
थेरगावला चातुर्मासानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम
पिंपरी, ता.१४ ः जैन चातुर्मासाला नुकतीच सुरवात झाली आहे. त्यानिमित्त श्री वर्धमान जैन श्रावक संघाच्यावतीने थेरगाव जैन स्थानकात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
चातुर्मासानिमित्त उपप्रवर्तिनी साध्वी सत्यसाधनाजी म. सा., साध्वी हितसाधनाजी, अर्हतज्योतीजी, गुरुछायाजी, तन्मयदर्शनाजी, हर्षप्रज्ञाजी, सौम्यज्योतीजी म. सा. आदींचे वास्तव्य आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी येथे झालेल्या कार्यक्रमात साध्वी सत्यसाधनाजी यांचे ‘जीवनातील गुरूचे महत्त्व'' या विषयावर प्रवचन झाले. चातुर्मास कमिटी अध्यक्ष वर्षा टाटिया यांनी संयोजन केले.
उपप्रवर्तिनी साध्वी सत्यसाधनाजी म्हणाल्या, ‘‘प्रत्येकाच्या जीवनात गुरुचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. गुरूचा आशीर्वाद जीवनात अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडतो. गुरू या शब्दामध्ये खूप अर्थ दडलेला आहे. प्रत्येकाचे गुरू वेगवेगळे असू शकतात. मात्र, गुरू या शब्दाची व्याख्या एकच आहे. गुरू दोन प्रकारचे असू शकतात. शाळेत शिकवणारे शिक्षक आणि आध्यात्मिक गुरू यांचा त्यामध्ये समावेश आहे. शिक्षक हे व्यावहारिक ज्ञान देतात. परंतु आध्यात्मिक गुरू हे भक्ती आणि अध्यात्माची ओळख करून देतात. ज्यांच्या जीवनात गुरुला स्थान नाही, त्यांचे जीवन हे अर्थहीन असते. गुरू हे आपणास भाग्याने मिळतात. गुरूच्या आदेशाने चालण्यासाठी सौभाग्य लागते. ज्यांच्या जीवनात गुरू विषयी समर्पणभाव असतो, ते खऱ्या अर्थाने गुरूकडून ज्ञान प्राप्ती करू शकतात. गुरुवाणी ही नेहमी हितकारक असते. गुरू इच्छेचा मान राखणे हे माझे प्राथमिक कर्तव्य आहे, अशी भावना ठेवल्याने गुरुविषयी समर्पण भाव वाढतो. सदगुरूंचे जीवनात खूप महत्त्व आहे. ते महत्त्व जाणून आपण गुरुविषयी आदरभाव ठेवत त्यांनी सांगितलेल्या योग्य मार्गावरून वाटचाल करायला हवी. त्यामुळे आपल्या जीवनाला नवी दिशा मिळू शकेल.’’
फोटो ः 77706
Web Title: Todays Latest Marathi News Pne22j27823 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..