
कर्तव्य नव्हे; सेवेसाठी तयार राहा !
देहू, ता. १७ ः ‘पालखी सोहळा महाराष्ट्राचे वैभव आणि संस्कृती आहे. या सोहळ्यातील वारकऱ्यांना सोयी सुविधा देण्यासाठी सरकारच्या सर्व विभागातील कर्मचाऱ्यांनी कर्तव्य म्हणून नाही, तर सेवा करण्यासाठी तयार रहा,’ असे आवाहन हवेलीचे प्रांताधिकारी सुनील असवले यांनी शुक्रवारी (ता.१७) देहू येथे केले. तसेच पालखी सोहळ्याशी संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या शनिवार (ता. १८ ) आणि रविवार (ता.१९) च्या सुट्ट्या रद्द करण्यात येणार असल्याचे जाहीर केले.
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा येत्या २० जूनला देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. या पार्श्वभूमीवर संत तुकाराम महाराज संस्थान आणि सरकारच्या विविध खात्यांतील अधिकाऱ्यांची आढावा बैठक देहूतील भक्त निवासात झाली. त्यावेळी प्रांताधिकारी सुनील असवले बोलत होते.
संस्थानचे अध्यक्ष नितीनमहाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख माणिकमहाराज मोरे, संतोषमहाराज मोरे, विशालमहाराज मोरे, विश्वस्त संजयमहाराज मोरे, नगराध्यक्षा स्मिता चव्हाण, उपनगराध्यक्षा रसिका काळोखे, पिंपरी चिंचवडच्या अप्पर तहसीलदार गीता गायकवाड, प्रवीण ढमाले, वाहतूक पोलिस निरिक्षक अमरनाथ वाघमोडे, वैद्यकीय अधिकारी डॅा. किशोर यादव, पोलिस अधिकारी नंदकिशोर भोसले पाटील व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
वाहतूक पोलिस निरिक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी सांगितले, १९ जूनपासून देहूकडे येणारे चारही मार्ग अवजड वाहनांसाठी बंद राहणार आहेत. पालखी प्रस्थानाच्या दिवशी सोमवारी (ता.२०) आणि मंगळवारी(ता.२१) वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. जुना पुणे- मुंबई महामार्गावरील देहूफाटा ते देहूपर्यत वाहतूक बंद राहील, तसेच देहू ते आळंदी मार्गावरील वाहने देहूतील खंडेलवाल चौकापर्यंत येतील. येलवाडीकडून वाहने देहूत येणार नाहीत. दिंडीतील वाहने तळवडेमार्गे निगडीकडे सोडण्यात येणार आहेत.
वीज वितरण कंपनीचे कर्मचाऱ्यांनी २४ तास विद्युत पुरवठा सुरु ठेवावा, अशी मागणी माजी उपसरपंच स्वप्नील काळोखे यांनी बैठकीत केली. अन्यथा ऐेन पालखी सोहळ्यात पिण्याचे पाणी वारकऱ्यांना मिळणार नाही.
------------------
आरोग्य यंत्रणा सज्ज
---------------------
प्राथमिक आरोग्य विभागाच्या वतीने सहा ठिकाणी बाह्यरुग्ण विभाग असणार आहे. तसेच आरोग्य केंद्रात २४ तास बाह्यरुग्ण विभाग सुरु राहणार आहे. २७ डॅाक्टर आणि ६० कर्मचारी तैनात करण्यात येणार आहे, तसेच दहा रुग्णवाहिका असणार आहे. गावातील पिण्याचे पाण्याचे नमुने तपासण्यात आले असून, काही ठिकाणी पाणी पिण्यायोग्य नाही, त्या ठिकाणी नगरपंचायत प्रशासनाने मेडिक्लोअर द्यावे, अशी मागणी वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव यांनी केली.
--------------------
देहू ः संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची तयारीची आढावा बैठक भक्तनिवासात पार पडली.
(७१७०२)
Web Title: Todays Latest Marathi News Pne22m80873 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..