
वारी विठुरायाची पुस्तक लेख
हा सुखसोहळा स्वर्गी नाही
आपल्या उपस्य देवतेकडे प्रेमयुक्त ओढीने केलेली येरझार म्हणजे वारी होय. ते जो नित्यनेमाने करतो तो वारकरी. जीवनात साधनेच्या बळावर ज्ञानाचा दिवस अनुभवतो तो वारकरी. पण, कोरोनामुळे दोन वर्ष वारी झाली नाही. यंदा वारी होत असल्याने देव आणि भक्तांच्या भेटीचा सोहळा पंढरीत पुन्हा एकदा भरणार आहे. त्यामुळे भक्त आनंदात आहेच, पण देवालाही त्याचा निश्चित आनंद असणार, यात शंका नाही. प्रत्यक्ष जरी ते दोन वर्ष भेटू शकले नाहीत, तरी मनाने ते सोबतच होते. यंदा प्रत्यक्ष भेटीचा आनंद घ्यायला मिळणार आहे. त्यामुळे पायी वारीत यंदा आनंद सोहळा आहे.
- ह. भ. प. उल्हास महाराज सूर्यवंशी, आळंदी देवाची
वारकरी संप्रदाय हा सर्वसमावेशक संप्रदाय म्हणून ओळखला जातो. देव, संत, ग्रंथ, क्षेत्र आणि साधना या पाच महत्त्वाच्या तत्त्वांवर हा संप्रदाय परिपूर्ण झाला आहे. पंढरीचा पाडुरंग हा या संप्रदायाचे देवत्त्व आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्यासह सकल संतांची मांदियाळी या संप्रदायाला लाभली आहे. ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत यांसारखे ग्रंथ जीवनाला तारक ठरत आहेत. जेथे आपले सर्वस्व समर्पित करावी, अशी पवित्र तीर्थक्षेत्र आहेत. त्यात दोन प्रकार आहेत. एक देवतीर्थ आणि दुसरे संततीर्थ. पंढरपूर हे देवतीर्थ आहे. आळंदी, देहू, त्र्यंबकेश्वर, पैठण ही संततीर्थ आहेत. पाचवे तत्त्व म्हणजे साधना. ती म्हणजे पंढरीची वारी. आपल्या उपास्य दैवतेकडे त्यांचेच गुणगान गात चालत जायचे आणि त्यांच्या चरणी आपली वारी रुजू करायची. विशेष म्हणजे मागणे काहीच मागायचे नाही. वारकरी तर माझी चुकू देऊ नको हेच मागणे मागतात. कारण देवाकडे मागण्यासाठी जातो तो खरा वारकरीच नसते, अशी धारणा आहे. संतांच्या संगतीत देवाचे गुणगान गात काया वाचा मनाने चालत पंढरीला जाणे म्हणजे वारी होय.
वारीत चालताना सर्व वयातील वारकरी दिसतात. तरुण शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असतात. पण काही ज्येष्ठ वारकरी वारीत चालताना दिसतात. जे परंपरेप्रमाणे वर्षानुवर्षे ही साधना करतात. ते शरीराने नसले तरी ते मनाने निश्चित तरुण असतात. म्हणूनच ते वारीत तरुणांइतकाच आनंद वारीत उपभोगतात. हा केवळ आणि केवळ उपास्य दैवतावर असलेली निष्ठेचाच परिणाम म्हणावा लागेल. त्यामुळे वारीत तरुण आणि ज्येष्ठ असा भेद करता येत नाही. दोन्ही आपापल्या भावनेने भक्तिसराचा आनंद घेत वारीत सहभागी होतात.
वारकरी या शब्दाचे अनेक अर्थ निघतात. आपल्या उपस्य देवतेकडे प्रेमयुक्त ओढीने केलेली येरझार म्हणजे वारी होय. ते जो नित्यनेमाने करतो तो वारकरी. वारकरीमधील वार या शब्दाचे अनेक अर्थ होतात. त्यात वार म्हणजे दिवस. जीवनात साधनेच्या बळावर ज्ञानाचा दिवस अनुभवतो तो वारकरी. वार म्हणजे द्वार असेही म्हटले जाते. परमात्मप्राप्तीच्या साधनेची योग्य दिशा देणारा मार्ग म्हणजेही द्वार या अर्थाने घेतले जाते. वार यांचा अर्थ घाव असाही होता. आपल्यातील विकारांवर घाव घालतो, तोच वारकरी अशीही संज्ञा केली जाते.
वारीत सिद्ध आणि साधक अशा दोन्ही अवस्था पाहायला मिळतात. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्यासारखे सिद्ध साधकही असतात आणि आपल्यासारखे सामान्य साधक असतात. त्यामुळे सिद्ध-साधकांचा मेळा म्हणजे पंढरीची वारी होय. वारीमध्ये कर्म असते पण कर्मठपणा नसतो. सर्व जातीधर्माचे संत आणि वारकरी या वारीत दिसून येतात. येथे एकच धर्म असतो तो म्हणजे वारकरी. जो केवळ आणि केवळ सर्वसमावेशकता शिकवितो.
कोरोनामुळे दोन वर्ष वारी झाली नाही. यंदा मात्र वारी होत असल्याने देव आणि भक्तांच्या भेटीचा सोहळा पंढरीत पुन्हा एकदा भरणार आहे. त्यामुळे भक्त तर आनंदात आहेच पण देवालाही त्याचा निश्चित आनंद असणार यात शंका नाही. प्रत्यक्ष जरी ते दोन वर्ष भेटू शकले नाहीत, तरी मनाने ते सोबतच होते. यंदा प्रत्यक्ष भेटीचा आनंद घ्यायला मिळणार आहे. त्यामुळे पायी वारीत यंदा आनंदसोहळा आहे. दोन वर्षांच्या खंडानंतर होणाऱ्या वारीत प्रत्येकाला भेटीची ओढ लागली आहे. मजल दरमजल करीत वारकरी पंढरीकडे चालतो आहे. त्याला असणारा अपेक्षित विसावा पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी मिळणार आहे. त्याचा उत्साह वारकऱ्यांमध्ये निश्चित आहे.
(शब्दांकन ः शंकर टेमघरे)
-----
Web Title: Todays Latest Marathi News Pne22j24451 Txt Pc4
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..