‘अरेरे’ संसार संसार ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘अरेरे’ संसार संसार !
‘अरेरे’ संसार संसार !

‘अरेरे’ संसार संसार !

sakal_logo
By

टेबलवर ठेवलेला काचेचा फ्लॉवरपॉट सुजाताचा अतिशय आवडता होता. तिच्या लाडक्या मावशीने तिला तो लग्नात भेट दिला होता, हे त्यामागील एक कारण होते. त्यामुळे रोज सकाळी त्यात ती ताजी फुले ठेवायची. आज दुपारी दोनदा बेल वाजल्याने, सुजाता घाईघाईने दार उघडण्यास जात असताना तिचा धक्का टेबलला लागला. हा धक्का सहन न होऊन फ्लॉवरपॉट फरशीवर पडून फुटला. ‘खळ्ळ्’ असा आवाज ऐकताच, तिच्या काळजाचे पाणी झाले. याही परिस्थितीत तिने दरवाजा उघडला. समोर नीलेशला बघताच, तिच्या रागाचा पारा चढला.
‘‘तुम्हाला काय कळतं की नाही? घरात येण्याची एवढी कसली घाई झाली होती? एकदा बेल वाजवल्यानंतर वाट पाहता येत नाही का?’’ सुजाताने प्रश्‍नांच्या फैरी झाडल्या.
‘‘अगं झालं तरी काय?’’ नरमाईची भूमिका घेत नीलेश म्हणाला.
‘‘तुम्ही लागोपाठ दोनवळा बेल वाजवल्याने माझी तारांबळ उडाली. त्यामुळे दार उघडण्यासाठी मी धावत-पळत आले. या गडबडीत माझा धक्का लागल्याने माझा लाडका फ्लॉवरपॉट खाली पडून फुटला. याला जबाबदार कोण?’’ सुजाताने जाब विचारला.
‘‘यात तुझीच चूक आहे. मला काय दोष देतेस? ’’ नीलेशने बचाव केला.
‘‘काऽऽय? यात माझी काय चूक आहे? तुम्हाला दोनवेळा बेल वाजवायची गरजच काय होती? त्यातही तुम्ही दुपारी बाहेर कशाला पडलात? बरं गेलात ते गेलात, याचवेळीस परत यायची काय गरज होती? संध्याकाळी घरी आला असता, तर मी काय तुम्हाला घरात घेतलं नसतं का?’’ सुजाताने प्रश्‍नांच्या सरबत्ती केली.
‘‘माझ्या माहेरच्या माणसांनी दिलेल्या वस्तू तुम्हाला बघवत नाहीत. त्यातही फ्लॉवरपॉटने मोक्याची जागा घेतल्याने तुमचा त्याच्यावर राग होता. त्यामुळे तुम्ही हा सगळा कट केला. खरं की नाही?’’ असे म्हणून तिने आगपाखड केली.
‘‘वाट्टेल ते आरोप करू नकोस. म्हणे मोक्याची जागा घेतल्याने माझा राग त्याच्यावर होता. उलट हा फ्लॉवरपॉट तू टीव्हीवरच्या शोकेसमध्ये ठेवून दिला होतास. दोन वर्षांपूर्वी मीच तो टेबलवर ठेवला होता. आठवतंय का?’’ नीलेशने म्हटले.
‘‘तुमची सगळी योजना आता माझ्या लक्षात आली. मी सुरक्षिततेच्यादृष्टीने तो फ्लॉवरपॉट शोकेसमध्ये ठेवला होता. मात्र, तो फुटावा, यासाठी तुम्हीच वेगवेगळे डाव आखत होतात. टेबलवर ठेवल्यास येता- जाताना धक्का लागून तो कधीही फुटेल, हा त्यामागे तुमचा हेतू होता तर....’’ सुजाताने म्हटले.
‘‘माझी माहेरची माणसं तुम्हाला डोळ्यासमोर नको असतात. आता त्यांनी प्रेमाने दिलेल्या वस्तूही तुम्हाला नकोशा झाल्यात. म्हणून....’’ सुजाताने आरोपांचा भडिमार केला.
‘‘अगं उगाचंच पराचा कावळा करू नकोस. माझ्या ध्यानीमनीही यातलं काही नव्हतं.’’ नीलेशने खुलासा केला. मात्र, सुजाता
काही ऐकायला तयार नव्हती. मागचे अनेक मुद्दे उकरून काढून, तिने त्याला नामोहरम केले. शेवटी यात त्याने माघार घेतली.
‘‘सॉरी सुजाता ! फ्लॉवरपॉट फुटला, यात माझीच चूक आहे. यात तुझा काहीही दोष नाही. एकतर मी दुपारी बाहेर जायला नको होते. गेलो तरी लगेचच परत यायला नको होते. समजा आलो तरी दोनदा बेल वाजवणे एकदम चूक होते. याबद्दल मला माफ कर. दुसरी गोष्ट दोन वर्षापूर्वी फ्लॉवरपॉट मी टेबलवर ठेवायला नको होता. त्या माझ्या चुकीमुळेच फ्लॉवरपॉट फुटला, याची मला जाणीव आहे. झालेल्या चुकांबद्दल मी दिलगीर आहे. परत माझ्या हातून अशी चूक होणार नाही.’’ नीलेशने शरणागती पत्करल्यावर सुजाताच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य झळकले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j27706 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..