
अधिकारी, कर्मचाऱ्यांना झटका विविध कारणांमुळे पोलिस आयुक्तांकडून कारवाई
पिंपरी : कर्तव्यात कसूर करणारे, अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष करणारे, अनेक दिवसांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडून असलेले अधिकारी, कर्मचारी पोलिस आयुक्तांच्या निशाण्यावर आहेत. त्यांना मागील आठ दिवसांत आयुक्तांनी चांगलाच झटका दिला आहे. पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पदभार स्वीकारल्याच्या पहिल्या दिवसापासूनच अनेक बेधडक निर्णय घेतले आहेत. त्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कार्यपध्दतीकडेही बारीक लक्ष दिले आहे. नागरिकांच्या तक्रारी घेण्यास टाळाटाळ करणे, चुकीच्या पद्धतीने कामकाज करणे, अवैध धंद्यांना पाठबळ देणे, कामचुकारपणा, कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरु केली आहे. त्यांना नियंत्रण कक्ष, मुख्यालय, आरसीपी पथकाशी संलग्न केले. तसेच मोठ्या प्रमाणात पोलिस निरीक्षकांच्या बदल्याही केल्या आहेत.
सोमवारी (ता. ४) दोन निरीक्षक व दोन उपनिरीक्षक यांना नियंत्रण कक्ष व आरसीपी पथकाशी संलग्न केले आहे. निगडी ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गणेश जवादवाड यांना नियंत्रण कक्षाशी तर गुन्हे शाखा युनिट दोनचे निरीक्षक शैलेश गायकवाड यांना आरसीपी पथक येथे संलग्न केले. यासह आळंदी ठाण्यातील उपनिरीक्षक इक्बाल इस्माईल शेख व अशोक नागू गांगड यांना नियंत्रण कक्षाशी संलग्न केले. तसेच मंगळवारी (ता. ५) तब्बल १७ पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या केल्या.
त्यानंतर गुरुवारी (ता. ७) पुन्हा आयुक्तांनी मोठा झटका दिला. म्हाळुंगे चौकीचे सहायक निरीक्षक दत्तात्रेय गुळींग यांना पिंपरी पोलिस ठाण्याशी तर याच चौकीचे सहायक निरीक्षक सुरेश निवृत्ती यमगर यांना पोलिस नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आले. तसेच म्हाळुंगे चौकीतील हवालदार अमोल बाळासाहेब बोराटे व शिपाई शरद शांताराम खैरे यांना पोलिस मुख्यालयाशी तर अंमली पदार्थ विरोधी पथकातील शिपाई विजय दीपक दौंडकर यांनाही मुख्यालयाशी संलग्न केले आहे. दरम्यान, पोलिस आयुक्तांनी पाठोपाठ घेतलेल्या या निर्णयामुळे पिंपरी चिंचवड पोलिस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22j26053 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..