
ख्रिसमस सेलिब्रेशनची शहरात जय्यत तयारी
पिंपरी, ता. २२ : ख्रिस्त बांधवांच्या उत्साहाला उधाण आले आहे. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नाताळ साजरा करण्यासाठी जय्यत तयारी सुरु आहे. विविध वस्तूंनी बाजारपेठ सजली आहे. असून ख्रिस्ती बांधवांनी सणाची जय्यत तयारी सुरू केली आहे. बाजारपेठा, दुकाने व मॉल्समध्ये विशेष सजावट केली आहे. टोप्या, बेल्स, ख्रिसमस ट्री, सांताक्लॉज ड्रेस, पोतडी आदी वस्तू आल्या आहेत. चॉकलेट, भेटवस्तू घेऊन येणाऱ्या सांताक्लॉजचे आकर्षक मुखवटे, टोपी यांची खरेदी ठिकठिकाणी सुरु आहे.
घरातील सजावटी बरोबरच ख्रिसमस ट्रीच्या सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तू, चांदण्या, चॉकलेट्स, झालर, बेल्स, सांताक्लॉजच्या मूर्ती, आकाशकंदील, रोषणाई व सजावटीचे साहित्य, भेटवस्तूंनी अनेक दुकाने सजली आहेत. ख्रिसमस ट्री १०० रूपयांपासून ते ५ हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.
गव्हाणी व हरीणांचा रथ
नाताळ दिवशी ख्रिस्ती बांधव खास गव्हाणी तयार करून त्यामध्ये पुतळे ठेवून रात्री बारा वाजता दिवस साजरा करतात. बाजारात लाकडापासून तयार अशा गव्हाणी आणि हरिणाच्या जोड्यांचे रथ विक्रीस ठेवले आहेत. ५०० ते ३ हजार रूपयांपर्यंत ही गव्हाणी उपलब्ध आहे. तसेच छोट्या आकारातील स्वस्त अशा सिरॅमिकच्या गव्हाणी देखील उपलब्ध आहेत.
केक शॉप व मॉल्स
शहरातील केकशॉप, मॉल्स, सुपर मार्केटसच्या बाहेर स्वागतासाठी उभे असलेले सांताक्लॉज, प्रत्येक चौकात सांताक्लॉजच्या टोप्यांचे आणि वेषभूषेचे स्टॉलकडे कुतूहलाने पाहणारी बच्चेकंपनी असे दृश्य पिंपरी व चिंचवडमध्ये विविध ठिकाणी पाहायला मिळत आहे. केकच्या ऑर्डर देण्यासाठी तसेच केकचे साहित्य खरेदीसाठी गर्दी होत आहे. अवघ्या पाच ते सहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या ख्रिसमसच्या स्वागतासाठी झुंबड उडाली आहे.
ख्रिसमसचा फराळ करण्याची लगबग
ख्रिसमससाठी खिस्ती बांधव हे वेगवेगळ्या प्रकारचे केक बरोबरच डोनट, रोज कुकीज, नानकटाई असे पदार्थ तयार करतात. हा फराळ बाजारात रेडिमेड देखील उपलब्ध असतो. यामध्ये डोनट हा स्पेशल असणारा पदार्थ आता चॉकलेट, व्हॅनिला, मँगो अशा विविध फ्लेव्हर्समध्ये उपलब्ध आहे. पावशेर पासून ते किलोमध्ये याचे पॅकेट ऑर्डरनुसार उपलब्ध असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.