वारी विठुरायाची पुस्तक लेख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वारी विठुरायाची पुस्तक लेख
वारी विठुरायाची पुस्तक लेख

वारी विठुरायाची पुस्तक लेख

sakal_logo
By

सामाजिक ऐक्याचा काला

संत ज्ञानोबारायांसह सर्व संतांनी काला केला. सामाजिक ऐक्‍याचा काला. हा काला करायचा नसेल तर त्याला प्रश्न विचारायला हवा, मग तू का आला? सामाजिक ऐक्‍य हाच काला आहे, ही फार मोठी क्रांती आहे. त्यामुळेच अठरापगड जातींमध्ये संत निर्माण झाले.
- ह. भ. प. बाबामहाराज सातारकर, मुंबई

संत ज्ञानेश्वर महाराज यांनी आपली मूळ परंपरा सोडून सर्व समाज एकत्र करण्यासाठी वारकरी संप्रदायाचा स्वीकार केला. त्यांची परंपरा योग मार्गाची. ती अदिनाथांपासून चालत आली होती. एका परंपरेतून दुसऱ्या परंपरेत नेणे इतके सोपे नाही. योगामध्ये ‘एकगुरू एक शिष्य’ ही परंपरा असते. एकाने एकालाच सांगायचे. तिथे एक शिष्य केला, त्याचाच उद्धार होतो. परंतु संत ज्ञानेश्वर महाराज यांनी आपली परंपरा संपूर्ण बाजूला ठेवली. एवढी मोठी परंपरा सोडून संत ज्ञानदेवांनी आपल्यापर्यंत आलेले सार सर्वांना वाटण्याचे, त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले. पण, पैसे असले म्हणजे दिले जातात, असे समजण्याचा गैरसमज कोणी करू नये. पैसे असले तरी ते देण्याची प्रवृत्ती असली पाहिजे. ज्ञान असले तरी ते देण्याची प्रवृत्ती पाहिजे. ज्ञानाचा प्रचार करायचा असेल तर ते लोकांना सांगितले पाहिजे. एक गोष्ट महत्त्वाची आहे. ज्याला समाजाबद्दल काही वाटते, तोच काही तरी वाटत असतो. संत ज्ञानेश्वर महाराज यांनी योगमार्ग सोडून ज्ञान वाटण्यासाठी वारकरी संप्रदायाचा स्वीकार केला. समाजाबद्दल कळकळ, प्रेम हे मुळात वाटावे लागते. ते वाटले तरच ते दुसऱ्याला वाटता येते. म्हणून ‘या रे या रे लहान थोर’ असे आवाहन केले. ही क्रांती संत ज्ञानोबारायांनी केली. तो काळ असा होता की, पैसा देऊ पण ज्ञान नाही. ज्ञान देण्याला बंधणे होती. पण ही प्रवृत्ती आणि बंधने झुगारून हे ज्ञान त्यांनी गणिकेपर्यंत पोहोचवले. संत ज्ञानेश्वर महाराज यांनी केलेली ही फार मोठी क्रांती आहे. त्यांनी दिलेले ज्ञान सर्वसामान्यांना वाचता येऊ लागले.
लहान मुलाशी बोलताना त्यांच्या भाषेत बोलावे लागते. तसे देवभाषा संस्कृत असली तरी समाजाला कळेल, अशा भाषेत संत ज्ञानोबारायांनी सर्वसामान्यांना ज्ञानाचे भंडार खुले करून दिले. त्यामुळेच आज लाखो भाविक वारीत सहभागी होत आहेत. हा अधिकार संत ज्ञानोबारायांनी दिला. त्यामुळे सध्याच्या काळात सर्वच समाजात वारकरी तयार झाले. महिलाही कीर्तन करू लागल्या. वारकरी संप्रदायात काही गट महिलांना कीर्तनकार मानत नसले तरी मानणे न मानण्यावर काही नसते. संत कान्होपात्रेला संतांनी मान्य केले. मग तुमचे आमच्या मतांना काय किंमत आहे. संतांनी त्या काळात महिलांना सन्मानाचे स्थान दिले आहे. इतकेच नाही तर संत कान्होपात्रेची समाधी पांडुरंगाच्या मंदिरात आहे. ही फार मोठी क्रांती आहे. त्या संत मांदियाळीचा पाया ज्ञानोबाराय आहेत. म्हणून एवढी माणसे वारीत येतात. लग्नाला, तसेच कार्यक्रमाला पैसे देवूनही येत नाहीत, असा सध्याचा काळ असताना, न बोलविता स्वतःचे पैसे खर्च करून लोक वारीला येतात. हे केवळ संत ज्ञानोबांवरील प्रेमामुळे येतात. संत ज्ञानोबारायांनी प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या अधिकाराची जाणिव करून दिली. त्यामुळेच लाखो लोक वारीत संत ज्ञानोबारांवरील प्रेमामुळे येतात. सागरात मीठ घातल्यानंतर ते एकरूप होते. तसे या संप्रदायात आलेले सर्व त्यात एकरूप होतात. ही सामाजिक क्रांती कुठेच नाही. संत ज्ञानोबारायांनी दिलेल्या विचारांप्रमाणे वागणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. महिलांनी कीर्तन करू नये, असे काहीजण म्हणतात. पण संत ज्ञानोबारायांनी संत जनाबाई, संत मुक्ताबाई यांना सातशे वर्षांपूर्वी संतपद दिले. सध्याच्या काळात कोणत्या क्षेत्रात महिला नाहीत. शोधून तरी सापडेल का असे क्षेत्र? त्यामुळे संप्रदायातही संत ज्ञानोबारायांनी महिलांना दिलेला अधिकार आता कोणी हिरावून घेऊ शकत नाही.
संत ज्ञानोबारायांसह सर्व संतांनी काला केला. सामाजिक ऐक्‍याचा काला केला आणि हा जर काला करायचा नसेल तर त्याला प्रश्न विचारायला हवा मग तू का आला? सामाजिक ऐक्‍य हाच काला आहे, ही फार मोठी क्रांती आहे. त्यामुळेच अठरापगड जातींमध्ये संत निर्माण झाले. इतकेच नाही त्यांचे अभंग कीर्तनात गाऊ लागले, यालाच तर सामाजिक क्रांती म्हणतात. काही संप्रदाय येतात आणि त्या व्यक्तिबरोबर संपतात. ज्ञानोबाराय, नामदेवराव, एकनाथ महाराज, निळोबाराय या संतांनंतर सध्याचे सर्व वारकरी, फडकरी आहेत. म्हणजेच संप्रदायाची परंपरा अव्याहतपणे सुरूच आहे. आध्यात्मिक सत्तेचे विकेंद्रीकरण हाच वारकरी संप्रदायाचा आत्मा आहे. विकेंद्रीकरण म्हणजेच समाजवाद. सर्वांना अधिकार दिले. संत ज्ञानोबारायांनंतर संत नामदेव महाराज यांनी पंजाबपर्यंत संप्रदाय पोचविला. नाम हेच श्रेष्ठ आहे, हे समाजाला सांगितले. नामस्मरणाचा अधिकार सर्वांना दिला.
कोरोनानामक महामारीने दोन वर्ष अवघ्या विश्वाला जखडून ठेवले. कोणाचे काही चालले नाही. वारी दोन वर्ष झाली नाही. लाखो वारकऱ्यांना मनवारी करावी लागली. त्याचा प्रचंड मानसिक त्रास वारकऱ्यांना झाला. यंदा वारी भरली आहे. लाखो वारकरी पंढरीकडे चालले आहे. त्यातून विठ्ठलाप्रती असलेली ओढ दिसून येते. तो आपली वाट पाहतो आहे, याची जाणीव प्रत्येक वारकऱ्याला आहे. विश्वास आहे. म्हणूनच आहे त्या परिस्थितीत वारकरी पंढरीकडे चालतो आहे. कोरोनासारखी कितीही बंधने आली तरी वारकऱ्याची मनवारी कोणीही थांबवू शकणार नाही, ती कधीही थांबणार नाही. कारण ती संतविचाराने प्रेरित झालेली आहे. आहे त्या परिस्थितीवर मात करून वारी विठुरायाच्या चरणी रुजू करणे हा एकमेव उद्देश वारकऱ्यांचा असतो. त्याचे ध्येय एकच असते. पंढरीचा पांडुरंग.
(शब्दांकन ः शंकर टेमघरे)
-----

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j24448 Txt Pc4

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..