पिंपरी शहरात व्हॉटस् अ‍ॅप-चॅट बॉट प्रणाली उपलब्ध - राजेश पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rajesh Patil
व्हॉटस् अॅप-चॅट बॉट प्रणाली उपलब्ध आयुक्त राजेश पाटील यांची माहिती; आरोग्य समस्या निवारणासाठी सुविधा

पिंपरी शहरात व्हॉटस् अ‍ॅप-चॅट बॉट प्रणाली उपलब्ध - राजेश पाटील

पिंपरी - शहरातील नागरिकांना आरोग्य विभागाच्या सेवासुविधा संबंधी समस्यांचे निराकरण करण्यासाठी महापालिकेने व्हॉटस् अ‍ॅप-चॅट बॉट प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. त्याचा प्रारंभ आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्या हस्ते झाला. त्यामुळे घरात बसून नागरिकांना ८८८८००६६६६ या मोबाईल क्रमांकाद्वारे आरोग्याबाबत माहिती मिळणार आहे.

महापालिकेमार्फत अद्ययावत तंत्रज्ञानाचा योग्य पद्धतीने उपयोग करून, नागरिकांना वेळोवेळी उत्तमोत्तम सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये महापालिकेचे अद्ययावत संकेतस्थळ, स्मार्ट सारथी मोबाईल अ‍ॅप आणि सारथी हेल्पलाइन आदींचा समावेश आहे. आता व्हॉटस् अ‍ॅप-चॅट बॉट प्रणाली सुरू केली आहे. याचा वापर करून नागरिकांना आरोग्य विभागाच्या सेवा सुविधा संबंधी समस्यांचे निराकरण करण्यासाठी नव्याने सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

आभासी सहायक चॅट बॉट या नव्याने विकसित केलेल्या प्रणालीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला आहे. त्याद्वारे नागरिकांचे प्रश्न आत्मसात करून योग्य उत्तरे चॅट बॉट मार्फत प्राप्त होतील. बृहन्मुंबई महापालिकेने सर्वप्रथम चॅट बॉट प्रणाली वापरली आहे. तिचा वापर करणारी पिंपरी-चिंचवड महापालिका राज्यातील दुसरी महापालिका ठरली आहे. नागरिक आणि प्रशासन यांच्यामधील संवाद साधण्याचा जलद दुवा म्हणून ही प्रणाली प्रभावी ठरणार आहे. सहज सुलभ संवादाचे माध्यम महापालिकेने उपलब्ध करून दिले असून, शहरातील नागरिकांनी जास्तीत जास्त चॅट बॉट प्रणालीचा वापर करावा, असे आवाहन आयुक्त पाटील यांनी केले.

अशी मिळवा माहिती

महापालिकेचे ८८८८००६६६६ हा मोबाईल क्रमांक आपल्या मोबाईलमध्ये समाविष्ट करावा. त्यानंतर व्हॉटस् अ‍ॅपद्वारे नागरिकांना चॅट बॉट प्रणालीचा वापर करता येईल. समाविष्ट मोबाईल क्रमांकाद्वारे व्हॉटस् अ‍ॅपद्वारे ‘मेनू’ असे टाइप करावे. त्यानंतर नागरिकांना त्यांच्या सोयीनुसार भाषा निवडण्यासाठी ‘मराठी’ अथवा ‘इंग्रजी’ असे दोन भाषांचे पर्याय उपलब्ध होतील. भाषेचा पर्याय निवडल्यानंतर आपला मोबाईल क्रमांक सत्यापित (व्हेरीफाय) करण्यासाठी आपले नाव सदर ठिकाणी नमूद करणे आवश्यक आहे. आपले नाव सत्यापित झाल्यानंतर आपली तक्रार नोंदविण्यासाठी सदर पर्याय उपलब्ध होईल.

असे असेल तक्रारींचे स्वरूप

व्हॉटस् अ‍ॅप-चॅट बॉट प्रणालीद्वारे नागरिकांना कचरा उचलणारे वाहन आले नाही, महापालिका संदर्भातील तक्रारी, सार्वजनिक शौचालय, मृत जनावरे, रस्ते साफसफाई, सांडपाणी रस्त्यावर वाहने, बांधकाम राडारोडा उचलणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा पडून असणे, कचरा जाळणे अशा प्रकारच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी प्रणालीची मदत होणार आहे. सद्यःस्थितीत प्रायोगिक तत्त्वावर आरोग्य विभागा संदर्भातील सेवा सुविधा या प्रणालीद्वारे उपलब्ध करून दिलेल्या असून लवकरच इतर विविध विभागांच्या सेवा सुविधाही उपलब्ध करून देण्याचा महापालिकेचा मानस आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j25237 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..