
रावेत शाळेत आपले शहर जाणून घेऊया उपक्रम
पिंपरी, ता. २२ : महानगरपालिका शाळा रावेत क्र. ९७ माध्यमिक शाळेच्या वतीने २१ डिसेंबर रोजी पीसीएमसी क्षेत्रामध्ये होणाऱ्या ‘आपले शहर जाणून घेऊया’ या उपक्रमाअंतर्गत आणि अर्बन आउटकम्स फ्रेमवर्क २०२२ जनजागृती रॅलीचे रावेत गावठाण व परिसरात आयोजन करण्यात आले होते.
या वेळी विद्यार्थ्यांद्वारे प्लॅस्टिक राजा व प्लास्टिक राणी यांच्या वेशभूषा करून वाढते प्लास्टिक पर्यावरणास कसे हानिकारक ठरत आहे हे सांगण्यात आले. स्वच्छतेचा संदेश देणारे संत गाडगेबाबा यांची वेशभूषा करून त्यांना स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत स्वच्छता दूत म्हणून काम करणाऱ्या कर्मचारी वर्गाशी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शाळेतील मुलांनी स्वच्छता दूतांचा गणवेश परिधान करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
प्रभात फेरीमध्ये विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचे संदेश देणारे फलक तयार केले होते. नियोजन व कार्यवाही शाळेचे मुख्याध्यापक साहेबराव सुपे यांनी केले. तर, माध्यमिक शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक रामेश्वर पवार यांनी उपक्रमाचे महत्त्व सांगितले. शिक्षक हेमंत साठे, पांडुरंग घुगे, सुखदेव वीर, रूपाली कड, चारुशीला जाधव, गीता खोपे, सोनाली ढुमणे, निशा यादव, शुभांगी गावडे, तानाजी शिंदे व विद्यार्थी उपस्थित होते.