
वारी विठुरायाची पुस्तक लेख
सेवेचे मोल अनमोल
सेवेतील आनंद काय असतो, ते सेवा केल्याशिवाय कळत नाही. अगदी तशीच सेवा मला करायला मिळते. ती सेवा नेमकी काय आहे, हे शब्दात सांगणे अवघड आहे. त्यामुळेच मी फक्त इतकेच सांगेल की विठुरायाने माझ्याकडून ही सेवा अशाच प्रकारे करून घ्यावी, मग पद असो वा नसो. सेवा महत्त्वाची आहे. वारीत लहान मोठा असा कोणताच भेदभाव दिसत नाही. सर्व माउलींचे वारकरी विठ्ठलाची आस घेऊन पंढरीला चालत असतात.
- जयश्री चव्हाण, सरपंच, तरडगाव
वारकरी संप्रदायाचे गाव म्हणून तरडगावची ओळख. आमच्या गावात नेहमीच भजन, कीर्तन, प्रवचन, ज्ञानेश्वरी पारायण हे वर्षभर काही ना काही निमित्ताने चालूच असतात. त्याचा आनंद आम्ही वर्षभर घेतो. आनंद अजून द्विगणित होतो, तो ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीच्या सोहळ्याच्या रुपाने.
स्वतः मी वारकरी संप्रदायातील. आमच्या सासू-सासरे यांनी २० वर्ष पायी वारी केली आहे. त्यामुळे मला स्वतःला सुरुवातीपासूनच आषाढी वारीविषयी नितांत ओढ आहे. आयुष्यात एकदा तरी पायी वारी करून तो आनंद घेण्याची माझी इच्छा आहे.
तरडगाव येथील माउलींच्या पालखीचे महत्त्व पूर्ण वैशिष्ट म्हणजे चांदोबाच्या लिंब येथील पहिले उभे रिंगण. खरे तर हे आमचे गावाचे भाग्यच. संपूर्ण महाराष्ट्रातून वारकरी व अन्य भाविक लाखोंच्या संख्येने माउलींचे अश्व धावत असताना पाहायला मिळणे आणि त्यांच्या पायाची धूळ मस्तकी लाऊन माउली माउलीचा जयघोष आसमंतात दरवळतो, हे पाहायला मिळणे भाग्यच. आळंदी ते चांदोबाचा लिंब या पायी वारीत आलेला थकवा माउलींच्या या अश्वाकडे पाहून माउली माउलीचा जयघोष करत निघून गेलेला असतो. घरी येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला आपण काहीतरी दिले पाहिजे, त्याच्यासाठी जेवण, आंघोळीचे पाणी, चहा अगदी छोट्याछोट्या गोष्टी करताना एक विलक्षण आनंद मिळत असतो. त्याची तुलना कशाबरोबर होऊ शकत नाही.
आषाढी वारीत काळ पावसाचा असतो. वारकऱ्यांना बसायलासुद्धा जागा कुठे राहत नाही. कोणतीही तक्रार न करता पुन्हा हरिनामाचा जयघोष सुरू असतो. मला तर वाटते ऊन, वारा, पाऊस एवढे सगळे करूनही चेहऱ्यावर आनंद आणि चालण्याची शक्ती त्यांना प्रत्यक्ष माउलीच देत असावी. आता मी एका ८२ वर्षांच्या आजींना पायी वारी करताना बघितले. किती आश्चर्य आहे. हे सगळं पांडुरंगाला भेटायची ओढ एवढी आहे, की त्यापुढे त्यांना वयाची ही भान राहिले नव्हते. एखाद्या सोळा वर्षांच्या मुलीप्रमाणे त्या वारीत चालत होत्या.
पालखी यायची म्हटले की, महिनाभर आधीच आमची तयारी सुरू असते. वारकऱ्यांच्या स्वागतासाठी घराची साफसफाई, रंगरंगोटी, वारकऱ्यांच्या स्वयंपाकासाठी लागणाऱ्या साहित्याची जमवाजमव, त्यांना काही कमी पडू नये, यासाठी प्रत्येक घरातून जेवण तयार केले जाते. आपल्या घरी किमान पाच वारकरी तरी जेवले पाहिजे, असा आग्रह असतो.
मी तरडगावची लोकनियुक्त सरपंच या नात्याने प्रशासनातर्फे वारकऱ्यांसाठी सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करते. परंतु, मी सरपंच होण्यामागे आमच्या घरावर असलेला वारकरी संप्रदायाचा आशीर्वाद, पांडुरंगाची कृपाच आहे. पांडुरंगाच्या आशीर्वादाने तरडगावसारख्या मोठ्या सांप्रदायिक गावांमध्ये सरपंचपद मिळणार हे अशक्यच. पण त्या पांडुरंगाची कृपा, माउलींची कृपा.
तरडगावचे एक वैशिष्ट्य म्हणजे वारीत पालखी रथातून उतरवून तीन-साडेतीन किलोमीटर खांद्यावर घेऊन जाण्याची परंपरा आहे. पालखीचे स्वागत ग्रामपंचायत तरडगाव करतेच. त्याचबरोबर गावामध्ये विठ्ठल मंदिर, पवार वाडा, चाफळकर वाडा, बापू बुवा मठ या ठिकाणी मानाच्या पूजा असतात. गावात येताना पालखी लांबून दिसली, तरी त्या क्षणी होणारा आनंद गगनात मावत नाही. पालखी तळावर पोचल्यानंतर साधारण सायंकाळी साडेसहा वाजता आरतीच्या वेळी आलेला अनुभव अगदी वेगळा असतो. लाखोंच्या संख्येने जमलेला जनसमूदाय अखंडपणे माउली माउली असा जयघोष करीत असतो. चोपदारांने दंड उभा केल्यावर सर्वत्र शांतता पसरते. ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्यात आमच्याकडे ‘हराळे वैष्णव समाज’ दिंडी जेवणासाठी असते. तो सगळा स्वयंपाक आम्ही घरीच करत असतो. स्वयंपाक करत असताना कधी कंटाळा म्हणून येत नाही. माउलींना जेऊ घालण्याची हे मोठे भाग्यच आहे. वारीत लहान मोठा असा कोणताच भेदभाव दिसत नाही. सर्व माउलींचे वारकरी विठ्ठलाची आस घेऊन पंढरीला चालत असतात.
माउलींच्या पालखी सोहळ्यात दिंडी विणेकरी, पताका, तुळशीवाल्या बाई, मृदंगावादक जसे आहेत, तसाच एक वारीचा महत्त्वाचा घटक पोलिस, डॉक्टर्स, नर्स, स्वच्छता दूत यांचीही वारी काळात २४ तास सेवा असते. स्वच्छतादूत आरोग्यदायी व निर्मल वारी करीत असतात. वारी हे एकतेच प्रतिक आहे. कोणताही भेदभाव नाही. लहान-मोठे, गरीब-श्रीमंत, स्त्री-पुरुष सर्व पांडुरंगाची लेकरे. शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते की, पंढरीच्या वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांची सेवा मला सरपंच म्हणून करायला मिळते, हे माझे भाग्यच आहे. यामध्ये मला मनस्वी आनंद आहे. सेवेतील आनंद काय असतो, ते सेवा केल्याशिवाय कळत नाही. अगदी तसेच ती सेवा मला करायला मिळते. ती सेवा नेमकी काय आहे, हे शब्दात सांगणे अवघड आहे. त्यामुळेच मी फक्त इतकेच सांगेल की, विठुरायाने माझ्याकडून ही सेवा अशाच प्रकारे करून घ्यावी. मग पद असो वा नसो. सेवा महत्त्वाची आहे. त्याला बाकी कोणतीही मर्यादा नसते.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Web Title: Todays Latest Marathi News Pne22j24788 Txt Pc4
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..