रंगाचा बेरंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रंगाचा बेरंग
रंगाचा बेरंग

रंगाचा बेरंग

sakal_logo
By

रंगाचा बेरंग
--------------
सु. ल. खुटवड
---------------------------

‘‘अगं परवा बाबा येणार आहेत.’’ मोबाईल बंद करून स्वयंपाकघराकडे पाहत मंगेशने म्हटले.
‘‘क्का ऽऽऽय ! गेल्या वर्षी तर आले होते. चांगले तीन दिवस राहिले होते. मी आता काय काय सांभाळू? मुलं सांभाळू? तुम्हाला सांभाळू? घर सांभाळू ? का तुमच्या बाबांना सांभाळू? ’’ त्रागा करीत पल्लवीने म्हटले.
‘‘अगं तू फक्त जीभ सांभाळ. सगळं व्यवस्थित होतंय.’’ याही परिस्थितीत मंगेशने टोमणा मारला.
पण हा टोमणा तिच्यापर्यंत न पोचल्याने पुढचं महाभारत टळलं.
‘‘हे बघा, कतरिना यंदा दहावीला आहे. तिचा अभ्यास घेता घेता माझ्या नाकी नऊ येतात. त्यातच माझी कंबरदुखी..आऽऽई गं.ऽऽऽ. आता काय मी जगत नाही.’’ असे म्हणून कंबरेवर हात ठेवत तिने डोळ्यातून पाणी काढले. तिच्याकडे पाहून मंगेश विचारत पडला, की बायको काय नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून शिकून आली आहे काय? तिच्यासारखी ‘ड्रामा’बाजी तर कसलेल्या अभिनेत्यालाही जमणार नाही. सासरची माणसं आली की कंबरदुखी नाहीतर डोकेदुखी झालीच म्हणून समजा आणि वर भांड्यांची आदळआपट आहेच. पण हेच जर माहेरची माणसं आली तर चित्र एकदम बदलतं. त्यांच्यासाठी काय करू आणि काय नको, असं तिला होऊन जातं. त्यासाठी तिला दिवसाचे चोवीस तासही अपुरे पडतात.
‘‘अगं माझे बाबा येणार नाहीत. तुझे बाबा येणार आहेत.’’ मंगेशने असं म्हटल्यावर पल्लवीच्या चेहऱ्यावरील भाव झरझर बदलले. कपाळावरच्या आठ्यांची जागा कौतुकाने घेतली. ‘‘अगं बाई ! बाबा येणार आहेत होय? तीऽऽन महिन्यांनतर पहिल्यांदाच येत आहेत. मागच्या वेळी त्यांना पाहुणचार कमी पडला होता. आता त्यांना महिनाभर येथून हलूनच देणार नाही. तुम्ही आता ऑफिसला रजा टाका. आपण पाहुणचारात कुठे कमी पडायला नको.’’ असे म्हणून तिने कामांची यादी काढली.
‘बाबांना हे आवडते’ ‘ते आवडत नाही’ असे म्हणून तासभर तिने ‘बाबापुराण’ चालू केले.
‘‘अहो मागच्या वेळी बाबांना टीव्हीवर क्रिकेटची मॅच बघताना फार त्रास झाला. कोण ‘फुटबॉल’ मारतोय आणि कोण रॅकेट मारतंय, हेच त्यांना कळत नव्हते.’’
क्रिकेटमधील तिचं अगाध ज्ञान पाहून, मंगेशने डोळे मिटून घेतले पण कान मिटून घेण्याची सोय नसल्याने तिचं बोलणं मंगेशच्या कानावर पडू लागलं.
‘‘पहिल्यांदा ते टीव्हीचं खोकं भंगारात टाका आणि चांगला एलसीडी घ्या. माझ्या बाबांना सगळं नीट दिसलं पाहिजे. त्यांच्याकडून कसलीही तक्रार चालणार नाही, आधीच सांगून ठेवते.’’ पल्लवीने त्याला इशारा दिला.
मंगेशने मग चाळीस हजारांचा हप्त्यावर टीव्ही आणला. त्यानंतर सोफ्याचे कव्हर बदलण्याचा आदेश निघाला. त्याचीही त्याने अंमलबजावणी केली. बाबांसाठी स्वतंत्र बेड आणायला सांगितला. मंगेशने कर्ज काढून तोही आणला.
‘‘अहो, हे घर फारच जुनं झालंय. बाबांना येथं राहायला कसंच तरी होतं.’’ पल्लवीने नवीन मागणी केली.
‘‘अगं पण दोन दिवसांत नवीन घर कसं घेणार? आणि त्यासाठी किमान चाळीस-पन्नास लाख लागतील, ते कोठून आणणार? काहीतरी लॉजिकली बोलत जा ना.’’ मंगेशने रागाने म्हटले.
‘‘माझ्या बाबांपेक्षा तुम्हाला पैसाच महत्त्वाचा वाटणार? एक नवीन घर घ्या म्हटलं तर तुमच्या जिवावर येतंय. मी दिवस-रात्र राब राबतेय, ते दिसतंय का कोणाला’’?
पल्लवीनं डोळ्यातून पाणी काढलं.
‘‘अगं घर घेणं म्हणजे काय चप्पल, साडी खरेदीसारखं सोपं आहे काय?’’ मंगेशने नरमाईने म्हटलं. त्यावर तीही वरमली.
‘‘ठीक आहे, नवीन घर घेऊ शकत नाही तर किमान घराला रंगरंगोटी तरी करा. बाबांना येथे राहण्यात समाधान वाटलं पाहिजे.’’ बायकोची ही मागणी मंगेशने मान्य केली.
दुसऱ्या दिवशी सकाळी रंगाऱ्यांच्या गाठीभेटी घ्यायला मंगेशने सुरवात केली; पण कोणीही तातडीने कामाला यायला तयार नव्हते. तो चार-पाच हजार रुपये जादा द्यायला तयार झालो; पण सगळ्यांनी नकार दिला. ही अडचण त्याने पल्लवीला सांगितली.
‘‘वाटलंच मला, माझे बाबा येणार म्हटले, की तुमच्या पोटात दुखणार. आता त्यांच्यासाठी रंगकाम काढले तर त्यात सतराशे विघ्न आणाल. तुमच्या मनात नसले की असंच होणार.’’ असं म्हणून पल्लवी स्फुंदून रडू लागली.
‘‘माझ्या बाबांनी माझ्यासाठी किती केलंय. खूप हालअपेष्टा सोसून, त्यांनी मला फुलासारखं वाढवलंय आणि मी त्यांच्यासाठी साधं रंगकामही करू शकत नाही. तुम्ही वाट्टेल ते करा पण दोन - तीन दिवसांत घर नवीन दिसलं पाहिजे.’’ पल्लवीनं असं भावनाविवश म्हटल्यावर मंगेश पुन्हा रंगाऱ्याच्या शोधार्थ निघाला.
रंगांच्या दुकानात बरीचशी विचारपूस केली. दोन- तीन रंगाऱ्यांचे नंबरही घेतले. एकाने आधी दहा हजार रुपये अॅडव्हान्स द्या, पुढच्या आठवड्यात कामाला सुरवात करतो, असे सांगितले. दुसऱ्याला कसं तरी तयार केलं.
‘‘साहेब, मी आणि माझा जोडीदार दोन दिवसांत तुमचं रंगकाम करून देतो पण आम्हाला दोनवेळा चहा व नाश्ता व दुपारचं जेवण तुम्हाला द्यावं लागंल. शेवटच्या दिवशी आम्हाला फिस्ट लागते.’’ बापू रंगाऱ्यानं म्हटलं.
‘‘फिस्ट म्हणजे काय’’? असं मंगेशने विचारलं.
‘‘अहो फिस्ट म्हणजे फार काय नसतं. मटण नाहीतर मासे करायचे. मासे करणार असाल तर सुरमई किंवा पापलेटशिवाय आम्ही कशाला हात लावत नाही आणि मटण करणार असाल तर बोल्हाईशिवाय आम्ही तोंडात घास घेत नाही आणि एवढं केल्यावर एक छोटासा खंबा लागतोच. त्याशिवाय आम्हाला जेवण जात नाही. म्हणजे हे सगळं तुम्ही घरीच करायला पाहिजेल, असं काही नाही. फिस्टचे वेगळे दोन हजार रुपये आम्हाला दिले तरी चालतील. मंजूर असंल तर दहा मिनिटांत तुमच्या घरी हजर होतो.’’ बापू रंगाऱ्याने त्याच्या अटी सांगितल्या.
‘‘चहा ठीक आहे हो. पण नाश्ता, जेवण त्यात फिस्ट म्हणजे जरा जास्तच होतंय.’’ मंगेशने म्हटले.
‘‘आता एवढं तुमचं घर आम्ही नव्या नवरीगत सजवून देणार आणि तुम्हाला एवढीसी माणुसकी जपता येईना व्हय. अहो, हे तर काहीच नाही. आम्ही जिथं जातो ना, तिथले मालक लोक रोज आम्हाला प्रेमानं खाऊ घालत्यात. घासातला घास देतात. शिवाय रोज घरी जाताना हजार - पाचशे बक्षिस म्हणून हातावर टेकवत्यात. उगाचंच नाही त्यांच्या घराची भरभराट होत. रंगकाम करणाऱ्यांना तुम्ही खूष करा. मग बघा तुमच्या घरी लक्ष्मी पाणी भरते का नाय? आतापर्यंत मी दोनशे घरांचं रंगकाम केलंय. सगळ्यांनी मला चांगलं खाऊ- पिऊ घातलं आणि ठरलेल्या रक्कमेपेक्षा जास्त पैसे वक्षिस म्हणून दिले. त्यांनी खोऱ्यांनी पैसा कमावला. सगळी सुखं त्यांच्या पायाशी लोळण घेऊ लागली पण दोन जणांनी मला फसवलं. माझे ठरलेले पैसेही त्यांनी मला दिले नाहीत. वर्षभरात त्यांचे दिवाळे निघाले.’’ बापू रंगारी त्याच्या कहाण्या सांगत होता. ते ऐकून मला कोठल्या तरी देवांच्या नावे खपवल्या जाणाऱ्या ‘ही पन्नास पत्रे इतरांना पाठवा’, किंवा ‘हा व्हॉटसअपवरील मेसेज शंभर जणांना फॉरवर्ड करा व आठवड्यात सुखात नांदा’, या टाईपचे संदेश मंगेशला आठवले.
पण मंगेशला फारच गरज असल्याने त्याने त्याच्या सर्व मागण्या मान्य केल्या. पण काम वेळेत आणि दर्जेदार झालं पाहिजे, असं ठणकावून सांगितलं. त्यावर
‘‘एक हजार रुपये किरकोळ खरेदीसाठी द्या. मी आणि बिगारी दोघं दहा मिनिटांत तुमच्या घरी हजर होतो.’’ असं बापूनं सांगितलं. मंगेशने मुकाट्याने एक हजार रुपये त्याच्या हातात टेकवले. मग मंगेशने त्याच दुकानातून रंग व इतर वस्तू खरेदी केल्या व रिक्षाने तो घरी आला. दहा मिनिटांत येतो, असा सांगणारा बापू रंगारी तीन तासानं त्याच्या बिगाऱ्यासोबत आला. घराचं त्यानं नीट निरीक्षण केलं. ‘घर भाड्याचं आहे का स्वतःचं’ बापूनं विचारलं.
हा प्रश्न ऐकून मंगेशची सटकली. ‘‘तुम्हाला काय करायचंय घर भाड्याचं की स्वतःचं आहे. तुम्ही आधी कामाला सुरवात करा.’’ तीन तास वाट पहायला लागल्याचा राग मंगेशने काढला.
‘‘अहो, घर भाड्याचं असलं म्हणजे आम्ही फार मनापासून काम करत नाही. वरवरचं करतो कारण तुम्ही शेवटी त्या घरचे पाहुणे असतात. आज ना उद्या तुम्हाला बाहेर जावे लागणार असते. मात्र, घर तुमचे असेल तर आम्ही मन लावून काम करतो म्हणून विचारले.’’ त्यावर मंगेशने घर स्वतःचं असल्याचं सांगितलं.
‘‘बरं कामाला सुरवात करण्यापूर्वी आम्हाला तरतरी आली पाहिजे. त्यासाठी कडक चहा पाहिजे.’’ बापू रंगाऱ्यानं असं म्हटल्यावर पल्लवीनं भांड्यांची आदळआपट सुरू केली. मग मंगेशनेच स्वतः च चहा करून आणला. चहा पिल्यानंतर दोघांनाही तरतरी आल्याचे त्यांनी सांगितले. दर तासाला असा चहा मिळाला तर तीन दिवसांत आपण कामाचा फडशा पाडू, असं बापूनं सांगितल्यावर मंगेशने ऐकून न ऐकल्यासारखं केलं.

‘‘मालक, पुट्टी केली पाहिजेल का प्रायमरवर भागवू?’’ बापूनं असं विचारल्यावर मंगेश बुचकाळ्यात पडला. मग त्याने पुट्टी म्हणजे काय, प्रायमर कशाला म्हणतात, असं अर्धा तास व्याख्यान दिलं. सगळं ऐकून घेतल्यावर ‘पुट्टी करा,’ असं मंगेशने सांगितलं.
‘‘पुट्टी करणारा माणूस वेगळा असतो बरं का ? तो पाच हजार रुपये एक्स्ट्रा घेईल,’’ असं बापूनं सांगितलं. मंगेशने बरेच आढेवेढे घेतले व तीन हजारांत फायनल केलं. एवढी सगळी चर्चा होईपर्यंत दुपारचे दोन वाजले होते. ‘‘ही आमची दुपारची जेवणाची वेळ आहे. आधी जेवायला वाढा,’’ असं बापूनं म्हटल्यावर मंगेशचं टाळकं हललं. अजून कामाला सुरवातही झाली नाहीतर दुपारची जेवणाची सुटी कशी झाली?’’ असा प्रश्न त्याने विचारला.
‘‘साहेब, नियम म्हणजे नियम. दुपारी दोन ते तीन जेवण व तीन ते चार वामकुक्षी असा आमच्या संघटनेचा नियम आहे. तो नियम आम्ही मोडला तर आम्हाला दंड भरावा लागंल. त्यामुळं सगळं नियमानुसार करावं लागतं.’’ असं म्हणून त्याने जेवणासाठी पथारी टाकली. अर्ध्या तासात त्यांनी जेवण उरकलं व त्यांच्या तिसऱ्या सहकाऱ्याला फोनवरून बोलावलं. तो तासाभराने येतो, असं सांगून पाच वाजता उगवला. त्याने घराची पाहणी केली व दोन दिवस पुट्टीला लागतील, असं जाहीर केलं. त्यानंतर बापूनंही पुट्टीचं काम झाल्याशिवाय आम्हाला काही करता येत नाही, असं म्हणून हात झटकले. तोपर्यंत सहा वाजले होते. घड्याळाकडे पाहत बापू म्हणाला, ‘‘आजचं काम झालंय. आमच्या नियमानुसार पाचशे ते हजार रुपये घरी जाताना द्यावे लागतात. तेवढं द्या आणि उद्या आम्ही यायच्या आत तुम्ही या भिंती घासून घ्या म्हणजे पुट्टीचं काम सोपं जाईल.’’ बापूचं हे उत्तर ऐकून मंगेशला काय बोलावं, तेच कळेनासं झालं. कामाला अजून सुरवातही झाली नव्हती. तोपर्यंत चार- पाच हजारांचा खर्च झाला होता. शेवटी त्याने प्रत्येकाच्या हातावर पाचशे रुपये ठेवले व उद्यापासून येऊ नका, असं हात जोडून विनंती केली. ती सगळी गेल्यानंतर मंगेशला काय करावं, तेच सुचेनासं झालं. उगाचंच या लोकांच्या आपण नादी लागलो, असं त्याला झालं होतं.
‘‘बाबा यायला फार कमी दिवस राहिल्यानं आता काय करायचं?’’ हा प्रश्न मंगेशने पल्लवीला विचारला.
त्यावर ‘मग तुम्हीच रंगकाम करा की. नाहीतर तुम्ही रजेवरच आहात.’ असे तिने म्हटले.
‘‘मी आणि रंगकाम ? अगं काहीतरीच काय ? मला कसे जमेल? ज्याचे काम त्यानेच करावे.’’ मंगेशने हात झटकले.
‘‘मग रंगारी मिळेपर्यंत सहा महिने हे सामान असेच येथे पडू द्या. माझे बाबा या उकिरड्यात असेच राहू द्या. तुम्हाला काय हो तुम्ही आनंदाने या उकरिड्यात लोळत पडाल. कारण गाढवाला काय घर आणि उकिरडा दोन्हीही सारखेच. पण माझ्या बाबांचे तसे नाही. त्यांना अस्वच्छता बिलकूल आवडत नाही.’’ असे म्हणून तिने पुन्हा बाबापुराण सुरू केलं. मग मंगेशने मुकाट्याने भिंती घासायला सुरवात केली. तेलाचे डाग, मुलांनी काढलेली चित्रकला आणि पल्लवीने लिहलेले अनेक नातेवाईकांचे मोबाईल नंबर, हिशेब या गोष्टी पुसता पुसता मंगेशच्या नाकीनऊ आले. आता मोबाईल नंबर आणि हिशेब लिहिण्यासाठी भिंत ही काय जागा असते पण पल्लवीला ते पटत नाही. अहो कागद नाही सापडला की कोठे लिहायचे मोबाईल नंबर. त्यापेक्षा भिंतच बरी, असा तिचा युक्तिवाद असतो.
दुपारपर्यंत मंगेशने चांगलीच गती आणली होती. मात्र, झाडू- केरसुणी, रंगाचे डबे, शिडी आणि इतर गोष्टी घरात सर्वत्र पसरल्याने चालणेही जिकिरीचे झाले होते.
‘‘मेलं एक काम धड करता येत नाही. किती पसारा मांडलाय. साधं फिरायलाही येत नाही,’’ पल्लवीने नेहमीप्रमाणे टोमणा मारला. आता घराला रंगकाम द्यायचे म्हणजे थोडी अडचण तर होणारच ना आणि राहिला प्रश्न फिरायचा. त्यासाठी पर्वती, सारसबाग, तळजाई आहे ना! घरातल्या घरात कशाला फिरायला पाहिजे? असे मंगेश मनातल्या मनात म्हटला. उघड म्हटले असते तर तासभर तरी भांडण अटळ होते. त्यामुळे त्याने मोठ्याने फक्त ‘सॉरी’ म्हटले. केवळ
वरण-भाताचा कुकर लावायचा म्हटला तरी
‘तुम्ही डाळ आणि तांदूळ निवडून द्या. धुवून द्या. कुकरच्या भांड्यात ठेवून द्या’ अशी मदतीची अपेक्षा पल्लवी करते. मात्र, घराला रंगकाम करताना आपण त्या गावचेच नाही, असं तिचं वागणं आहे. साधी शिडी धरायला ती तयार नव्हती. तरी बरं तिचेच बाबा येणार आहेत म्हणून रंगकाम सुरू केलं आहे.
बाबा घरी राहायला येण्यासाठी चारच दिवस राहिल्याने मंगेश दिवस-रात्र रंगकाम करू लागला, यामुळे त्याचा ‘अवतार’ मात्र प्रेक्षणीय झाला होता. चांगले कपडे खराब होऊ नयेत म्हणून जुने व फाटके घातले. डोक्यालाही फाटके मुंडासे गुंडाळले. चेहऱ्यावर व कपड्यांवर चुना, विविध रंग सांडल्याने तो खरंच एखाद्या बिगाऱ्यासारखा दिसू लागला.
मंगेश शिडीवर चढून छताला प्रायमर लावत होता. कामात एकदम दंग झाला असतानाच शेजारच्या सोनलवहिनी ‘चिमूटभर’ साखर न्यायला आल्या. त्यांना पाहताच मंगेशने अंग चोरून घेतले. त्यांनी आपल्याला या अवतारात पाहू नये म्हणून त्याने देवाचा धावा सुरू केला. मात्र, तरीही त्यांचे लक्ष गेलेच. त्यांनी मंगेशला ओळखले नसावे. ‘‘आमच्या घरालाही रंग द्यायचा आहे. किती पैसे घ्याल,’’ वहिनींनी मंगेशकडे पहात म्हटले.
‘‘अहो, ते कोणी रंगारी किंवा बिगारी नाहीत. आमचे ‘हे’ आहेत.’’ पल्लवीने खुलासा केला. ‘‘काय सांगता? डिट्टो बिगारी दिसतायत,’’ असे म्हणून वहिनी खळखळून हसल्या. आता आपल्या नवऱ्याला असं कोणी म्हटल्यावर कोणत्याही स्वाभिमानी बायकोला राग येईल की नाही. पण पल्लवीने वहिनींच्या हातावर टाळी देत ‘अगदी खरं बोललं बरं का? यांचं हे ‘ध्यान’ पहिल्यापासून असंच आहे. मी आहे म्हणून हे चांगले कपडे तरी घालतात. नाही तर गबाळे ते गबाळेच. यांच्यात कधी सुधारणा होणार कोणास ठाऊक असं म्हटलं. पल्लवीचं बोलणं ऐकून मंगेशला मोठा धक्का बसला. त्यातही वहिनींना आपल्याबद्दल असं ऐकून काय वाटलं असेल, याची त्याला काळजी वाटली. कुठं काय बोलावं आणि बोलू नये, याचा एखादा कोर्स असेल तर तो पल्लवीला करायला लावायला हवा, अशी इच्छा मंगेशला झाली.
सोनलवहिनींनी मंगेशला या अवतारात पाहिल्याने त्याचा मूडच गेला होता. कामातील लक्ष उडाले. कामाचा वेग मंदावला. दुपारपर्यंत अगदीच किरकोळ काम झाल्याने पल्लवीही वैतागून गेली.
‘‘सगळीकडेच कसे हो तुम्ही स्लो. मी म्हणून निभावून नेते. दुसरी एखादी असती ना तर ती कधीच पळून गेली असती. आता बाबा यायला फक्त तीन दिवस राहिलेत आणि अजून निम्मे कामही झाले नाही. तुमचे पूर्वज काय कासव होते काय. कामाची हीच गती राहिली तर सहा महिन्यांतही घराला रंग लावून होणार नाही.’’ पल्लवीने मंगेशला चांगलेच धारवेर धरले.
‘‘घरात एवढा पसारा मांडलाय, की मला कसलं कामही सुचत नाही. त्यापेक्षा मी दोन दिवस मावशीकडे जाते. तेवढ्या काळात काम उरका.’’ असे म्हणून पल्लवी बॅग भरून मावशीकडे निघून गेली. ती गेल्याचं पाहताच मंगेशनं सुटकेचा निःश्वास सोडला. ती घरात असल्यावर उगाचंच आपल्यामागे नाही त्या कटकटी लावून देते, ‘हे असंच करा अन ते तसंच करा’, अशी तिची सारखी भूणभूण राहते. ती मावशीकडे गेल्याने आपल्या अंगावरील ओझे कमी झाल्याचं मंगेशला जाणवलं. त्यानं कामाचा वेग वाढवला. न थकता त्याने प्रायमर लावला. आता दुसरा हात मारला की थेट रंगकाम करायचे, असे त्याने ठरवले. रात्री उशिरापर्यंत त्याने प्रायमरचा दुसरा हात मारला.
दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने पुन्हा कामाला सुरवात केली. नऊच्या सुमारास शेजारच्या सोनलवहिनी चिमूटभर तांदूळ मागायला आल्या. मंगेश आपल्या कामात गर्क होता.
‘‘भावोजी, तुम्ही रंगकाम एकदम झकास करताय बरं का ! मला वाटलं नव्हतं तुम्ही याही कामात एकदम एक्सपर्ट असाल.’’
वहिनींच्या स्तुतीनं मंगेश भारावून गेला.
‘‘वहिनी, हा माझा पहिलाच प्रयत्न आहे बरं का?’’ मंगेशनं विनयानं म्हटलं.
‘‘काय सांगता? तुमचं काम बघून, असं बिलकूल वाटत नाही. एखाद्या अनुभवी माणसानेच काम केलंय, असं वाटतंय.’’ वहिनींची स्तुती ऐकून मंगेशच्या अंगावर मोरपीस फिरवल्यासारखं झालं. त्याचा वारू हवेत उधळू लागला.
‘‘भावोजी, एक काम करा ना. आमच्या हॉलमधील एका भिंतीचे पोपडे उडालेत. तुम्ही तुमचा अनुभवी हात त्यावरून फिरवा ना. पोपडे काढून, प्रायमर मारा व नंतर पलीकडच्या डब्यातील गुलाबी रंग त्या भिंतीला द्या. एका भिंतीसाठी कोणी काम करायला येत नाही. त्यामुळे हे काम खोळंबलय. जे काही पैसे होतील, ते मी द्यायला तयार आहे. आमच्या यांना मी अनेकवेळा त्या भिंतीला रंगकाम करायला सांगितलं. पण ते म्हणजे मुलखाचे आळशी. इकडची काडी तिकडं करणार नाहीत. तुम्ही म्हणजे कसं. अगदी उत्साहाचा झरा. तेवढी एक भिंत रंगवा ना. प्लीज ! ’’
वहिनींच्या ‘प्लीज’ या शब्दाने मंगेश घायाळ झाला. शिवाय उत्साहाचा झरा म्हटल्याने त्याचा उत्साह आणखी वाढला. आपल्या बायकोला आपली कदर नाही पण शेजारच्या वहिनींना आहे, हे पाहून त्यांच्या अंगावर मूठभर मांस चढलं.
‘‘वहिनी, तुम्ही काही काळजी करू नका. आधी मी तुमची भिंत रंगवून देतो. मग आमच्या भिंतीचं काम करतो.’’ असे म्हणून त्याने रंगाचे डबे, प्रायमर व शिडी उचलून वहिनींच्या घरात आणली. त्याने आधी संपूर्ण भिंत खरवडून काढली. त्यानंतर प्रायमर मारायला सुरवात केली. वहिनी शेजारी उभ्या असल्याने त्याच्या ह्दयाची धडधड वाढली. पण वहिनींचं काम व्यवस्थित करून, त्यांची वाहवा मिळवायची असा पण त्याने केला. त्यामुळे अतिशय मन लावून तो काम करू लागला.
मात्र, शिडी हलवताना आवाज होऊ लागल्याने वहिनी म्हणाल्या, ‘‘अहो भावोजी, जरा हळू. माझे मिस्टर बेडरूममध्ये झोपलेत. त्यांची झोपमोड होईल ना.’’ त्यांचे हे बोलणे ऐकून मंगेशला मोठा धक्का बसला. ‘म्हणजे तुमचे मिस्टर बेडरूममध्ये झोपलेत आणि मी काय तुमचा नोकर आहे का? हे वाक्य त्याच्या ओठावर आले. पण त्याने स्वतःला सावरले. वहिनींशी उगाचंच वाद नको म्हणून तो निमूटपणे काम करत बसला. चारच्या सुमारास पल्लवी आली पण बंद दरवाजा बघून तिला मोठं आश्‍चर्य वाटलं. ‘रंगकाम करायचं सोडून, हा बाबा नक्की कोठं गेलाय?’ या प्रश्‍नाने तिचा राग अनावर झाला. तिने मंगेशला दहा- बारा वेळा फोन केला. पण मंगेशने मोबाईल घरीच ठेवून आल्याने तो उचलण्याचा प्रश्‍नच नव्हता. फोनही उचलत नसल्याचे पाहून तिच्या अंगाचा तिळपापड झाला. मंगेश कोठे गेलाय किंवा काही निरोप दिलाय का? हे पहावे म्हणून तिने सोनलवहिनींच्या दाराची बेल वाजवली. वहिनींनी दरवाजा उघडल्यावर समोरचं दृश्‍य पाहून पल्लवीचा मोठा धक्काच बसला.
आपला नवरा शेजारणीच्या भिंतीला रंग लावतोय, हे पाहून तिने धाडकन् दरवाजा आतमध्ये लोटला.
‘‘तुम्हाला काय लाज- लज्जा आहे की नाही. माझे बाबा दोन दिवसांनी येणार आहेत म्हणून आपण रंगकाम काढलंय. पण ते काम राहिलं बाजूला तुम्ही शेजाऱ्यांची घरं रंगवायला काढलीत. याचा अर्थ काय?’’ पल्लवीने रौद्रवतार धारण केला. तिचे हे रूप पाहून मंगेशची तर पाचावर धारण बसली.
‘‘मी एक दिवस मावशीकडे गेले तर माझ्या माघारी तुमची ही नाटकं चालू आहेत. घराची दारं लावून, आतमध्ये दोघं काय रंग उधळताय, हे कळण्याइतकी मी मुर्ख नाही. खरं खरं सांगा. तुमच्या दोघांत काय आहे? तरी म्हटलं मी माहेरी गेल्यानंतर हा बाबा एवढा खूष का होतोय. आता त्याचं खरं कारण कळलं. माझ्या माघारी तुम्हाला चांगलंच मोकळं रान मिळत होतं.’’ पल्लवीचा आवाज चांगलाच तापला होता.
‘‘तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. मी सहज यांना म्हटले. आमची भिंत रंगवता का? तर हे ‘हो’ म्हणाले.’’ सोनलवहिनींनी खुलासा केला.
‘‘‘हो’ म्हणायला हा बाबा नंदीबैलच आहे. पण तू तर पक्क्या आतल्या गाठीची आहेस. ‘साखर देता का?’ ‘तांदूळ देता का?’ असे बहाणे करून, माझ्या नवऱ्याला भेटायला येत होतीस. याचा उलगडा मला आज झाला. तुझ्याकडे मी नंतर बघते, आधी यांची कणीक तिंबते.’’ असे म्हणून पल्लवीने मंगेशला ढकलतच घरी नेले. तिथं त्याला पुन्हा झाप- झापलं.
‘‘आज रात्रीपर्यंत रंगकाम पूर्ण झालं नाहीतर तुमचं काही खरं नाही. काम पूर्ण होईपर्यंत तुम्हाला जेवणही मिळणार नाही.’’ पल्लवीने त्याला इशारा दिला. त्यावर ‘सॉरी’, ‘सॉरी’चा जप त्याने लावला. त्यानंतर निमूटपणे मंगेश शिडीवर चढून, भिंती रंगवू लागला. बराचवेळ तो काम करू लागला. मात्र, भुकेने त्याच्या पोटात कावळे ओरडू लागले पण तरीही तो काम करू लागला. मात्र, थोड्याच वेळात त्याला भोवळ आल्याने तो धाडकन खाली कोसळला. ज्यावेळी तो शुद्धीवर आला. त्यावेळी आपण हॉस्पिटलमध्ये असल्याचे त्याला जाणवले. त्याचे दोन्ही पाय प्लॅस्टरमध्ये होते. त्याला शुद्ध आल्यानंतर पल्लवी त्याच्याजवळ सरकली. ‘फार दुखतंय का? फार लागलं नाही ना’ असा एखादा प्रश्न ती विचारेल, अशी मंगेशची अपेक्षा होती. मात्र तिने त्याही अवस्थेत त्याला झापायला सुरवात केली. ‘‘माझे बाबा आपल्या घरी आल्यानंतर त्यांची सेवा करायला लागू नये म्हणूनच तुम्ही वरून उडी मारलीत ना? तुम्ही हॉस्पिटलमध्ये राहिल्यावर घरातला एवढा पसारा कोण आवरणार? की शेजारच्या सोनलवहिनींना मदतीला बोलवू? अर्धवट रंगकाम आणि पसारा बघून माझ्या बाबांना काय वाटेल?’’ असे म्हणून प्लॅस्टरवर डोके ठेवूनच ती रडू लागली. वेदनेने विव्हळत असतानाही मंगेश पल्लवीसाठी ‘कोठे काय बोलावं आणि कोठे काय बोलू नये’, याचा कोर्स गुगलवर शोधू लागला.
-----------------
सु. ल. खुटवड
ई- ११, अजिंक्य समृद्धी, सावंत विहारसमोर, मोरेबाग, कात्रज, पुणे -४६
मोबाईल- ९८८१०९९०९०

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j26732 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..