वारी विठुरायाची पुस्तक लेख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वारी विठुरायाची पुस्तक लेख
वारी विठुरायाची पुस्तक लेख

वारी विठुरायाची पुस्तक लेख

sakal_logo
By

जगन्नाथाचा रथ...

कोणतेही पदावर कोणीही कार्यरत असो, माउली ही सर्वांसाठी सारखीच असते. यामध्ये फक्त निरनिराळ्या माध्यमातून सेवा करण्याची पद्धत निरनिराळी असते. जो तो आपापल्या सेवा पार पाडल्या की हा जगन्नाथाचा रथ कधी पेलला जातो, याची जाणीवही होत नाही. अशा आध्यात्मिक कार्यात काम करताना कितीही थकलो तरी त्याची जाणीव होत नाही, याचे कारण म्हणजे ती इतर कामांसारखे नसते, तर ती असते माउलींची सेवा. त्यामुळेच त्यात कोणतेही कष्ट होत नाही, उलट अर्थी त्यातून आनंदच अधिक मिळतो.
- रुपाली सरनोबत, तहसीलदार, पुरंदर

जसा वसंताच्या आगमनाने व पहिल्या पावसाच्या शिडकाव्याने निसर्ग बहरून येतो, त्याप्रमाणेच आषाढातील पावसाच्या धारा अंगावर झेलत पालख्या व वारकरी येतात. त्यामुळे आपली संस्कृती देखील बहरते. टाळ-मृदंगाचे मंजूळ स्वर सोबत ज्ञानोबा-तुकाबांच्या अभंगाच्या गोड अभंग हे सर्व मनाला प्रफुल्लीत करून जातात. जनसेवा हीच ईश्वरसेवा हे वारीत सेवा केल्यावर कळते.
कोरोनामुळे तब्बल दोन वर्षे ज्ञानियांचा पालखी सोहळा अनुभवता आला नव्हता. यंदा हा सोहळा मोठ्या आनंदात आणि हर्षोल्लासात पंढरीकडे मार्गस्थ झाला. प्रशासकीय सेवा करीत असताना रोजच कुठल्यातरी वादविवादाला तोंड द्यावे लागत असते, तर कधी जनतेचे दोन शब्द एकूनही घ्यावे लागतात. मात्र, वर्षातून एकदा येणारा पालखी सोहळा व त्यासाठी पूर्ण महिनाभर सुरू असलेली तयारी एक वेगळा अनुभव देऊन जाते. मे महिन्यातच या पालखी सोहळ्याची जाणीव होते. सोहळा प्रमुखांच्या भेटींबरोबरच शासकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दौरे सुरू होतात आणि खऱ्या अर्थी लगीनघाई सुरू होते. यामध्ये वर्षभरातील कामाचा शीण कधी निघून गेला ते कळतही नाही. म्हणून वाटते आयुष्यात एकदा तरी वारी अनुभवावी.
आपले पारंपरिक सण, उत्सव जसे की दिवाळी, यात्रा, श्रावणातील विविध सण ज्याप्रमाणे साजरे केले जातात, तसाच हा पालखी सोहळा देखील एक मांगल्याचा सुखद अनुभव देणारा सणच ठरतो. अन्य सणांप्रमाणेच सणाला आपण जसे घर सजवतो, रांगोळ्या घालतो. पाहुण्याच्या स्वागताची तयारी करतो. अगदी तसाच पारंपरिक सणाचा अनुभव या पालखी सोहळ्यामुळे मिळतो. यंदाची पालखी जास्त आव्हानात्मक होती. तालुक्याची प्रमुख अधिकारी म्हणून मोठी जबाबदारी होती. त्यातही पालखी सोहळा प्रमुखांनी केलेल्या सूचना, शासकीय अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या सूचना या सर्वांचीच सांगड घालत तालुक्यातील आरोग्य व्यवस्था, स्वच्छता, पाण्याचे नियोजन, सुरक्षा व्यवस्था, रस्त्यांच्या दुरुस्त्यांसह पालखी मुक्कामाच्या ठिकाणांची व्यवस्था, अशा एक ना अनेक गोष्टींकडे बारकाईने लक्ष ठेवावे लागते. हे करीत असताना पूर्वीपेक्षाही दुप्पट संख्येने तालुक्यात माउलींच्या पालखीसोबत दाखल होणारा वैष्णवांचा मेळा आणि त्यांच्या सोईसुविधांसाठी सतत कार्यरत असणारे मन. सहकाऱ्यांचा मान सन्मान राखण्याचे मोठे आव्हान उभे होते. मात्र माउलींचे आगमन झाले आणि एखाद्या घरातील लगीनघाई सुरू व्हावी, त्याप्रमाणे यजमानांच्या मदतीला जसे घरातील अनेक हात उभे राहतात. त्याप्रमाणे तालुक्यातील शासकीय अधिकारी, कर्मचारी, विविध संस्था, संघटना, राजकीय पक्ष, नागरिक घरचा उत्सव असल्याप्रमाणे मदतीला उभे राहतात आणि लाखो वैष्णवांचा मेळा कोणतीही तक्रार न होता मार्गस्थ होतो. हा अनुभवच आयुष्यातील शिस्त आणि नियोजन शिकवून जातो. मी तर म्हणते देशातील प्रत्येक शासकीय अधिकाऱ्यांनी पालखी महामार्गावर एखाद्या तालुक्यात, जिल्ह्यात हा पालखी सोहळा ही वारी अनुभवावी.
माउलींच्या कृपेने तालुक्यामध्ये दाखल झालेल्या सर्व लाखो वैष्णवांच्या मेळाव्याला कोठेही गैरसोय होणार नाही, याची काळजी घेत नीरा स्नानानंतर भावपूर्ण निरोप दिला. त्यावेळी मात्र घरातील कोणीतरी आपल्यापासून दूर जात आहे, असे वाटून मन गलबलून आले. शेवटी एकच सांगावेसे वाटते, कोणत्याही पदावर कोणीही कार्यरत असो, माउली ही सर्वांसाठी सारखीच असते. यामध्ये फक्त निरनिराळ्या माध्यमातून सेवा करण्याची पद्धत निरनिराळी असते. जो तो आपापल्या सेवा पार पाडल्या की हा जगन्नाथाचा रथ कधी पेलला जातो, याची जाणीवही होत नाही. अशा आध्यात्मिक कार्यात काम करताना कितीही थकलो तरी त्याची जाणीव होत नाही, याचे कारण म्हणजे ती इतर कामांसारखे नसते, तर ती असते माउलींची सेवा. त्यामुळेच त्यात कोणतेही कष्ट होत नाही, उलट अर्थी त्यातून आनंदच अधिक मिळतो.
----

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j24457 Txt Pc4

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..