
वारी विठुरायाची पुस्तक लेख
होय होय वारकरी
प्रपंचाचे गाडे ओढत थकलेला, भागलेला शेतकरी, वारकरी पंढरीकडे डोळे लावून बसलेला असतो. कधी एकदाची वारी येते आणि आम्ही दिंडीच्या माध्यमातून पंढरपुराकडे प्रस्थान करतो. लाखो वारकरी अत्यंत शिस्तबद्धरित्या आपल्या संतांच्या पालखी सोबत अभंग गात चालू लागतात. पालखी सोहळ्यात कुणी गरीब नसतो, कुणी श्रीमंत नसतो. कुणाच्या पदाचा मान अपमान नसतो. सर्व जण केवळ त्या ईश्वराची लेकरे म्हणून प्रवास करीत असतात. वारीत जातीपातीला महत्त्व दिले जात नाही. अत्यंत शिस्तीत चालणारी वारकरी मंडळी अगदी कवायती फौजेला लाजवेल, अशी बघायला मिळते.
- ह. भ. प. जलाल महाराज सय्यद, नाशिक
महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल अर्थातच आम्हा वारकऱ्यांचा पांडुरंग. प्रत्येक देवाच्या नावाने काही न काही उत्सव केले जातात, हीच भारतीय संस्कृती आहे. चंपाषष्ठी हा दिवस कुलदैवत जेजुरीच्या खंडोबाचा असतो. तसेच विठोबाच्या बाबतीत ‘आषाढी कार्तिकी विसरू नका मज’ म्हणत पंढरीचा पांडुरंग आम्हाला आठवण करून देत असतो की माझी वारी जवळ येतेय. तसे बघितल्यास वारी हा विषय वारकऱ्यांच्या जीवनातला अत्यंत आनंदाचा क्षण असतो. प्रपंचाचे गाडे ओढत थकलेला भागलेला शेतकरी वारकरी पंढरीकडे डोळे लावून बसलेला असतो. कधी एकदाची वारी येते आणि आम्ही दिंडीच्या माध्यमातून पंढरपुराकडे प्रस्थान करतो, अशी त्याची अवस्था होते. लाखो वारकरी अत्यंत शिस्तबद्धरित्या आपल्या संतांच्या पालखीसोबत अभंग गात चालू लागतात. पालखी सोहळ्यात कुणी गरीब नसतो, कुणी श्रीमंत नसतो. कुणाच्या पदाचा मान, अपमान नसतो. सर्व जण केवळ त्या ईश्वराची लेकरे म्हणून प्रवास करीत असतात. कुणालाही विशेष दर्जा म्हणून सेवा दिली जात नाही. वारीत जातीपातीला महत्त्व दिले जात नाही. अत्यंत शिस्तीत चालणारी वारकरी मंडळी अगदी कवायती फौजेला लाजवेल, अशी बघायला मिळते. लाखो लोकांच्या जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था कशी होते, हा चमत्कारच म्हणावा लागेल.
वारकऱ्यांची अशी धारणा आहे की, भगवान शिव शंकर हे पंढरपुरीचे पहिले वारकरी असून, त्यांनी प्रथम वारी केलेली आहे. आणि तिही सपत्निक येऊन. पण त्याला इतिहास म्हणून मान्यता नसून ती एक धारणा आहे आणि श्रद्धा हा त्याचा पाया आहे.
मुक्ताईच्या समजावणीनंतर संत ज्ञानेश्वर महाराज पांडुरंगाच्या ओढीने व्याकूळ झाले. ते पूर्वेस बघून पांडुरंगाची वाट बघू लागले असता मुक्ताई म्हणते, ‘दादा पांडुरंग येण्याची वाट बघत बसण्यापेक्षा आपणच जाऊया की. कारण सगुणातूनच निर्गुणाच्या वाटा स्पष्ट होतात.’ ज्ञानराज लगेच तयार झाले आणि निघण्याची तयारी दर्शवली. काळ होता इ. स. १२९१ चा. या वर्षी ज्ञानदेवांनी आपल्या भावंडांसोबत पहिली वारी केली. त्याच काळी संत नामदेव महाराजांचा भागवत धर्माचा विचार आणि ज्ञानदेवांचा नाथ संप्रदायाचा विचार एकत्र करून काही नवीन विचार त्यात मिसळून वारकरी संप्रदायाची उभारणी केली गेली. तसे बघितल्यास वारीची रचना ही त्या काळात शिस्तबद्धपणे करण्यात आली.
उंच पताका झळकती ।
टाळ मृदुंग वाजती ।।
आनंदे प्रेमे गर्जती ।
भद्रजाती विठ्ठलाचे ।।
वारीचे उद्दिष्ट म्हणजे सर्वधर्मसमभाव. वारकरी विचारांची पेरणी आणि शेवटच्या घटकापर्यंत सुखाचा शिडकावा म्हणजे वारी होय.
होय होय वारकरी ।
जाय जाय तु पंढरी ।।
अशीच ही भावना असते.
---
Web Title: Todays Latest Marathi News Pne22j24454 Txt Pc4
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..