विठाई वारी विशेषांक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विठाई वारी विशेषांक
विठाई वारी विशेषांक

विठाई वारी विशेषांक

sakal_logo
By

सगूण-निर्गुणाची शिदोरी

वारी हा एक आनंद आहे. जीवनाशी एकरूप व्हायला शिकवते ती वारी. जे काही जीवन आहे, ते एक रूप होणं म्हणजे वारी. खरं तर चांगलं, वाईट मिळतं. कधी आहेची प्रचिती येते. कधी नाहीची प्रचिती येते. कधी मिळतं. कधी मिळत नसतं. या सगळ्यांशी तुमची, आमची मानसिकता बदलून जाते. ती म्हणजे वारी. आता वारी पांडुरंगाकडे चालली आहे. कर कटावरी ठेऊन तो तिथे उभा आहे. तो उभा असला तरी, ‘चाले हे शरीर कुणाचे असते’. तो विठ्ठल पांडुरंग परमात्मा आजही आपल्यासोबत चालतो आहे. म्हणजे तो तिथे पंढरपुरात असला तरी आपण चालतोय कुणाचे शक्तीने. माउलींच्या आधारे, शक्तीने त्‍याच्या चालतो वारकरी.
- ह. भ. प. भगवतीताई सातारकर, मुंबई


मी माझ्या जन्मापासून वारी करत आहे. माझे पणजोबा वारीला जायचे. ती परंपरा आमच्या घरात सुरू आहे. आता शंभर वर्षापेक्षा अधिक वर्ष होऊन गेली आहेत. आमच्या घराण्यात अखंडपणे वारी सुरू आहे. माझे पणजोबा सद्गुरु दादा महाराज सातारकर यांच्यापासून वारीची परंपरा आहे. पहिले साताऱ्यापासून दिंडी चालायची. त्यानंतर वारकरी संप्रदायात ते पूर्ण सक्रीय झाले. तेव्हा स्वतःची दिंडी काढली. आता आमची १०५ वी वारी आहे. माझे वय ६४ वर्ष आहे. जन्मापासून म्हणजे ६४ वर्षांपासून मी वारी करत आहे. आईच्या पोटात असतानाच पहिली वारी केली होती. ती आजपर्यंत अखंडपणे सुरू आहे. वारी हा एक आनंद आहे. जीवनाशी एकरूप व्हायला शिकवते ती वारी. जे काही जीवन आहे, ते एक रूप होणं म्हणजे वारी. खरं तर चांगलं, वाईट मिळतं. कधी आहेची प्रचिती येते. कधी नाहीची प्रचिती येते. कधी मिळतं. कधी मिळत नसतं. या सगळ्यांशी तुमची, आमची मानसिकता बदलून जाते. ती म्हणजे वारी. जीवन जगतानासुद्धा ते आपल्याला लक्षात येत नाही. आपण पहिल्यापासून वारीत असतो, त्यामुळे हा मानसिक बदल कधी कधी लक्षात येत नाही. परंतु, तुम्ही नवीन सुरुवात करायला जातात, त्यावेळेसच हा बदल प्रकर्षाने जाणवतो. वारी काय करते? असा प्रश्न जेव्हा उपस्थित होतोय तेव्हा उत्तर येतं, वारी तुम्हाला जीवन जगायला शिकवते.
विचार करत होते की, मी आता वारीत चालत आहे. चालता चालता रस्त्यात थोडं बसलो आहोत. मी मुंबईत असताना असा विचारही केला नसता, की रस्त्यात बसावं. पण, वारीमध्ये रस्त्यात बसले आहे. इतकं आपण वारीच्या वाटेवरील मातीशी एकरूप होऊन जातो. खायला काय आहे? याचा विचारही करत नाही. जे समोर येतं, ते खातो. जसं असतं, ते स्वीकारून चालतो. आंघोळीला पाणी मिळालं तर ठिक, नाही मिळालं तर ठिक. तोंड धुवून चालू लागायचं.
‘आंगोळीला पाणी न मिळे तोंड धुवावे’
माझ्या शेजारी चालणारा कोण आहे? कुठला आहे? कोणत्या जातीचा आहे? कोणत्या धर्माचा आहे? चांगला आहे? की वाईट आहे? याचा विचारही कोणी करत नाही. फक्त विठ्ठलाच्या ओळीने चालत असतो. शुभ-अशुभ याचा विचारही करत नाही. शिवा-शिव, भेदभाव, कशाचाच प्रश्न नसतो. फक्त ‘जय जय रामकृष्णहरी’ हा नाम घोष सुरू झाला की, सर्व शुद्ध होऊन जातं. कशाचाही विचार न करता वारकरी चालत असतो. हेच भागवत धर्माचं व्यापक स्वरूप आहे. भागवत धर्म कळायचं असेल, तर वारीला यावं.
भागवत धर्म करिता भक्ती।
निर्मळ होईल चित्तवृत्ती।
जीव तोची ब्रह्म निश्चिंती।
ऐशी शुद्ध स्फूर्ती ठसावी।...
वारकरी संप्रदाय हा महाराष्‍ट्रात आहे. थोडेशे आगळे वेगळेपणाने वारीचं स्वरूप घेतलं तरी कळतं की, वारकरी संप्रदाय किंवा भागवत धर्म आहे. जो पूर्ण विश्वाशी निगडित आहे, असा धर्म म्हणजे वारकरी. जे जे काही आहे अर्थात,
जे जे देखो जाये विठी
तव तव आत्मतोची ओठी
बाप गुरू वाक्याची दिठी
दृष्याच्या पोटी परब्रह्म नांदे...
दृष्य जे आहे. त्याच्या पोटी परब्रह्म नांदते. जो भागवत धर्मीय आहे, तो या प्रचितीने जगतो. ही प्रचिती पुन्हा पुन्हा येत असते. सामान्य माणूस जीव म्हणून जगतो. वारी करतो. तुमची दृष्टी पुन्हा पुन्हा स्वच्छ करतो. आपण म्हणतो ना की, जमिनीवर या. सामान्य जीवालासुद्धा वास्तव जीवनाच्या जमिनीवर आणण्याचे काम वारीत होते. तुम्ही कोणीही असा. डॉक्टर असा. इंजिनिअर असा. महाराज असा. तुम्ही महाराज म्हणून कितीही मोठे असा, तो वारीत चालतो. अभंग म्हणतो. रामकृष्णहरी म्हणतो. आणि मातीत बसतो. कुठेही बसतो. कुठेही खातो. तेव्हा तुम्ही मुळ वास्तवाशी जीवनाशी जोडले जातात. तुमचं नातं मूळ वास्तवाशी जोडले जाते. वारी हे करते.
विठ्ठल जळी स्थळी भरला
रिता ठाव नाही उरला
आजी म्या दृष्टीने देखिला
दृष्टीने कुठे आपण विठ्ठल बघतो. आता वारी पांडुरंगाकडे चालली आहे. कर कटावरी ठेऊन तो तिथे उभा आहे. तो उभा असला तरी, ‘चाले हे शरीर कुणाचे असते’. तो विठ्ठल पांडुरंग परमात्मा आजही आपल्यासोबत चालतो आहे. म्हणजे तो तिथे पंढरपुरात असला तरी आपण चालतोय कुणाचे शक्तीने. माउलींच्या आधारे, शक्तीने त्‍याच्या चालतो वारकरी. संत मायबाप आपल्याला घेऊन चालतात. त्यांच्यात शक्तीने आपण चालतो. तुमच्या आमच्यात हे चैत्यन कुणाच्या शक्तीने आहे.
चाले हे शरीर कुणाचे असते।
कोण बोलविते हरिवीण।।
देखवी ऐकवी एक नारायण।
तयाचे भजन चुकवू नका।।... हे भजन चुकवू नये म्हणून वारी. वारी ही अद्वैत प्रचिती आहे. ‘देव आहे पंढरपुरात’, हा विचार घेऊन वारकरी चालत असतो. वारकरी हा अत्यंत हुशार आहे. व्यापक आहे. तो महान आहे. तो कितीही थकला तरी म्हणतो, ‘मायबापाने चालवून घेतलं बरं का!’, ‘माउलीनं चालवून घेतलं बरं का!’ म्हणजे काय तर, द्वैत प्रचितीने तो चालतो. पण, अद्वैत त्याच्यात ठासून भरलेलं असतं. हे वैशिष्ट्ये वारकरी संप्रदायाचं आहे. की द्वैत-अद्वैत दोन्ही घेऊन तो चालतो.
दो ओठी एक बोलणे।
दो पायी एक चालणे।
तुज सगूण म्हणू की निर्गुण रे।
सगूण निर्गुण एकू गोविंदू रे।...
असे प्रत्यक्ष दर्शन बघायचं असेल तर ती आहे वारी. हेच वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्ये आहे. भागवत धर्म अधिक वैशिष्ट्येपणाने जिथे दाखवला जातो, तो महाराष्ट्र आहे. सर्व भारत बघा. उत्तर हिंदुस्थानातही मोठमोठे संत झालेत. पण, वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्ये, हे आहे की इथे भक्तीला प्राधान्य आहे. विचारालासुद्धा प्राधान्य आहे. म्हणून ‘ज्ञानदेवे रचिला पाया।’. म्हणजेच भागवत धर्माला खुलवून जे सांगितले, ‘प्रगट गुह्य बोले’, हे ज्ञानेश्वर महाराजांनी केले. म्हणूनच ज्ञानाच्या आधारे व्यक्त होणारी वारी. ही अद्वैत प्रचिती आहे. द्वैताच्या आधारे अद्वैताची प्रचिती, ही ज्ञानोबारायांनी घालून दिले आहे. म्हणून ते ज्ञानी असून सुद्धा,
‘माझी जिवेची आवडी।
पंढरपुरा नेईन गुढी।।
पांडुरंगी मन रंगले।
गोविंदाचे गुण विधले।।... असे म्हणतात.
वारीची ही दृष्टी संतांनी दिली आहे. माझे पणजोबा सद्गुरु दादा महाराज, माझे आजोबा सद्गुरु आप्पा महाराज व माझे वडील सद्गुरु बाबा महाराज यांनी आमच्यात जे रुजवलं, तेच आमचे व्यक्त होणे. अर्थात जे तुम्ही पेरता, तेच उगवते.
भूमीची मार्दव सांगे,
कोंबाची लव लव... तशी आमची लव लव वरवरची असली तरी, आमच्या सद्गुरुंनी जी पेरणी केली, ज्ञानोबा-तुकोबांनी जी पेरणी केली, तीच आमच्यात उगवणार आहे. दुसरे काहीही उगवणार नाही. जय जय रामकृष्णहरी!
(शब्दांकन ः पीतांबर लोहार)
--

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j24557 Txt Pc4

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..