हाउसिंग सोसायट्यांमधील कचरा उठाव कधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हाउसिंग सोसायट्यांमधील कचरा उठाव कधी
हाउसिंग सोसायट्यांमधील कचरा उठाव कधी

हाउसिंग सोसायट्यांमधील कचरा उठाव कधी

sakal_logo
By

पिंपरी, ता. २८ : शहरातील हाउसिंग सोसायट्यांचा कचरा आरोग्य विभागाकडून नियमित उचलला जात नसल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. वाल्हेकरवाडी, वाकड, काळेवाडी, रहाटणी आदी परिसरात विलगीकरण करूनही कचरा गाड्यांकडून नियमित उचलला जात नाही. याविषयी नागरिक सोशल मीडिया ग्रुपवर तक्रारी मांडत असतात. परंतु, संबंधित अधिकारी ग्रुपमध्ये असूनही दखल घेतली जात नसल्याचा आरोप केला जात आहे.
--
प्रतिक्रिया :
आमच्या सोसायटीतील आठ इमारतीत एकूण ३०० सदनिका आहेत. महापालिकेमार्फत आमचा कचरा सलग दोन ते तीन दिवस उचलला जात नसल्याने तो साठवून ठेवावा लागतो. सोसायटीकडे एवढा कचरा साठविण्या इतके कचरे डबे नाहीत. कधी ओला व सुका कचरा एकत्र झाला तर, ठेकेदाराचे कर्मचारी कचरा घ्यायला नकार देतात. दोन ते तीन दिवस कचरा साचल्यामुळे दुर्गंधी सुटते. सोसायटीतील सफाई कर्मचारी कचरा जमा करत असल्याने तो सोसायटीबाहेर ठेवावा लागतो. भटकी कुत्री तो कचरा अस्ताव्यस्त करुन विखरुन टाकतात. त्यामुळे, कचरा दररोज उचलावा. त्यामुळे, त्रास होणार नाही.
- विवेक देवरणकर, अध्यक्ष, शोनेस्ट टॉवर्स हाउसिंग सोसायटी, वाकड
--
आमची सोसायटी ८४ सदनिकांची आहे. १८ व १९ डिसेंबरला आमचा कचरा उचलला नव्हता. त्यामुळे, मी अध्यक्ष व नगरसेवक यांच्यासोबत बोललो. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर कचरा आता उचलला जात आहे. कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करण्यासाठी जागा नाही. महापालिकेने त्यासाठी आमच्याकडून स्वतंत्र कर घ्यावा. ठेकेदार नेमावा.
- काशिनाथ उगले, सदस्य, गुलमोहर गार्डन हाउसिंग सोसायटी, रहाटणी
--
आमचा सुका कचरा दोन ते तीन दिवस महापालिकेने नेला नसल्याने तो साठवून ठेवला आहे. आमच्याकडे तेवढा कचरा साठवायला जागा नाही. आम्ही ओला कचरा आमच्या ठेकेदाराला देतो. सुका कचरा पालिकेने वेळेत उचलावा.
- संतोष कणसे, अध्यक्ष, गणेश इंपेरिया हाउसिंग सोसायटी
--
आमच्या सोसायटीत २०० हून अधिक सदनिका आहेत. गेले दोन दिवस ओला व सुका कचरा महापालिकेने उचलला नाही. त्यामुळे, तो साठवून ठेवला आहे. आजचा कचरा साठवायला डबे नाहीत. त्यामुळे दररोज कचरा न्यावा ही विनंती आहे.
- तुषार सिद्दाम, कार्यकारिणी सदस्य, सिल्व्हर स्काय स्केप्स सोसायटी, वाकड
--
कचरा गाडी तीन दिवसांपासून आलेली नाही. डबे अक्षरशः भरून गेले आहेत. आम्ही आधीपासून कचरा विलगीकरण राबवितो. ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी आमच्याकडे ओडब्लूसी प्लांट आहे. परंतु, सध्या सुका कचराही नेला जात नाही. बेबी डायपर, सॅनिटरी पॅड, काचेच्या बाटल्या, पालेभाज्या आणि फळे, कॅरिबॅग, पालापाचोळा सगळे वेगळे करून पाहिजे. एवढे सर्व मेडीकल विलगीकरण शक्य नाही.
- संदीप येवले, हॉरिझन्स सोसायटी, वाकड
--
काही सोसायट्यांमध्ये कचरा विलगीकरण मागत आहोत. तो दिला जात नाही. ओला व सुका कचरा वेगळा द्यावा. सोसायट्यांना कचरा विलगीकरणाच्या पुन्हा सूचना दिल्या आहेत. महापालिकेने यापूर्वी देखील कचरा विलगीकरणाचे आव्हाने केलं आहे. सर्व शहर यामध्ये सहकार्य करीत आहे. सोसायट्यांनी देखील करावे. ओला व सुका कचरा नेमका कोणता हे स्वतंत्र सांगण्याची गरज नाही. बऱ्याच सोसायटीत दोन बीन्स ठेवल्या जात नाहीत. सोसायटीचे साफसफाई कर्मचारी लक्ष देत नाहीत. सोसायट्यांना यापूर्वी दंड केला आहे. परंतु, दंडात्मक कारवाई हा कायमस्वरूपी उपाय नाही. तीन ते चार सोसायट्यांच्या तांत्रिक अडचणी आल्यानंतर त्याची दखल घेतली आहे. काही सोसायट्या कचरा विलगीकरण न करून देणाऱ्या आढळल्या आहेत. झोपडपट्ट्यांमध्ये झिरो वेस्ट राबविले जात आहे. सुशिक्षित समाजाने देखील याची अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे.
- अजय चारठाणकर, उपायुक्त, आरोग्य विभाग