
कोयता बाळगणाऱ्या आरोपींना दिघीत अटक
पिंपरी, ता. २३ : कोयता घेऊन दुचाकीवर फिरणाऱ्या आरोपींना दिघी पोलिसांनी पाठलाग करून पकडले. आरोपींमध्ये पुणे, हडपसरमधील कोयता गॅंगमधील गुंडांचा समावेश असल्याचेही समोर येत आहे. ही कारवाई दिघी येथे करण्यात आली. सुजल सुंदरराज गावीडन (वय १९, रा. जहांगीरनगर, हडपसर), आकाश तानावडे (हडपसर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर आकाश वाघमारे (रा. मांजरी), विकास (रा. हडपसर) हे फरार आहेत. याप्रकरणी पोलिस शिपाई मारुती घुगरे यांनी फिर्याद दिली आहे. दिघी पोलिस हे मॅगझीन चौक परिसरात गस्त घालत असताना आरोपी रस्त्यावर कोयता हातात घेऊन उभे असल्याचे दिसून आले. त्यांना थांबण्यास सांगितले असता ते दुचाकीवरून पळून जाऊ लागले. दरम्यान, पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरु केला. तसेच पोलिस ठाण्यालाही याबाबत माहिती दिली. त्यामुळे तत्काळ आणखी एक पोलिस व्हॅन घटनास्थळी दाखल झाली. अखेर तीन ते चार किलो मीटरचा पाठलाग केल्यानंतर सुजल पोलिसांच्या हाती लागला. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे कोयता सापडला. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने साथीदारांची नावे सांगितली. त्यानुसार आकाश तानावडे यालाही अटक करण्यात आली. या दोघांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर फरारी आरोपींचा शोध सुरु आहे. ही कारवाई दिघीतील मॅगझीन चौक, ममता चौक या भागात करण्यात आली. दिघी पोलिस तपास करीत आहेत.