
काळेवाडीत फेरीवाल्याला मारहाण करून रोकड लुटली
पिंपरी, ता. २२ : ''मी इथला दादा आहे, माझ्या भागात धंदा करायचा तर मला हप्ता दिला पाहिजे'' अशाप्रकारे फेरीवाला तरुणाला धमकावून मारहाण करीत रोकड लुटली. हा प्रकार काळेवाडी येथे घडला.
याप्रकरणी अरविंद कुमार रामजीयावन त्रिपाठी (रा. दगडू पाटील नगर, थेरगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पवन जाधव व दोन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे फेरीवाला म्हणून मिक्सर दुरुस्तीचे काम करतात. दरम्यान, काळेवाडी येथे महर्षी स्कूल परिसरात मिक्सर दुरुस्तीच्या कामासाठी फिरत असताना पवन जाधव हा त्यांच्याजवळ आला. ''मी इथला दादा आहे, माझ्या एरियात धंदा करायचा तर मला हप्ता दिला पाहिजे'' असे म्हणत त्याच्या दोन मित्रांसह फिर्यादीला धमकावले. त्यांना मारहाण करून साडे सहा हजारांची रोकड काढून घेतली. तसेच मोबाईलमधील फोन पे ॲपचा पिन घेऊन ठिकठिकाणी स्कॅन करीत जबरदस्तीने खरेदी करून आरोपी पसार झाले. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
-----------------------