
सासूबाईंचं सुनेला ह्दयद्रावक पत्र
प्रिय सूनबाई, हल्ली तू मोबाईलशिवाय कोणाशी बोलत नाहीस आणि व्हॉटसअप किंवा फेसबुकशिवाय तू काही वाचत नाहीस. त्यामुळे हे पत्रही मी तुला व्हॉटसअपवर पाठवत आहे.
आता तुझी पोटदुखी कशी आहे? प्रकृतीची काळजी घेत जा. माझ्या लाडक्या मुलानं मनोजने मला काल पैठणी आणली होती. मला ती फार आवडली. मला पैठणीच्या आठवणी तुला खूप सांगायच्या होत्या पण तुझ्या पोटात अचानक दुखू लागल्यानं मी आवरतं घेतलं. मागंही मला राणीहार केला होता. नेमकं त्याचवेळी तुझ्या पोटात दुखायला लागलं होतं. बाहेरचं खाणं तू कमी केलं पाहिजेस, तरच पोटदुखी आटोक्यात येईल. गरम पाण्यातून ओवा घेतल्यास पोटदुखीला उतार पडतो. एकदा हा घरगुती उपाय करून पहा. नीट लक्षात घे. गरम पाणी थंड करून, त्यातून ओवा घ्यायचा आहे. मागं मी तांदूळ शिजवून चेहऱ्यावर लावल्यावर गोरी होशील, असं मी तुला सांगितलं होतं. त्यावेळी तू शिजवलेला गरमागरम तांदूळ चेहऱ्यावर लावला होतास व नंतर माझ्या नावाने खडे फोडत बसली होतीस. त्यामुळं नीट लक्ष देऊन उपाय करत जा. अर्थात पंधरा- वीस वेळा शिजवलेला तांदूळ चेहऱ्यावर लावूनही तुला काही उपयोग झाला नाही, ही गोष्ट वेगळी ! चेहरा उजळणं नसतं एखाद्याच्या नशीबात. त्याला आपण काय करणार? पण मी ज्यावेळी लेकीकडे राहायला निघते, त्यावेळी शिजवलेला तांदूळ न लावताही तुझा चेहरा कसा काय उजळतो, हे मला न सुटलेलं कोडं आहे.
सूनबाई, आपल्या दोघींमध्ये भांडण झालं, की ‘मी आजच्या जमान्यातील मॉडर्न विचारांची मुलगी आहे. मी भलतं- सलतं काही ऐकून घेणार नाही’ हे पालुपद तुझं चालू होतं. अगं तू आजच्या जमान्यातील मुलगी आहेस आणि मी काय मोहेंजोदडो वा हडप्पाच्या खोदकामात सापडले आहे का? आपल्या दोघींच्या वयात फार तर पंचवीस- तीस वर्षांचा फरक असेल पण त्यावरून किती टोमणे मारतेस.
खरं तर पत्रिका मुलीची आणि सासूची जुळली पाहिजे तरच संसार सुखाचा होईल. मुलगा काय कोणत्याही परिस्थितीत जुळवून घेतो. म्हणूनच लग्नाआधी मी तुला बागेत भेटायला बोलावलं होतं. ‘तू मला तुझी आईच समज. तुझ्या आईबरोबर जशी तू राहायचीस, तशीच राहा,’ असा सल्ला दिला होता. पण तो इतका अंगलट येईल, असं मला वाटलं नव्हतं. ‘‘आई, माझ्यासाठी विलायची घालून चहा करा आणि नाश्त्याला पोहे बनवा.’’ लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी बेडरूममधून तू मला हा हुकूम सोडलास आणि पुढचं चित्र मला दिसू लागलं.
कधीतरी ‘‘तुम्हाला घरकामात काही मदत करू का’’? असा प्रश्न तू विचारतेस. त्यावेळी ‘तुझा नेटपॅक संपला की काय’ अशी शंका मला येऊ लागते. माझ्याशी बोलायला तुला एक मिनिट वेळ नसतो पण स्वतःच्या आईशी रोज फोनवरून बोलताना दोन तासही तुला कमी पडतात. एवढं बोलूनही ‘आई, ठेवते फोन. खूप कामं पडली आहेत. नंतर निवांत बोलू’ असं म्हणतेस, त्यावेळी तुझ्या आईला गलबलून येत असेल. माझ्या कोकराला सासरी फारच काम पडतं, असा समज त्यांचा होत असेल. खरं तर तुमच्या गप्पांमधून मला वगळलं तर एक मिनिटांच्यावर तुमचं बोलणं होणार नाही, याची मला खात्री आहे.
सूनबाई, नोकरी आणि घर या दोन्ही आघाड्या तू यशस्वीरीत्या सांभाळतेस म्हणन मला तुझा खूप अभिमान वाटतो. खरं तर सासू- सुनांचं नातं चांगल्या मैत्रिणींच असावं. एकमेकींची चेष्टामस्करी करत, हास्याची मैफल रोज रंगावी. त्यातूनच आनंदाचं झाड आपल्या दारी बहरावं. त्या झाडाला माया आणि आपुलकीचं खतपाणी आपण दोघींनीही घालावं, एवढीच अपेक्षा !
कळावे,
तुझी सासू
Web Title: Todays Latest Marathi News Pne22m77831 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..