
शहरातील शाळा महाविद्यालयाबाहेर पोलिसांची गस्त वाढवा
पिंपरी, ता. ३० : शहरातील शाळा महाविद्यालयाबाहेर पोलिसांनी गस्त वाढवून विद्यार्थिनींसाठी सुरक्षित वातावरण निर्मिती करण्याची मागणी दुर्गा ब्रिगेड संघटनेमार्फत करण्यात आली. निवेदनात म्हटले आहे की, शहरामध्ये अनेक शाळा आणि कॉलेजबाहेरील भाग अनेक टवाळखोरांचा अड्डा बनले आहेत. या ठिकाणी अनेक विद्यार्थिनींना जाताना-येताना छेडछाडीच्या प्रसंगाना सामोरे जावे लागत आहे. त्यांच्याकडे विक्षिप्तपणे बघणे त्यांच्यावर गाड्यांचा रुबाब दाखविणे. तसेच भांडण मारामाऱ्या होत आहेत. अनेक पालकांनी संघटनेकडे तक्रारी केल्या आहेत. यावर त्वरित मार्ग न काढल्यास दुर्गा ब्रिगेड संघटनेमार्फत दुर्गा सुरक्षा पथक निर्मिती करण्यात येणार असून, जनजागृती अभियान घेण्यात येणार आहे. मुलींच्या स्वसंरक्षणार्थ एक तास आठवड्यातून शाळेने दिल्यास संघटनेतर्फे मुलींना मोफत प्रशिक्षण देण्यात येईल, असे संघटनेच्या अध्यक्षा दुर्गा भोर यांनी सांगितले.