पुढील तीन वर्षात देश क्षयरोगमुक्त पंतप्रधान मोदी यांचा संकल्प; ‘मन की बात’मध्ये पिंपरी-चिंचवडकरांशी संवाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुढील तीन वर्षात देश क्षयरोगमुक्त
पंतप्रधान मोदी यांचा संकल्प; ‘मन की बात’मध्ये पिंपरी-चिंचवडकरांशी संवाद
पुढील तीन वर्षात देश क्षयरोगमुक्त पंतप्रधान मोदी यांचा संकल्प; ‘मन की बात’मध्ये पिंपरी-चिंचवडकरांशी संवाद

पुढील तीन वर्षात देश क्षयरोगमुक्त पंतप्रधान मोदी यांचा संकल्प; ‘मन की बात’मध्ये पिंपरी-चिंचवडकरांशी संवाद

sakal_logo
By

पिंपरी, ता. २५ ः ‘सबका प्रयास’ भावनेतूनच आपण २०२५ पर्यंत भारताला क्षयमुक्त करण्यासाठी काम करत आहोत, असा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. योगाभ्यास आणि आयुर्वेद हे शतकानुशतकं आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य घटक राहिले आहेत. मात्र, त्यासमोर पुराव्यावर आधारित संशोधनाचा अभाव, हे नेहमीचेच आव्हान राहिले आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
‘मन की बात’ कार्यक्रमाच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवडमधील विविध क्षेत्रातील नागरिकांशी पंतप्रधान मोदी यांनी संवाद साधला. त्याचे थेट प्रक्षेपण पाहण्याची व ऐकण्याची व्यवस्था चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात केली होती. भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, माजी महापौर उषा ढोरे, माजी पक्षनेते नामदेव ढाके, सदाशिव खाडे, हिराबाई घुले, नितीन लांडगे, राजेश पिल्ले, शंकर जगताप आदींसह विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते. ‘मन की बात’मध्ये डॉ. प्रशांत देशमुख, डॉ. प्रमोद कुबडे, डॉ. सुभाष निकम आणि डॉ. रमेश केदार यांनीही सहभाग घेतला.

प्रत्येकाच्या हृदयात वाजपेयी
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे देशाला असामान्य नेतृत्व देणारे महान राजकीय नेते होते. प्रत्येक भारतीयांच्या हृदयात त्यांना विशेष स्थान आहे. पायाभूत सुविधा, शिक्षण किंवा परराष्ट्र धोरण, त्यांनी प्रत्येक क्षेत्रात भारताला नव्या उंचीवर नेले, अशा भावनाही पंतप्रधानांनी व्यक्त केल्या.
मोदी म्हणाले, ‘‘आपली परंपरा आणि संस्कृती यांचे माता गंगेशी अतूट नाते आहे. गंगाजल आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. संयुक्‍त राष्ट्रांनी ‘नमामि गंगे’ अभियानाचा समावेश पर्यावरणाचा पुनर्संचय करणाऱ्या जगातील पहिल्या दहा उपक्रमांमध्ये केला आहे.’’

नागरिक म्हणाले...
डॉ. प्रताप सोमवंशी ः स्तनाच्या कर्करोगाबाबत योगाचे महत्त्व पुराव्यानिशी सिद्ध झाले आहे. त्याप्रमाणे आयुर्वेदातील ज्ञानाचा पुराव्याधारित अभ्यास झाला, तर ॲलोपॅथीप्रमाणे जगभरात आयुर्वेदाचाही प्रचार-प्रसार होईल.
शुभांगी होळकर ः पंतप्रधान मोदी यांनी कोविड काळात संपूर्ण देशातील गरजू नागरिकांना मोफत अन्नधान्य उपलब्ध करून दिले. त्यांनी आता पुन्हा पाच वर्षांसाठी मोफत अन्नधान्य योजना आणली आहे. त्याचा फायदा गोरगरीब नागरिकांना होईल.
पौर्णिमा दिंडे ः माझ्या वडिलांचा मृत्यू कर्करोगामुळे झाला. मात्र, कर्करोगावर योगासनांमुळे मात करता येते, याची माहिती आता मिळाली.
तुळसा हक्के ः पालघर जिल्ह्यासह सर्व आदिवासी समाजाची माहिती देताना पंतप्रधानांनी घरगुती उद्योगांना प्रोत्साहन दिले. त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाला मदत झाली. आम्हालाही प्रोत्साहन मिळाले.