नववर्षाचे उत्साहात स्वागत शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट फुल्ल, रस्त्यांबरोबरच सोसायट्यांमध्ये जल्लोष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नववर्षाचे उत्साहात स्वागत  
शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट फुल्ल, रस्त्यांबरोबरच सोसायट्यांमध्ये जल्लोष
नववर्षाचे उत्साहात स्वागत शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट फुल्ल, रस्त्यांबरोबरच सोसायट्यांमध्ये जल्लोष

नववर्षाचे उत्साहात स्वागत शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट फुल्ल, रस्त्यांबरोबरच सोसायट्यांमध्ये जल्लोष

sakal_logo
By

पिंपरी, ता. ३१ : पार्टी, जल्लोष, केक कटिंग, आतषबाजी, खरेदी, निसर्गरम्य ठिकाणी ट्रीप, देवदर्शन अशा उत्साहपूर्ण वातावरणात शहरात नववर्षाचे स्वागत करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत जल्लोष सुरु होता. शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट अक्षरशः फुल्ल झाले होते.

मागील दोन वर्षे कोरोनाच्या निर्बंधामुळे साधेपणाने नववर्षांचे स्वागत करण्यात आले. मात्र, यंदा निर्बंध नसल्याने नववर्षाचे स्वागत उत्साहात करण्याचे काही दिवस अगोदरपासूनच नियोजन सुरु होते. शनिवारी सायंकाळी सहापासूनच हॉटेल, रेस्टॉंरंटकडे पावले वळू लागली. यामुळे पिंपरी, चिंचवड, निगडी, आकुर्डी, भोसरी, मोशी, सांगवी, वाकड, हिंजवडी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, देहूरोड आदी ठिकाणच्या हॉटेलात मोठी गर्दी होती. कुटुंबासह शाकाहारी, मांसाहारी जेवणाचा आस्वाद घेतला तर अनेकांचा मित्रांसह जल्लोष सुरु होता.
--------
रोषणाईने परिसर उजळला

हॉटेल, रेस्टॉरंट, शोरूम, दुकाने, सोसायटीच्या इमारती यासह घरांनाही रंगीबेरंगी रोषणाई केली होती तर अनेकांनी पार्टीसाठी बाहेर न जाता घरात अथवा सोसायटीतच पार्टीचा बेत आखला. घराच्या अंगणात अथवा सोसायटीच्या टेरेसवरही पार्ट्या रंगल्या. गोडधोड जेवण करून अनेकांनी कुटुंबीयांसह विविध हिंदी, मराठी गाण्यांच्या ठेकावर ताल धरला.
------------------------
केक शॉपमध्ये गर्दी

अनेकांनी नववर्षाचे स्वागत केक कापून केले. यामुळे केकला मोठी मागणी होती. केक खरेदीसाठी दिवसभर केक शॉपमध्ये गर्दी असल्याचे पहायला मिळाले. विविध ऑफर्सही दिल्या होत्या.
--------------------

समुद्रकिनारी सेलिब्रेशन

शनिवार व रविवारची सुटी आल्याने अनेकांनी ट्रीपला जाण्यास पसंती दिली. कोकणच्या समुद्र किनारी अथवा इतर पर्यटनस्थळी जात सेलिब्रेशन केले तर अनेकांनी देवाच्या दर्शनाने नववर्षाची सुरवात व्हावी, यासाठी धार्मिक स्थळी ट्रिपचे आयोजन केले.
---------------

चिंचवडमध्ये ‘दूध प्या’ उपक्रम

थर्टी फर्स्टला अनेकजण मद्यपान करीत असल्याचे दिसून येते. याबाबत जनजागृती करण्यासाठी चिंचवडगावातील बस थांब्यासमोर ‘दारू नको, दूध प्या’ हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचे आयोजन मावळ तालुक्यातील उर्से येथील कल्याणमैत्री बहुउद्देशीय संस्थेअंतर्गत असलेले स्माईल व्यसनमुक्ती केंद्र व रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटी यांच्यावतीने करण्यात आले होते.
-------------------

पोलिसांची ४० ठिकाणी नाकाबंदी

थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर आयुक्तालयाच्या हद्दीत पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. ४० ठिकाणी नाकाबंदी केली होती. शहराचे प्रवेशद्वार तसेच मुख्य रस्त्यांचा यामध्ये समावेश होता. वाहनांची तपासणी करून, चौकशी केली जात होती. तसेच ब्रिथ ऍनालायझरनेही तपासणी केली जात होती. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. यासह ठिकठिकाणी गस्तही सुरु होती. रस्त्यावर हुल्लडबाजी करणाऱ्यांकडे बारीक लक्ष होते. असे कोणी आढळल्यास कारवाई केली जात होती.
----------------------------------------------------

पोलिसांनी केलेली कारवाई

संशयास्पद वाहनांची तपासणी - १ हजार १३८
रेकॉर्डवरील आरोपी तपासणी - ४२०
विना हेल्मेट - ११९
विना सीटबेल्ट -१९८
ओव्हरस्पिड -११९
मोबाईलवर बोलणे- १५६
मद्यपान करून वाहन चालवणे- ६६
सिग्नल तोडणे-७८
रॅप ड्रायव्हिंग -६२
नो एंट्री - ११३
ट्रिपल सीट- ७३
--------------------