महापालिका स्टाफ नर्स भरतीला स्थगिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Postponement of Municipal Staff Nurse Recruitment
महापालिका स्टाफ नर्स भरतीला स्थगिती

महापालिका स्टाफ नर्स भरतीला स्थगिती

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका वैद्यकीय विभागात मानधनावर १५ वर्षांपासून काम करणारे, कोरोना काळात जिवाची पर्वा न करता काम करणाऱ्या स्टाफ नर्स, एएनएम यांना महापालिका सेवेत कायम करण्याच्या ठरावाकडे दुर्लक्ष करुन महापालिका प्रशासनाने राबविलेल्या भरती प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

महापालिका सर्वसाधारण सभेने केलेल्या ठरावावर ६ आठवड्यांत नगरविकास खात्याच्या प्रधान सचिवांनी निर्णय घ्यावा. याचिकाकर्ता राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या १२३ सभासदांना कामावरून कमी करू नये, असा आदेशही न्यायालयाने दिला. त्यामुळे या स्टाफ नर्सला मोठा दिलासा मिळाला असल्याचे राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष, कामगार नेते यशवंत भोसले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

भोसले म्हणाले की, महापालिकेच्या रुग्णालयात गेल्या १० ते १५ वर्षांपासून स्टाफ नर्स, एएनएम, लॅब टेक्‍निशियन, एक्‍स रे टेक्निशियन मानधनावर काम करतात. कोरोना महामारीत रणांगणात उतरून या कोरोना योध्यांनी काम केले. कामाची दखल घेत महापालिका सभेने ३१ जुलै २०२१ रोजी या ४९३ कोरोना योद्धा कर्मचाऱ्यांचा पालिका सेवेत कायम करण्याचा ठराव संमत केला. आयुक्तांच्या स्वाक्षरीने त्या ठरावाचा प्रस्ताव राज्याच्या नगरविकास खात्याकडे मान्यतेसाठी पाठविला. नगरविकासने त्याला आक्षेप घेतला नाही. त्याउलट महापालिकेकडून अधिकची माहिती मागवून घेतली. दरम्यान, १३ मार्च २०२२ रोजी नगरसेवकांची मुदत संपली. निवडणूक झाली नसल्याने प्रशासकीय राजवट लागली.

मानधनावरील कर्मचाऱ्यांना कायम करण्याची प्रक्रिया प्रलंबित असतानाच महापालिका प्रशासनाने स्टाफ नर्स, एएनमसह इतर तांत्रिक अशा कर्मचाऱ्यांच्या १३१ जागांकरिता भरती काढली. त्यावर राष्ट्रीय श्रमिक आघाडीने प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित असल्याने ठरावाची अगोदर अंमलबजावणी करावी, तोपर्यंत नवीन भरती करू नये असे लेखी पत्र महापालिका प्रशासनाला दिले. तरीही, प्रशासनाने भरती प्रक्रिया थांबविली नाही. त्यामुळे याविरोधात संघटनेच्या सभासद असलेल्या स्टाफ नर्स, एएनएम अशा १२३ सभासदांच्या यादीसह ॲड. वैशाली जगदाळे यांच्यातर्फे मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायमूर्ती एम. के. मेनन व न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठापुढे नुकतीच सुनावणी झाली. संघटनेच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. उदय वारुंजीकर यांनी बाजू मांडली. याचिकेवर दिवसभरात तीनवेळा सुनावणी झाली. महापालिकेच्यावतीने ॲड. रोहित सखदेव, शासनाच्या वतीने ॲड. एम. एन. पाबाळे यांनी बाजू मांडली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j27065 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..