सत्ता बदलाचा महापालिका निवडणुकीवर परिणाम? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सत्ता बदलाचा महापालिका निवडणुकीवर परिणाम?
सत्ता बदलाचा महापालिका निवडणुकीवर परिणाम?

सत्ता बदलाचा महापालिका निवडणुकीवर परिणाम?

sakal_logo
By

पिंपरी, ता. ४ : राज्य सरकारमध्ये झालेल्या सत्ता बदलामुळे आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या वातावरणामध्ये फरक पडण्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजपचे सरकार आल्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे तर; राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेत काहीसे ‘बँकफूट’वर असल्याचे दिसून येत आहे.
महापालिका निवडणूक असली तरी राज्यात कोणाचे सरकार आहे, त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. महापालिकेत एकेकाळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एकहाती सत्ता होती. राजकारणाच्या सुरवातीला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पिंपरी-चिंचवडकरांनी साथ दिल्यामुळे या शहरावर अजित पवार यांचे विशेष प्रेम आहे. महापालिकेतील सुरुवातीलच्या काळात बहुतांश विकास कामे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दिवंगत माजी शालेय शिक्षण मंत्री प्रा. रामकृष्ण मोरे यांनी केली. त्यानंतर अजित पवार यांनी बारकाईने लक्ष घालून विकास कामे केली. मागील पाच वर्षात भाजपच्या सत्ता काळातही महापालिकेची व स्मार्ट सिटी अंतर्गत विकास कामे झाली.
मागील अडीच वर्षात अजित पवार यांनी तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर व त्यानंतर विद्यमान आयुक्त राजेश पाटील यांच्यामार्फत अनेक कामे मार्गी लावली. राजेश पाटील यांच्या काळात भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या काही कामांना ‘ब्रेक’ही लागला. प्रभाग रचना करताना राष्ट्रवादी कॉंग्रेसला अनुकूल रचना झाल्याच्या तक्रारी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी केंद्रातील भाजपच्या नेत्यांपर्यंत केल्या. त्यामुळेच राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून काही प्रभागात सुधारित रचना करून पुन्हा फेर प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आला. त्यानंतर त्याला मंजुरी मिळाली. आता राज्यात सत्तांतर झाल्यामुळे दुखावलेल्या भाजपच्या काही मंडळींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
अजित पवार यांनी प्रा. मोरे प्रेक्षागृहात नुकत्याच घेतलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनीही शहरात वातावरण निर्मिती केलेली आहे. अजित पवार यांची विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यामुळे काहीसा दिलासा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मिळाला आहे. परंतु; जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून ज्या पध्दतीने अजित पवार कामे करून घेत होते. तो वचक प्रशासनावर कितपत राहतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अडीच वर्षे सरकार असल्यामुळे शिवसेनेत उत्साहाचे वातावरण होते. परंतु; आता राज्यातील ठाकरे यांचे सरकार जावून शिंदे-फडणवीस यांचे सरकार आल्यामुळे शिवसेनेत काहीसा निरुत्साह आहे.
कॉंग्रेसनेही शहराध्यक्ष कैलास कदम यांनी महागाईपासून ते पाणी टंचाईपर्यंत शहरात सत्ताधारी भाजपच्या विरोधात विविध आंदोलनाच्या माध्यमातून शहरात वातावरण निर्मिती केली आहे. परंतु; राज्यातील सत्ता बदलामुळे काहीशी पक्ष नेतृत्वाकडून मिळणारी ताकद कमी झाल्याची भावना काही कार्यकर्त्यांच्या मनात आहे.

भाजपाला सत्ता बदलाच्या आधीही चांगले वातावरण होते. आम्ही केल्या पाच वर्षात शहरात केलेल्या विकासकामामुळे भाजप १०० पेक्षा जादा जागा मिळविणार आहे. एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यामुळे जे यश मिळणार होते, त्यापेक्षा अधिक यश या सरकारमुळे भाजपला मिळेल.
- एकनाथ पवार, प्रदेश प्रवक्ते, भाजप.

राज्यातील सरकार बदलले तरी येथे फारसा फरक पडणार नाही. ज्या पद्धतीने राज्यातील हे सरकार बनले आहे, ते पाहून लोकांमध्ये नाराजी आहे. मुळात मागील पाच वर्षात भाजपने महापालिकेत केलेल्या भ्रष्टाचारामुळे लोक नाराज आहेत. या सर्व बाबींचा फायदा महाविकास आघाडीला आगामी महापालिका निवडणुकीत होईल.
- अजित गव्हाणे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पिंपरी-चिंचवड.

सत्ता बदलाचा काही फरक आगामी महापालिका निवडणुकीवर होणार नाही. वाढलेली उच्चांकी महागाई, बेरोजगारी, कामगार कायद्यातील भीषण बदल, अग्निपथसारख्या योजनांमुळे देशोधडीला लागलेले तरुण, जाती-धर्मांतील वादांमुळे जनता त्रस्त झाली आहे. महापालिकेतील भाजपच्या भ्रष्टाचाराला, पाणी टंचाईला जनता कंटाळलेली आहे. महाविकास आघाडीचा आगामी काळात विजय
निश्‍चित आहे.
- कैलास कदम, शहराध्यक्ष, कॉंग्रेस पिंपरी-चिंचवड.

महापालिका निवडणुकीवर सत्ता बदलाचा परिणाम होणार नाही. शहरातील शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने आमची यादीनुसार पूर्ण तयारी झालेली आहे. मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात व गेल्या अडीच वर्षात केलेली कामे आम्ही जनतेपर्यंत पोचवू. त्याचा फायदा महाविकास आघाडी व शिवसेनेला निश्‍चितच होईल.
- सचिन भोसले, शहरप्रमुख, शिवसेना पिंपरी-चिंचवड.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j24498 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..