
Christmas Holiday : नाताळमुळे शाळांना सुट्या; चिमुकल्यांत उत्साह
पिंपरी - शहरातील खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांना २४ डिसेंबरपासून नाताळची (ख्रिसमस) सुटी लागत आहे. त्यामुळे बच्चे कंपनी सुटीच्या मूडमध्ये असल्याने आनंदाचे वातावरण शाळांमध्ये तयार झाले आहे. गेल्या चार दिवसांपासून ख्रिसमस ट्री व सोनेरी रंगीत बॉल्स तसेच आकर्षक सजावट शाळांमध्ये करण्यात आल्याने चिमुकले उत्साहाचे वातावरण पहावयास मिळत आहे. चिमुकलेही सांताक्लॉजची टोपी घालून धम्माल मस्ती करण्यात दंग झाल्याचे चित्र आहे.
ख्रिस्ती बांधवांचा आनंदाचा आणि उत्साहाचा सण म्हणजेच ख्रिसमस. या सणाचे वेध ख्रिस्ती बांधवांना लागले आहेत. २५ डिसेंबरला नाताळ साजरा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर २३ व २४ डिसेंबरपासूनच शाळांना सुटी लागणार आहे. ही सुटी एक ते दोन जानेवारी २०२३ पर्यंत बहुतेक शाळांना आहे. त्यामुळे, अनेकांचे विविध चर्चमध्ये तर, गावी जाण्याचे प्लॅनिंग सुरू झाले आहे. त्यामुळे काही शाळांना सात तर, काही शाळांना नऊ दिवस सुट्ट्या दिलेल्या आहेत.
ख्रिसमस अवघ्या दोन दिवसांवर आल्याने नवीन कपडे तसेच मिठाई खरेदीची लगबगही चिमुकल्यांची दिसून येत आहे. शाळांसह घरोघरी नाताळची गाणी मुले गात आहेत. येशू जन्माच्या कथा व ख्रिसमसचे महत्त्व शाळांमधून सांगितले जात आहे. सांता क्लॉजची वेशभूषा परिधान करीत विद्यार्थी शाळेत येत आहेत. शिक्षकांनी ख्रिसमस सणाची माहिती मुलांना दिली आहे. ‘जिंगलबेल, जिंगलबेल’ या गीतावर नृत्य करीत विद्यार्थ्यांनी सेलिब्रेशन करीत मजा लुटत आहेत. नववर्षाच्या स्वागतालाही शाळांना सुट्टी मिळत असल्याने त्याचेही स्वागत कुटुंबीयांना करता येणार आहे.