मे मधील रक्तटंचाईची टांगती तलवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मे मधील रक्तटंचाईची टांगती तलवार
मे मधील रक्तटंचाईची टांगती तलवार

मे मधील रक्तटंचाईची टांगती तलवार

sakal_logo
By

पिंपरी, ता. १७ ः सण-उत्सव-जयंती-पुण्यतिथीनिमित्त शहरात पूर्वी रक्तदान शिबिर घेण्याचे फॅड होते. मात्र, यावर्षी उन्हाची तीव्रता आणि महाविद्यालयांना सुट्यांमुळे शिबिरांची संख्या कमी झाली आहे. परिणामी रक्तसंकलन घटल्याने मे महिन्यात ए, एबी पॉझिटिव्ह आणि सर्व निगेटिव्ह रक्तटंचाईची टांगती तलवार आहे. कर्तव्यभावनेतून दात्यांनी सोयीनुसार रक्तदानासाठी पुढे यावे, अशी विनंती रक्तपेढी चालक करू लागले आहेत.
शहरातील रक्तपेढ्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्याचा रुग्णसेवेवर गंभीर परिणाम होत आहे. उन्हामुळे रक्तदान शिबिरांमध्ये खंड पडला आहे. उन्हाचा त्रास होत असल्यामुळे रक्तदात्यांपैकी १०० पैकी १० ते १५ जणच रक्तदान करीत आहेत. रुग्णालयात रक्त उपलब्ध नसल्याने रुग्णालयांना त्यांना बाहेरून रक्ताची सुविधा करण्यास सांगण्यात येत आहे.

नातलगांची धावपळ
शहरातील रुग्णालयांमध्ये यकृत, मूत्रपिंड प्रत्यारोपण वाढत असून, त्यासाठी एका रुग्णासाठी २० पिशव्यांची गरज भासत आहे. तसेच प्रसूतीकाळात जर रक्ताची अडचण निर्माण झाली, तर कुठे जायचे हा प्रश्‍न नातलगांना भेडसावत आहे. दुर्मिळ रक्तगटासाठी तर नातलगांना धावपळ करावी लागते. सध्या अनेक रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची टंचाई आहे. रक्त उपलब्ध न झाल्यास रुग्णांचे नातेवाईक वाद घालताहेत.

‘वर्क फ्रॉम’चाही फटका?
‘दोन वर्षांपासून शहरात कोरोनाच्या संसर्गामुळे अनेक आयटी कंपन्यांचे कर्मचारी ‘वर्क फ्रॉम होम’ करीत आहेत. त्यामुळे आयटी कंपन्यांमध्ये होणारी रक्तदान शिबिरे बंद झाली आहेत. रक्तदान शिबिरे बंद झाल्याने रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. रक्ताचा तुटवडा कमी करण्यासाठी पिंपरी चिंचवडकरांनी पुढे यावे, असेही आवाहन रक्तपेढ्यांकडून करण्यात येत आहे. अशीच स्थिती कमी-अधिक प्रमाणात बहुतेक रक्तपेढ्यांची आहे.


संकलन घटते ३० ते ५० टक्के
प्रत्येक रक्तपेढीचे रक्तसंकलन व वितरण हे वेगवेगळे असले तरी उन्हाळ्यात संकलन नेहमीपेक्षा ३० ते ५० टक्क्यांनी घटते, हे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. भोसरीतील ‘संजीवन रक्तपेढी’त दरमहिन्याला सुमारे ४०० ते ५०० रक्तबॅगांचे संकलन होते. मात्र, उन्हाळ्यात सर्वसाधारणपणे महिन्याला ३०० पेक्षाही कमी बॅगांचे संकलन होत आहे. त्यामुळे रक्तटंचाईचा सामना करावा लागतो, असे संजीवन ‘रक्तपेढी’चे संचालक निशांत ढोले यांनी सांगितले. रक्तदानासाठी नागरिक पुढे येत नसल्याची खंत ढोले यांनी व्यक्त केली.


थॅलेसेमियाच्या बालकांची वणवण
शहरात ५० टक्के रक्तसाठा हा खासगी कार्यालये आणि महाविद्यालयांमधून उपलब्ध होतो. निर्बंध खुले झाले तरी येथे शिबिरांचे आयोजन अजूनही पुरेशा प्रमाणात होत नाही. शहरात थॅलेसेमियांच्या बालकांना दर १५ दिवसांनी रक्ताची आवश्यकता असते. या बालकांना महिन्याला जवळपास नऊ ते दहा हजार युनिटची गरज असते. परंतु रक्तदानच तेवढ्या प्रमाणात होत नसल्यामुळे दीड वर्षे त्यांची रक्तासाठी वणवण सुरू आहे. सध्या आमच्या रक्तपेढीकडे एबी पॉझिटिव्ह, ए पॉझिटिव्ह आणि सर्व निगेटिव्ह रक्तगटाचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. तीन बालके आणि ८० वर्षीय महिला यांना रक्ताची गरज आहे, पण रक्त मिळानेसा झाले आहे. कार्यालयांसह गृहनिर्माण संकुलांमध्ये शिबिरांचे आयोजन मोठया प्रमाणात करणे गरजेचे आहे, असे मत पिंपरी चिंचवड रक्तपेढीच्या टेक्निशियन भारती सातपुते यांनी व्यक्त केले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m67154 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top