकत नसल्याने थकबाकीची रक्कम वाढत गेली. आतापर्यंत अनधिकृत मिळकतींची शास्तीसह ७७१ कोटी ७३ लाख रुपये थकबाकी आहे. तत्कालीन फडणवीस सरकारने अनधिकृत बांधकामांची वर्गवारी करून शास्तीची रक्कम ठरवली होती. त्यानुसार एक हजार चौरस फुटापर्यंतच्या निवासी बांधकामांची शास्ती रद्द केली होती. एक ते दोन हजार चौरस फुटापर्यंत ५० टक्के व त्यापुढील बांधकामांना दुप्पट शास्ती आकारला जात होता. आता सर्वच शास्ती रद्द करण्याचा निर्णय झाल्याने शहरातील २० हजार ३७८ निवासी मिळकतधारकांसह ११ हजार २३८ बिगरनिवासी, मिश्र व औद्योगिक अशा ३१ हजार ६१६ मिळकतधारकांना दिलासा मिळाला आहे. त्यांच्याकडे मूळ मिळकतकर व शास्ती मिळून ६७८ कोटी ३० लाख रुपये थकबाकी आहे. त्यातील शास्ती रक्कम ४६० कोटी ५५ लाख रुपये भरावे लागणार नाहीत. केवळ मूळ मिळकतकराची २१७ कोटी ७५ लाख रुपये भरावे लागतील.

शास्ती लावलेल्या मालमत्ता
वर्णन / संख्या
निवासी / ८६,४६१
बिगर निवासी / ५,२३५
मिश्र / ५,२०७
औद्योगिक / ७९६
एकूण / ९७,६९९

मूळकर व शास्ती थकबाकी (कोटी रुपयांत)
वर्णन / मूळ कर / शास्ती / एकूण
निवासी / २०२.५८ / १८४.३६ / ३८६.९४
बिगर निवासी / ५९.३३ / १३४.७६ / १९४.०९
मिश्र / ४१.२७ / १०७.११ / १४८.३८
औद्योगिक / ८.०० / ३४.३२ / ४२.३२
एकूण / ३११.१८ / ४६०.५५ / ७७१.७३

निवासी बांधकामांबाबत प्रतिवर्षी शास्ती सद्यःस्थिती
१ हजार चौरस फुटापर्यंत ः शास्ती नाही
१ ते २ हजार चौरस फुट ः मालमत्ता कराच्या ५० टक्के
२ हजार चौरस फुटांवरील ः मालमत्ता कराच्या दुप्पट

दृष्टिक्षेपात अनधिकृत निवासी बांधकामे
बांधकाम / शास्ती भरलेले / समायोजन करायचे / फरक
१ हजार चौरस फुटापर्यंत / ३०,३९७ / २९,५९० / ८०७
१ ते २ हजार चौरस फुट / ७,५९८ / ७,३९७ / २०१
एकूण अनधिकृत बांधकामे / ३७,९९५ / ३६,९८७ / १००८

दृष्टिक्षेपात शास्ती भरणा (कोटी रुपयांत)
बांधकाम / शास्ती भरणा / समायोजित रक्कम / फरक
१ हजार चौरस फुटापर्यंत / ६७.९६ / ६२.७९ / ५.१७
१ ते २ हजार चौरस फुट / ३८.७८ / २६.२३ / १२.५५
एकूण अनधिकृत बांधकामे / १०६.७४/ ८९.०२ / १७.७२

‘‘बिगरनिवासी, मिश्र, औद्योगिक मालमत्तांना मिळकतकराच्या दुप्पट शास्ती लागू आहे. ज्या मालमत्ताधारकांनी आठ मार्च २०१९ पूर्वी शास्तीची रक्कम भरली आहे व ज्यांना आठ मार्च २०१९ च्या निर्णयानुसार शास्तीतून सूट मिळाली आहे. अशा मालमत्ताधारकांची शास्तीची रक्कम पुढील आर्थिक वर्षात समायोजित केली जाणार आहे.’’
- निलेश देशमुख, सहायक आयुक्त, करसंकलन विभाग, महापालिका