कोरोना प्रतिबंधक लस मिळेल का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना प्रतिबंधक लस मिळेल का?
कोरोना प्रतिबंधक लस मिळेल का?

कोरोना प्रतिबंधक लस मिळेल का?

sakal_logo
By

पिंपरी, ता. २६ ः कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे रुग्ण देशात आढळले आहे. त्यासंदर्भातील वृत्त प्रसारित होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडे कोरोना प्रतिबंधक लशींची मागणी नागरिकांकडून होऊ लागली आहे. मात्र, महापालिकेकडे कोव्हिशिल्ड व कोर्बेव्हॅक्स लस उपलब्ध नाही. कोव्हॅक्सिनचे केवळ दोनशे डोस उपलब्ध आहेत.
जानेवारी २०२१ पासून महापालिकेतर्फे शहरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. सुरुवातीला आरोग्य व वैद्यकीय विभागातील कर्मचारी, फ्रंट लाइन वर्कर यांचे लसीकरण केले. त्यानंतर ६० वर्षांवरील नागरिकांना प्राधान्य दिले. गेल्या वर्षी साधारण डिसेंबरपासून शाळांमध्ये बारा वर्षांवरील मुलांचे लसीकरण करण्यात आले. १८ वर्षांवरील सर्वांना कोव्हिशिल्ड आणि १४ वर्षांवरील सर्वांना कोव्हॅक्सिन लस दिली जात आहे. १२ ते १४ वयोगटातील मुलांना कोर्बेव्हॅक्स लस दिली जात आहे. जवळपास शंभर टक्के नागरिकांनी लशीचा पहिला व ९० टक्क्यांपेक्षा अधिक नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रिकॉशन (बुस्टर डोस) दिला जात आहे. मात्र, कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाल्याने सर्वत्र ‘अनलॉक’चा निर्णय सरकारने जाहीर केला. शिवाय, कोराना प्रतिबंधक नियमांमध्येही शिथिलता आली. महापालिकेने आठही रुग्णालयांच्या कार्यक्षेत्रात ६९ केंद्रांवर लसीकरणाची व्यवस्था केली होती. मात्र, लसीकरणाकडे नागरिकांनी पाठ फिरवल्याने टप्प्याने केंद्र कमी करण्यात आले. आता मात्र, चीनमध्ये कोरोनाचा नवीन व्हेरियंट आल्याने व त्याचे संक्रमण झालेले रुग्ण देशात आढळल्याने नागरिकांकडून लसीकरणाबाबत वैद्यकीय विभागाकडे विचारणा होऊ लागली आहे. महापालिकेकडे मात्र कोव्हिशिल्ड व कोर्बेव्हॅक्स लस उपलब्ध नाही. कोव्हॅक्सिनचे केवळ दोनशे डोस सोमवारी उपलब्ध होते.

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबाबत नागरिकांकडून विचारणा होत आहे. यापूर्वी लसीकरणासाठी प्रतिसाद मिळत नसल्याने लस वाया जाण्याची शक्यता होती. आता नव्याने मागणी केली आहे. सरकारकडून लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्या उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण केले जाईल.
- डॉ. लक्ष्मण गोफणे, सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका