पिंपरी महापालिकेच्या प्रभागरचना बदलण्याबाबत चर्चा; इच्छुकांमध्ये अस्वस्थता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PCMC
महापालिका निवडणूक ः इच्छुकांमध्ये अस्वस्थता, राज्यातील सत्ता बदलाचा परिणाम

पिंपरी महापालिकेच्या प्रभागरचना बदलण्याबाबत चर्चा; इच्छुकांमध्ये अस्वस्थता

पिंपरी - महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीसाठी तत्कालीन भाजप-शिवसेना सरकारने चार सदस्यीय प्रभाग रचना केली होती. मात्र, २०२२ च्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयानुसार निवडणूक आयोगाने तीन सदस्यीय पद्धतीने प्रभाग रचना केली आहे. त्यानुसार निवडणुकीची प्रक्रिया सुरू असतानाच राज्यात सत्तांतर होऊन पुन्हा भाजपप्रणीत सरकार आले आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीसाठी पुन्हा प्रभागरचना बदलणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात असून इच्छुकांमध्ये अस्वस्थता आहे.

महापालिकेची मुदत १३ मार्च रोजी संपली आहे. १४ मार्चपासून प्रशासक नियुक्त असून, आयुक्त राजेश पाटील कारभार पाहात आहेत. मात्र, इतर मागासर्गीयांचे (ओबीसी) संपुष्टात आलेल्या राजकीय आरक्षणाचा न्यायप्रविष्ट मुद्दा व कोरोना संसर्ग यामुळे निवडणूक वेळेत झालेली नाही. दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेसह मित्र पक्षांच्या तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला होता. या पद्धतीस भारतीय जनता पक्षाचा विरोध होता. मात्र, सरकारच्या सूचनेनुसार निवडणूक विभागाने तीन सदस्यीय पद्धतीनुसार अंतिम प्रभाग रचना केली आहे.

त्यानुसार मतदार याद्यांची विभागणी करून प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. त्यावर रविवारपर्यंत (ता. ३) नागरिकांच्या हरकती व सूचना मागवल्या आहेत. त्यांवर सुनावणी होऊन अंतिम मतदारयाद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. या निवडणुकीसाठी २०११ ची लोकसंख्या ग्राह्य धरण्यात आली आहे. मात्र, आता राज्यात सत्तांतर होऊन पुन्हा भाजपप्रणित सरकार आले आहे. त्यामुळे महापालिका निवडणूक त्यांच्या २०१७ च्या धोरणानुसार चार सदस्यीय पद्धतीनुसार होणार की महाविकास आघडी सरकारने घेतलेल्या तीन सदस्यीय पद्धतीनुसार होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

... तर निवडणूक दिवाळीनंतरच

राज्य सरकारने चार सदस्यीय प्रभागरचनेनुसार महापालिका निवडणूक घेण्याचा निर्णय घेतल्यास नव्याने प्रभागरचना करावी लागणार आहे. प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती व सूचना मागवून अंतिम प्रभाग रचना जाहीर केली जाईल. त्यानुसार मतदार याद्यांची विभागणी करून त्या प्रारूप यांद्यावरही हरकती व सूचना मागविल्या जातील. त्यांवर सुनावणी होऊन अंतिम मतदार याद्या जाहीर केल्या जातील. या सर्व प्रक्रियेसाठी किमान चार महिन्यांतचा कालावधी लागू शकतो. तसे झाल्यास निवडणूक दिवाळीनंतरच होण्याची शक्यता जाणकार व्यक्त करीत आहेत. मात्र, तीन सदस्यीय पद्धतीने निवडणूक झाल्यास सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

आमची तयारी पूर्ण

महापालिका निवडणूक आम्ही तिसऱ्यांदा लढविणार आहोत. यापूर्वी मतदारांनी सलग दोन वेळा विजयी करून महापालिका सभागृहात पाठविले आहे. आताही तयारी पूर्ण केली असून, विजयाची पूर्ण खात्री आहे. गेल्या पंचवार्षिकमध्ये केलेल्या कामांचा कार्यअहवालही छापून तयार आहे. पण, राज्यात सरकार बदलल्यामुळे प्रभागरचना बदलल्यास आणखी तयारी करावी लागणार आहे, असे एका इच्छुक उमेदवाराने सांगितले.

बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीत एकापेक्षा अधिक नगरसेवक निवडून येतात. त्यांच्याकडून काम करून घ्यायचे झाल्यास ते एकमेकांकडे बोट दाखवतात, त्यामुळे वेळ जातो. त्यासाठी एक सदस्यीय पद्धतीतच योग्य होती. आपला हक्काचा माणूस म्हणून त्या नगरसेवकाकडे जाता येते. तेही वेळेत काम करून देतात. असे असले तरी, सध्याची केलेली तीन सदस्यीय पद्धतीनुसारच निवडणूक झाल्यास विकासकामे मार्गी लागतील.

- राजू हिरवे, मतदार, घरकुल, चिखली

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j24057 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..