
वारी विठुरायाची पुस्तक लेख
आत्मानंदाचा मार्ग
अनादी कालापासून पंढरीच्या वारीची परंपरा आहे. परंतु, संत ज्ञानेश्वर महाराजांनी सव्वासातशे वर्षांपासून बहुजनांना सोबत घेऊन वारीची वाट पारमार्थिक अर्थाने अधिक विस्तीर्ण केली. पांडुरंगाशी एकरूप होणे हेच वारकऱ्याचे अंतिम ध्येय आहे, याची शिकवण या संत मांदियाळीने दिली. साधक, साधना आणि साध्य ही त्रिपुटी वारीत घडते. वारकरी हा साधक असतो. साधना वारी असते, तर साध्य पंढरीचा पांडुरंग. वारीत कायिक, वाचिक आणि मानसिक उपासना घडतात. त्यामुळेच वारकऱ्यांची सर्वांत महत्त्वाची साधना पंढरीची आषाढी वारी समजली जाते. वारकरी संतांच्या संगतीने पंढरीच्या वाटेने चालू लागले. देहभान विसरून अभंग गात, नाचत देवाच्या गावाला निघाले आहेत. त्यामुळेच गर्दीचा महापूर पंढरीत पाहायला मिळेल.
- ह. भ. प. अच्युत महाराज दस्तापूरकर, नांदेड
गेली दोन वर्षे वैश्विक महामारीमुळे जग हैराण झाले होते. जगभरातील सर्व मोठमोठे सण, उत्सव, यात्रा रद्द कराव्या लागल्या होत्या. मानवी जीवनाला कोणताही धोका होऊ नये, यासाठी सरकार काळजी घेत होते. त्यामुळे दोन वर्ष पायी वारी रद्द करण्याचा सरकारने निर्णय घेतला. तसे पाहिले तर वारी खंडित झाली, असे म्हणता येणार नाही, तर तिच्या स्वरुपात बदल झाला आहे, असे म्हणणे अधिक सोईस्कर होईल. कोरोनामुळे वारकऱ्यांना कायेने बाधा येत असेल; पण मनाला कोणी अडवू शकत नाही. त्यामुळे आलेल्या परिस्थितीला दोष देण्यापेक्षा वारकऱ्यांनी मनोमय वारी केली. घरात बसून ग्रंथवारी केली. बहिर्रंग प्रवास करण्यापेक्षा अंतरंगातून वारीत आध्यात्मिक प्रवास केला. वारीत मिळणारा संत ज्ञानेश्वर महाराजांचा सहवास ज्ञानेश्वरी वाचनातूनही लाभला. नव्या पिढीने या काळात ग्रंथांचे पारायण केले. संत विचारांची नाळ जोडाली. महामारीमुळे आपल्याला प्रतिबंध आला असेल; पण देवाला आपल्याकडे येण्यासाठी प्रतिबंध नाही. वारीचे खरे स्वरूप जीव-शिव ऐक्य हेच आहे. त्यासाठी पंढरपूरलाच जायला पाहिजे, असा अट्टहास करणे दोन वर्ष टाळले. कूर्मदास महाराजांना शरीराने साथ दिली नाही. तेव्हा आषाढी एकादशीच्या दिवशी पांडुरंगाने त्यांना दर्शन देऊन त्यांचा उद्धार केला. हेच वारीचे खरे स्वरूप आहे. वारीच्या नियमात खंड होतो, म्हणून खंत वाटते. पण महामारीत वारी करून संसर्ग वाढविण्यात कारणीभूत ठरलो, तर ती वारी कशी साध्य होईल? त्यामुळे वारकऱ्यांनी घरात बसून मनोमय वारी केली.
यंदा परिस्थिती निराळी आहे. वारीवरील निर्बंध शिथिल केले आहेत. गेल्या दोन वर्षांचा उत्साह यंदाच्या वारीत दिसून येतो. यंदा सर्व पालखी सोहळ्यांमध्ये उच्चांकी संख्येने वारकरी सहभागी झाले आहेत. त्यामुळे वारीला परवानगी मिळाल्याने ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ असीच आवस्था वारकरी अनुभवत आहेत. वारीत यंदा आनंदाला पारावार नाही. कधी नव्हे ते दोन वर्ष वारी झाली नाही. त्यामुळे भेटीची ओढ अधिक आहे. दिंड्या भरभरून गर्दीने वाहत आहेत. भक्तिप्रवाह पंढरीत दाखल होत आहे. नेमकी भक्ती म्हणजे काय पाहायचे असेल तर यंदाच्या वारीकडे पाहावे. त्यातून प्रचिती झाल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक जण ओढीने पंढरीला आला आहे. सर्व चिंता देवावर सोपवून वारकरी संतांच्या संगतीने पंढरीच्या वाटेने चालू लागले. देहभान विसरून अभंग गात, नाचत देवाच्या गावाला निघाले आहेत. त्यामुळेच गर्दीचा महापूर पंढरीत पाहायला मिळेल.
पंढरीची वारी जयाचिये कुळी।
त्याची पायधुळी लागो मज।।
याप्रमाणे अतिशय अभिमानाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील वारकरी पंढरीची वारी करीत आहेत. वारी ही महाराष्ट्राची संस्कती आहे. त्यामुळे जपण्यासाठी वारकरी संप्रदाय झटतो आहे. परंपरा संभाळून समाजात एकतेची बिजे पेरत आहे. विश्वबंधूतेची शिकवण संत ज्ञानेश्वर महाराजांनी दिली. ती पुढे नेण्यासाठी वारकरी संप्रदायाने कायम पुढाकार घेतला आहे. आजही संप्रदायाची परंपरा अतिशय प्रामाणिकपणे जोपासण्याचे कार्य वारकरी संप्रदाय करीत आहे.
(शब्दांकन ः शंकर टेमघरे)
----
Web Title: Todays Latest Marathi News Pne22j24452 Txt Pc4
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..